सांगली : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतून महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला असून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ त्यांची 'विजयी संकल्प सभा' पार पडली. यावेळी पालमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, दिनकर पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "मागच्या वेळीही मी सांगलीमध्ये आलो होतो. महानगरपालिकेच्या निमित्ताने काही आश्वासनेदेखील दिली होती. त्यावेळी सगळ्यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेची सूत्रे भाजपच्या हातात आली आणि आपण दिलेली आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली त्याच वेळी मी ठरवले की, या दोन शहरांची रचना अशी आहे तिथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे. त्यामळे यावर काही कायमस्वरूपी उपाय काढणे महत्वाचे आहे. त्यानंतर आम्ही वर्ल्ड बँकेसोबत चर्चा केली आणि पूर वळवण्याचा प्रकल्प सुरु करणार आहोत. यामध्ये दोन टप्प्यात ४ हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे आपण सांगली शहराला पुरापासून नेहमीकरिता वाचवू शकू. पुढच्या काळाच हे सगळे पुराचे वाहून जाणारे पाणी शहरांमध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात वळवण्याचे काम आम्ही करतो."
"महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून देशात नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. ६ कोटी लोक ४० हजार गावांत राहतात आणि ६ कोटी लोक ४०० शहरात राहतात. त्यामुळे शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा आपला प्रयत्न आहे. जवळजवळ ७० वर्षे आम्ही शहरांकरिता काहीच केले नाही, पण मोदीजींनी सांगितले की, शहरीकरणाला अभिशाप समजू नका तर संधी समजा. त्यांनी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरांना पैसे देणे सुरू केले आणि महाराष्ट्रातली शहरही बदलू लागली," असेही ते (Devendra Fadnavis) म्हणाले.
सांगलीमध्ये आयटी उद्योग आणण्याचा प्रयत्न
"सांगली महानगरपालिकेवर आपला झेंडा लागला की, पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देऊ. महानगरपालिका निवडून आणा तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. सांगली शहर हे स्वच्छ शहर असले पाहिजे या दृष्टीने आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचे आहे. सांगलीमध्ये आयटी उद्योग आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करायचा आहे. तसेच सांगलीला एक चांगले विमानतळ तयार करण्याचा प्रयत्न असेल. पाच वर्षात आम्ही केलेले काम आणि झालेले परिवर्तन आपण बघितले आहे. त्यानंतर त्यात काही खंड पडला होता. पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा विकासाला गती दिली. आता पुढचे पाच वर्ष ही गती थांबू द्यायची नसेल तर भाजप-रिपाइ-जनसुराज्य या युतीचे उमेदवार निवडून द्यावे. आपली एकमेव अशी युती आहे ज्यांनी पूर्ण ७८ उमेदवार उभे केलेत. बाकी कुणाला ५० देखील उमेदवार सापडले. त्यामुळे आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या, येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीची चिंता करा, त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांना केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....