'भारत अंदाज प्रणाली'चे लोकार्पण! अतिवृष्टी, ढगफुटी की चक्रीवादळ? आता सगळी माहिती अचूक कळणार

"६ किमी x ६ किमी" रिझोल्यूशनसह हवामान अंदाज प्रणाली सुरु करणारा भारत जगातील पहिला देश

    26-May-2025   
Total Views |

India Launches Bharat Forecast System
 
नवी दिल्ली : (India Launches Bharat Forecast System) राज्यातील विविध भागांमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला जात आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाचा (Indian Meteorological Department) हाच अंदाज आता अधिक अचूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) आता अधिक अचूक अंदाजासाठी भारतीय बनावटीच्या 'भारत अंदाज प्रणाली' (Bharat Forecast System - BFS) चा वापर करणार आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याहस्ते सोमवार, दि. २६ मे रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 'भारत अंदाज प्रणाली'चा लोकार्पण सोहळा पार पडला.
 
 
आपत्ती व्यवस्थापन, चक्रीवादळांचा मागोवा घेणे, अतिवृष्टीचा अचूक अंदाज व स्थानिक हवामान स्थितीचे सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी पुण्यातील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी' (IITM) ने हे मॉडेल विकसित केले आहे. आयआयटीएम पुणे येथील ५ महिला शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या बीएफएसचे उद्दिष्ट अतिवृष्टीचा सामना करणे आहे. बीएफएस हे ६ किमी x ६ किमी या उच्च रिझोल्यूशनसह भारतातील पहिले स्वदेशी हवामान अंदाज मॉडेल असून, ते यंदाच्या पावसाळ्यापासून वापरात आणले जाणार आहे. IITM चे माजी वरिष्ठ हवामान मॉडेलर पार्थसारथी मुखोपाध्याय यांनी सांगितले की, “बीएफएस हे निश्चित मॉडेल असून ते एकल-मॉडेल आधारित आउटपुट देणारे आहे. त्यामुळे अंदाज अधिक अचूक आणि स्थानिक स्तरावर लागू होणारे असतील.”
 
सध्या वापरात असलेल्या हवामान मॉडेलचे रिझोल्यूशन १२ किमी x १२ किमी आहे. त्यामुळे अंदाजकर्त्यांना १४४ चौरस किमी क्षेत्र हे एक युनिट मानावे लागते, आणि त्या संपूर्ण युनिटसाठी एकच अंदाज तयार केला जातो. यामुळे लहान भागातील हवामान बदलांचे अचूक निरीक्षण करणे शक्य होत नाही. BFS च्या माध्यमातून ६ किमी पर्यंत सुधारित रिझोल्यूशन मिळणार असल्याने अतिवृष्टीसारख्या हवामान बदलांचा अचूक अंदाज मिळण्यास मदत होणार आहे.
 
या प्रगत हवामान मॉडेलच्या विकासामध्ये IITM कॅम्पसमध्ये बसवण्यात आलेल्या ११.७७ पेटाफ्लॉप्स क्षमतेच्या 'अर्का' सुपरकॉम्प्युटरचा मोठा वाटा आहे. या सुपरकॉम्प्युटरमध्ये ३३ पेटाबाइट्स इतकी साठवण क्षमता असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा प्रक्रिया शक्य झाली आहे. “पूर्वीचा सुपरकॉम्प्युटर 'प्रत्युष' हवामान मॉडेल चालवण्यासाठी १० तास घेत असे, तर 'अर्का' हेच कार्य केवळ चार तासांत पूर्ण करू शकतो,” अशी मुखोपाध्याय यांनी माध्यमांना दिली.'भारत अंदाज प्रणाली'च्या माध्यमातून हवामान अंदाज अधिक अचूक होणार असून, आपत्ती व्यवस्थापनासाठीही ती एक प्रभावी साधन ठरणार आहे.
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\