मुंबई : (Nitesh Rane) कोकणच्या हवाई कनेक्टिव्हिटीसाठी एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली असून, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडद्वारा संचालित आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून '२४x७' 'दिवस-रात्र' आणि 'सर्वकालीन हवामाना'त विमान उड्डाण व लँडिंगसाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या मान्यतेमुळे सिंधुदुर्ग विमानतळ आता कमी दृश्यमानता, पावसाळी व प्रतिकूल हवामानातही सुरक्षित विमान चालनासाठी सक्षम झाला आहे. (Nitesh Rane)
डीजीसीएकडून मिळालेल्या या मान्यतेत इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स अंतर्गत विमान चालनाची परवानगी देण्यात आली असून, त्यामध्ये उपग्रह आधारित आवश्यक नेव्हिगेशन परफॉर्मन्स प्रक्रिया तसेच बॅकअप नेव्हिगेशन सिस्टीम्सचा समावेश आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वैमानिकांना उपकरणांद्वारे अचूक मार्गदर्शन मिळते, तसेच उपग्रह प्रणाली अपयशी ठरल्यास विश्वासार्ह पर्यायी यंत्रणा उपलब्ध राहते. परिणामी, वर्षभर सर्व प्रकारच्या विमानांसाठी अधिक सुरक्षित आणि सातत्यपूर्ण उड्डाणे शक्य होणार आहेत. (Nitesh Rane)
सिंधुदुर्ग विमानतळावर प्रवाशांची संख्या वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच जवळपास ११,००० प्रवाशांची वर्दळ नोंदवण्यात आली असून, मासिक प्रवासी संख्येनुसार सिंधुदुर्ग विमानतळ भारतातील टॉप ७५ विमानतळांमध्ये स्थान मिळवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या प्रवासी आणि उड्डाण संख्येची दखल घेत विमानतळ प्रशासनाने विमान पार्किंग क्षमता दुप्पट केली आहे. यापूर्वी एकावेळी तीन विमाने पार्क करता येत असताना आता एकाचवेळी सहा विमानांचे पार्किंग शक्य झाले आहे. यामुळे कोकणासाठी भविष्यातील महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून सिंधुदुर्ग विमानतळाची भूमिका अधिक भक्कम झाली आहे. (Nitesh Rane)
‘कोकणच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला चालना’
या ऐतिहासिक टप्प्याबाबत प्रतिक्रिया देताना आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार व प्रमुख कॅप्टन जय एस. सदाना म्हणाले, “२४x७ सर्वकालीन हवामानात कामकाजासाठी मिळालेली ही मंजुरी विमानतळाच्या विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करणारी आहे. यामुळे विमान कंपन्यांचा आत्मविश्वास वाढेल, उड्डाणांची संख्या वाढेल आणि कोकण प्रदेशाच्या आर्थिक तसेच पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल. यामुळे कोकणवासीयांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि देशभरातील पर्यटकांना कोकणमध्ये येण्यासाठी नवे दालन खुले होईल.” (Nitesh Rane)
सिंधुदुर्ग विमानतळ : कोकण प्रदेशाचे हवाई प्रवेशद्वार
डिसेंबर महिन्यात जवळपास ११,००० प्रवाशांची वर्दळ नोंदविण्यात आली असून, मासिक प्रवासी संख्येच्या आधारे सिंधुदुर्ग विमानतळाला भारताच्या अव्वल ७५ विमानतळांमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. विमानतळावरील या पायाभूत सुविधा उन्नतीमुळे कोकण प्रदेशाच्या आर्थिक विकास, पर्यटन आणि कनेक्टिव्हिटी साठी हे टप्पे निश्चितच मोलाचे ठरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा असून, यामुळे कोकणवासीयांचा प्रवास अधिक सोयीस्कर, आनंददायी होईल तसेच देशभरातील पर्यटकांचे कोकणमध्ये स्वागत करण्यास नवे दालन खुले होईल.
- नितेश राणे, मस्त्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.