अक्षरधाम येथे नीलकंठ वर्णी यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे अनावरण

मंत्रोच्चार आणि वैदिक विधीनुसार प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

    27-Mar-2026   
Total Views |
Swaminarayan Akshardham
 
मुंबई : (Swaminarayan Akshardham) नवी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर परिसरातील नारायण स्वामी मंदिरात तपोमूर्ती नीलकंठ वर्णी यांच्या १०८ फूट उंच अशा भव्य मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात मंत्रोच्चार, पूजा आणि यज्ञाचे पवित्र वातावरण होते. जागतिक बॅप्स संस्थेचे प्रमुख महंतस्वामी महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चार आणि वैदिक विधीनुसार हा सोहळा पार पडला. जगभरातून आलेल्या हजारो भक्तांनी या अनुष्ठानात सहभाग घेतला होता.
 
ही मूर्ती भगवान स्वामीनारायण यांच्या बाल्यावस्थेतील कठोर तपश्चर्येचे दर्शन घडवते. ही मूर्ती पंचधातूपासून तयार करण्यात आली असून, भगवान स्वामीनारायण यांच्या तपश्चर्येचे दर्शन घडवणारी ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी मूर्ती असल्याचे सांगितले जातेय. या भव्य कार्यक्रमात भारतासह अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील ३०० हून अधिक संत-महंत सहभागी झाले होते. या महाउत्सवाची सुरुवात बुधवारी ‘श्री नीलकंठवर्णी विश्वशांती महायज्ञा’ने झाली होती. अक्षरधाम मंदिराच्या विशाल प्रांगणात षोडशोपचार पूजनासह वैदिक अनुष्ठाने भव्य पद्धतीने पार पडली.
 
मूर्तीची वैशिष्ट्ये पाहिल्यास, ८ फूट उंच व्यासपीठावर ही मूर्ती उभारण्यात आली असून, ती तयार करण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला. मुख्यतः कांस्य धातूचा वापर करण्यात आला आहे. मूर्तीच्या उभारणीमध्ये अक्षरधाम मंदिरातील अनुभवी कारागीर आणि संतांनी—त्यांच्यासोबतच जवळपास ५० शिल्पकार आणि असंख्य स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम घेतले.
भगवान स्वामीनारायण यांनी मुक्तिनाथ (पुलहाश्रम) येथे सुमारे चार महिने एका पायावर उभे राहून कठोर तपश्चर्या केली होती. या मूर्तीच्या माध्यमातून तप, त्याग, करुणा, मैत्री, मानवसेवा, भक्ती आणि उपासना यांसारख्या उच्च मूल्यांची आठवण करून दिली जात आहे.
 
हेही वाचा : मालवणीत रामभक्तांवर धर्मांध मुस्लिमांचा हल्ला
 
तपोमूर्ती नीलकंठ वर्णी कोण?
 
भगवान स्वामीनारायण अवघ्या ११ व्या वर्षी घर सोडून बाहेर पडले. त्यानंतर सात वर्षे त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती करत लोककल्याणासाठी कार्य केले. या काळात त्यांनी १२ हजार किलोमीटरपेक्षा अधिक पायी प्रवास केला. हिमालय, बद्रीनाथ-केदारनाथ, कैलास-मानसरोवर, कामाख्या देवी मंदिर, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम, नाशिक, पंढरपूर, द्वारका आदी तीर्थस्थळांना त्यांनी भेट दिली. या कठीण आध्यात्मिक यात्रेदरम्यान त्यांनी ‘नीलकंठ वर्णी’ हे नाव धारण केले.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक