पंतप्रधान मोदींकडून दाहोदला २४ हजार कोटींची भेट! पहिल्या ‘इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह’ला हिरवा झेंडा

    26-May-2025   
Total Views |

pm narendra modi inaugurated the first electric locomotive plant in dahod 
 
 
गांधीनगर : (PM Narendra Modi inaugurated a locomotive plant in Dahod) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी दि. २६ मे रोजी वडोदऱ्यातील रोड शोने दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर दाहोद येथे पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील पहिल्या लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवत प्रकल्पाचा शुभारंभ केला. लोकोमोटिव्ह प्लांटच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी स्वतः इंजिनात बसून त्याची माहिती घेतली. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.
 
 
 
 
२४ हजार कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन व पायाभरणी केली. नव्याने उभारण्यात आलेल्या लोकोमोटिव्ह प्लांटमुळे भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. दाहोदमध्ये स्थापन झालेल्या या अत्याधुनिक प्लांटमध्ये ९००० एचपी क्षमतेचे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिन तयार केले जातील. ही इंजिन भारतीय रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढविण्यास मदत करतील.
 
 
 
 
४६०० टन माल वाहून नेण्याची क्षमता
 
४६०० टन मालवाहतूक करण्याची क्षमता असलेली ही इंजिन 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत तयार करण्यात येणार आहेत.यामुळे केवळ मालवाहतुकीलाच गती मिळणार नाही तर लॉजिस्टिक्स खर्चही कमी होणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुढील १० वर्षांत सुमारे १२०० लोकोमोटिव्ह इंजिन तयार होणार असून त्यातील काहींची निर्यातही शक्य होईल.
 
पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 

दाहोद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज आपण १४० कोटी भारतीय आपल्या देशाला विकसित भारत बनवण्यासाठी एकत्र काम करत आहोत. देशाच्या प्रगतीसाठी जे काही आवश्यक आहे ते आपण भारतातच बनवावे ही काळाची गरज आहे. भारत उत्पादनाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. आज आपण स्मार्ट फोन्सपासून ते वाहने, खेळणी, लष्करी शस्त्रे आणि औषधे अशा गोष्टी जगभरातील देशांमध्ये निर्यात करत आहोत."
 
दरम्यान, वडोदऱ्यातील रोड शोमध्ये नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच रोड शोदरम्यान भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांचे पुष्पहार घालून स्वागत केले.पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात एकूण ७७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे विविध विकास प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\