भारत का रहनेवाला हूँ....

    31-Jul-2025   
Total Views |

आपण भारतात राहणारे लोक आहोत. म्हणून आपण भारताच्या हिताच्याच गोष्टी केल्या पाहिजेत. चीन, पाकिस्तान, अमेरिका यांच्या हिताच्या गोष्टी करताच कामा नयेत. घमेंडीत जगणार्‍या गांधी परिवाराला हा संदेश समजो, अशी ईश्वराकडे प्रार्थना करूया.

पाकविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ दि. 7 मे रोजी यशस्वी झाले. पहलगाम येथे पाकिस्तानी धर्मांध मुस्लीम दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर हल्ला करून पुरुषांना वेगळे काढून त्यांना नाव आणि धर्म विचारून ठार केले. सेक्युलर भाषेचा वापर न करता सांगायचे, तर धर्मांध मुस्लीम दहशतवाद्यांनी ते पुरुष हिंदू आहेत, म्हणून त्यांच्या नातेवाईकांसमोर अत्यंत निर्दयीपणे गोळ्या झाडल्या आणि त्यांना ठार केले. हा इस्लामी दहशतवाद नवा नाही. मोहम्मद बिन कासीमपासून मोहम्मद अली जिनांपर्यंत आणि नंतर मोपला आणि नौखली येथे झालेल्या कत्तलीत हा अनुभव हिंदू समाजाने घेतला आहे.

आपले भाग्य असे की, याचा वचपा घेणारे नरेंद्र मोदी यांचे शासन केंद्रात आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी केंद्रांवर दि. 7 मे रोजीच्या रात्री जबरदस्त हल्ले केले. भारतीय सैन्याला लक्ष्य निश्चित करण्याचे हल्ला करण्याची वेळ ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. भारतीय सैन्य दलाने अत्यंत कमी वेळात आपली शक्ती पाकिस्तानला, पाकिस्तानच्या विदेशी मित्रांना आणि पाकिस्तानच्या भारतीय मित्रांना दाखवून दिली. या ‘ऑपरेशन सिंदूर’वर दोन दिवस दि. 28 व दि. 29 जुलै रोजी लोकसभेत चर्चा झाली. सामान्यपणे विचार केला, तर देशशत्रू आणि हिंदूशत्रू पाकिस्तान विरुद्ध केल्या गेलेल्या यशस्वी कारवाईची चर्चा करण्याचे काही कारण नाही. चर्चाच करायची झाली, तर ती सैन्य दलाच्या सामर्थ्याविषयी, त्यांना लागणार्‍या आधुनिक शस्त्रासंबंधी, आधुनिक तंत्रासंबंधी, गुप्तचर यंत्रणेच्या सक्षमीकरणासंबंधी होण्याची गरज होती. परंतु, काँग्रेस आणि गांधी घराणे यांना अशा विषयात रस नसतो. त्यांच्या डोळ्यात नरेंद्र मोदी आणि मोदींचे शासन, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सलत असते आणि म्हणूनच दोन दिवसांच्या चर्चेत राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे इत्यादींनी आपल्या मनातील गरळ ओकून काढली.

‘पाकिस्तानने आपले ‘राफेल’ विमान पाडले. आपल्या सैन्यतळांवर हल्ले केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा तमाशा आहे. मोदी शासनात इच्छाशक्ती नाही, ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध विराम केला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये यश मिळाले नाही,’ असले भन्नाट आरोप लोकसभेत करण्यात आले. प्रत्यक्ष ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू असताना रोजच त्याच्या तपशीलवार बातम्या येत होत्या. भारतीय हवाई दलाने ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचा वापर करून पाकिस्तानची कशी धुळधाण केली आहे, याची चित्रेदेखील प्रकाशित होत होती. सर्व देशांनी ती पाहिली. पाकिस्तानच्या अणवस्त्र साठ्यांवर झालेल्या हल्ल्याची प्रदीर्घ चर्चा चालू होती. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे या तिघांनी सोडून सार्‍या जगाने ती पाहिली.

चर्चेला खणखणीत उत्तर नरेंद्र मोदी यांनी आणि अमित शाह व एस. जयशंकर यांनी दिले. त्याची पुनरावृत्ती येथे करण्याचे कारण नाही. एकदा निर्लज्जपणाचे कवच अंगावर चढविले की, अशा सणसणीत उत्तराचेदेखील काही वाटत नाही. वर दिलेली काँग्रेसची मंडळी या बाबतीत स्थितप्रज्ञ आहेत. त्याला दोन अपवाद निघाले. केरळचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे खासदार व प्रवक्ते मनीष तिवारी. शशी थरूर हे विद्धान खासदार आहेत. वेगवेगळ्या विषयांवर त्यांची पुस्तके वाचनीय आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ झाल्यानंतर मोदी शासनाने वेगवेगळी शिष्टमंडळे विदेशात पाठविली होती. शशी थरूर अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत त्यांनी भारताची बाजू अत्यंत ठामपणे मांडली, मनीष तिवारीदेखील एका शिष्टमंडळात होते आणि ते अदीस अबाबा या देशात गेले होते.

साहजिकच ही गोष्ट गांधी घराण्याला रुचणारी नव्हती. या घराण्याने लगेचच मनीष तिवारी आणि शशी थरूर यांच्यावर कारवाई केली नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर लोकसभेत चर्चा चालू असताना या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसतर्फे बोलण्याची अनुमती देण्यात आली नाही. दोघांनाही संसदेत मौन धारण करून बसावे लागले. शशी थरूर यांना याबाबतीत पत्रकारांनी विचारले, तेव्हा ते ‘मौनव्रत’ एवढेच म्हणाले. मनीष तिवारी हे शांत बसले नाही. त्यांनी वर आपली पोस्ट टाकली. ‘पूरब और पश्चिम’ या 1970 सालच्या चित्रपटात एक गाणे होते. गाण्याचे बोल असे आहेत.

हैं प्रीत जहां की रीत सदा
मैं गीत वहां के गाता हूँ
भारत का रहने वाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ


मनीष तिवारी वरील गाण्याच्या चार ओळींतून काँग्रेस नेत्यांना एक संदेश देतात तो असा की, आपण भारतात राहणारे लोक आहोत. म्हणून आपण भारताच्या हिताच्याच गोष्टी केल्या पाहिजेत. चीन, पाकिस्तान, अमेरिका यांच्या हिताच्या गोष्टी करताच कामा नयेत. घमेंडीत जगणार्‍या गांधी परिवाराला हा संदेश समजो, अशी ईश्वराकडे प्रार्थना करूया.

शशी थरूर हे उत्तम वक्ता तसेच मुरब्बी राजकारणी आहेत. काँग्रेस नेतृत्वाच्या मोदीविरोधी आणि भारतविरोधी धोरणांच्या ते विरुद्ध आहेत. पक्ष सांगेल तेच बोलले पाहिजे, हे ते स्वीकारीत नाहीत. ते म्हणतात, “माझी पहिली निष्ठा देशाप्रति आहे. पक्ष हे राष्ट्राला उत्तम बनवणारे साधनरूप आहे. माझ्या मते, तुम्ही कोणत्याही पक्षाचे सभासद असलात, तरीही पक्षाचे उद्दिष्ट आपल्या पद्धतीने उत्तम भारत घडविणे हेच असले पाहिजे.”

गांधी घराण्याच्या दबावाखाली काम करणार्‍या काँग्रेसी नेत्यांच्या तोंडी असली वाक्ये ही कारल्याच्या वेलीला गोड कारली लागण्यासारखी आहेत. यासाठी या दोन्ही वक्तव्यांचे भारतभक्त म्हणून आपण सर्वांनी स्वागतच केले पाहिजे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हा राजकीय हाणामारीचा विषयी नाही. काँग्रेस सरकारने पूर्वी काय केले, असा त्यांचा पापाचा पारा वाचून काही उपयोगाचे नाही. इतिहास कोणाला बदलता येत नाही. म्हणून झाले गेले गंगेला मिळाले असे समजून नवीन भारत घडविण्याच्या दृष्टीने वाटचाल करायला पाहिजे.
हा नवीन भारत हिंदू स्त्री-पुरुषांचे रक्षणसमर्थ असला पाहिजे. इस्लामी आक्रमणाची फळे आपण अतिभयानक भोगली आहेत. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये. ती होऊ द्यायची की नाही, हे भारतातील हिंदू समाजानेच ठरवायचे आहे.

लोकशाहीत प्रजा सार्वभौम असते. या सार्वभौम प्रजेने देशहिताचा विचार करणार्‍या राजकीय पक्षांनाच आणि नेत्यांनाच समर्थन दिले पाहिजे. अन्य कोणाचेही समर्थन करणे हा आत्मघातकी मार्ग आहे, हे जर आपल्याला समजले, तर पुढच्या लोकसभेत देशाविरुद्ध बोलणारे, सैन्यदलाविरुद्ध आक्षेप घेणारे राजनेते आपल्याला संसदेत दिसणार नाहीत. संसदेतील चर्चेचे हे शहाणपण आपण समजून घ्यावे, अशी विनंती!

9869206101