मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणे हीच अटलजींना खरी श्रद्धांजली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

असुया न बाळगता निवडणूकीत उतरा

    25-Dec-2025   
Total Views |
 Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) आज आपण अटल बिहारी वाजपेयीजींना आदरांजली देतोच आहोत, पण खरी आदरांजली ही १६ जानेवारीला द्यायची आहे. जेव्हा या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल त्यादिवशी अटलजींना खरी श्रद्धांजली आम्ही देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्र चरित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम, आ. कालिदास कोळंबकर, आ. विद्या ठाकूर, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, सरचिटणीस श्वेता परुळेकर, राजेश शिरवाडकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत मातेच्या या सुपुत्राने जवळजवळ पाच दशकांपेक्षा जास्त काळ या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या नवभारताचा पाया रचणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. एक स्वयंसेवक, पत्रकार, हिंदू चिंतक, कवी, साहित्यिक, राजकारणी आणि अर्थशास्त्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेले काम पाहता ते केवळ नेता नसून स्टेट्समन होते. त्यांनी विपरित काळात भाजपला नेतृत्व दिले आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून कधीही तडजोड केली नाही. ज्यावेळी ते पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री बनले, त्यावेळी त्यांनी परिभाषित केलेले भारताचे परराष्ट्र धोरण आजही महत्वाचे मानले जाते. मध्यंतरीच्या काळामध्ये ते धोरण बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर भारताला त्याचे सहन करावे लागले."
 
"अटलीजींनी संपूर्ण देशात मोठे परिवर्तन घडवले. रस्ते, दूरसंचाराचे जाळे उभे करून भारताला अनुसंपन्न केले. अटलजी नेहमी म्हणायचे की जगात जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो त्यामुळे बलवान असणे हाच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बहिष्कृत केल्यावर अटलजी म्हणाले की, १०० कोटीच्या भारताला जगाची आवश्यकता नाही, तर १०० कोटीचा भारत ही जगाची आवश्यकता आहे. अटलजींच्या काळात भारताची अर्थव्यवस्था वाढली, त्यांनी ६ कोटी रोजगार तयार केले. त्यांना अनेक भाषा ज्ञात होत्या. सगळ्या प्रकारच्या साहित्यांचा अभ्यास होता.
 
त्यांनी याच मुंबईमध्ये चित्रपटगृहांत बसून मराठी नाटके पाहिली आहेत. तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव देशाचे यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्ता विरुद्ध भूमिका मांडण्यासाठी आपल्या परराष्ट्र मंत्र्याला न पाठवता तेव्हाचे विरोधी पक्षनेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना पाठवले आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे सगळे देश भारतासोबत आले आणि पाकिस्तान वेगळा पडला," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अटलजींच्या कवितेच्या ओळी वाचल्या. हिंदुत्वाची व्याख्या परिभाषित करणारे अटल बिहारी वाजपेयी होते. महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांचे तेज, तप, तलवार, तिखट विचार मांडणारे ते होते,” असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा : CM Yogi Adityanath : "अतिक्रमण करणारा कोणीही असो... सोडणार नाही!"; योगी आदित्यनाथ यांचा आक्रमक पवित्रा
 
मुंबईत अटलजींचे स्मारक उभारणार
 
“आजच्या दिवशी केवळ अटलजींची आठवण करून चालणार नाही, तर त्यांनी दाखवलेला मार्ग, विचार, दृढता, देशाभिमान, राष्ट्रवादावर चालत आपल्याला पुढे जायचे आहे. मुंबईत अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष जन्माला आलेला आहे. आम्ही अटल सेतू तयार केला असला तरी अटलजींचे एक उत्तम स्मारक या झाले पाहिजे, अशी आमची इच्छा असून पुढच्या काळात ती आम्ही निश्चित पूर्ण करू,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
ही मुंबईकरांची लढाई
 
“मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आणून 'अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा' हे दाखवायचे आहे. कुणाला महापौर बनवण्याकरिता आमची ही लढाई नसून ही मुंबईकरांची लढाई आहे. मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या विळख्यात टाकून ते मरत असताना प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे कोण होते, हे मुंबईकरांना सांगायचे आहे. मुंबईकरांना मदतीची आवश्यकता असताना कोण महालात बसले होते आणि कोणाचे लोक त्यांना लुटत होते, याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही निवडणूकीत उतरलो आहोत. पारदर्शी, प्रामाणिकतेतून मुंबईची महापालिका चालली पाहिजे हा संकल्प घेऊन राष्ट्रवादी शक्तींच्या विरुद्ध असलेली जिहादी मानसिकता ठेचण्यासाठी या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत.”
 
असुया न बाळगता एक संघपणे निवडणूकीत उतरा
 
“महापालिका निवडणूकांमध्ये २२७ जागा आहेत. आपण महायुती करणार आहोत. काही जागा शिवसेना लढतील, काही आपण लढू. अनेकांच्या इच्छा असू शकतात, अनेक चांगले कार्यकर्ते आहेत, पण शेवटी काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहे. मात्र, तिकीट मिळो अथवा न मिळो आम्हाला अटलजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरायचे आहे, असा संकल्प करावा लागेल. आपण एक अशा प्रकारची लढाई आपण लढतो आहोत जी मुंबई आणि मुंबईकरांचे भाग्य बदलणारी ठरणार आहे. आपण मुंबईचा चेहरा आणि मुंबईचे चित्र बदलवून दाखवले. मुंबईकरांचा आपल्यावर विश्वास असून तो अधिक दृढतेने वास्तविकतेत परिवर्तित करण्याकरिता आपण मैदानात उतरलो आहोत. त्यामुळे कुठल्याही किंतु परंतू न ठेवता, कुणीही कुणाबद्दल असुया न बाळगता आमचे चिन्ह आणि आमचा उमेदवार कमळ आहे हा भाव ठेवून एक संघपणे या निवडणुकीमध्ये उतरावे,” असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
 
हे वाचलत का? - "ज्या देशाला स्वतःची लाज वाटत नाही, त्याला..."; मुंबईच्या विरांशने केली पाकिस्तानची बोलती बंद!
 
आज विठ्ठलाला बडव्यांनी घेरले नाही का? - आ. अमीत साटम
 
"आज अटलजींची शंभरावी जन्मजयंती साजरा करीत असून आजचा दिवस हा गुड गव्हर्नन्स डे म्हणूनही आपण साजरा करतो. १९६० ते २०१४ हा एक आणि २०१४ ते २०२५ हा मुंबईचा दुसरा अध्याय आहे. या ११ वर्षाच्या दुसऱ्या अध्यायात मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, सीसीटीव्ही कॅमेरा, वरळीतल्या बीडी चाळीतल्या मराठी माणसाला घर, या माध्यमातून सुशासन काय असते याचा प्रत्यय मुंबईकर जनतेला दिला. ज्यावेळी आपण सुशासनाच्या गोष्टी करतो, त्याचवेळी काही लोक कुटुंबाच्या गोष्टी करत असतात. परंतू, मुंबई शहराची आणि मराठी माणसाची सेवा कुणी केली हे मुंबईकरांना माहिती आहे.
 
काही लोक एकत्र आले पण, वेगळे का झाले होते याचे उत्तर द्यावे. आज विठ्ठलाला बडव्यांनी घेरले नाही का? किंवा आता फक्त खान राहिला आणि बाण निघून गेला, हे सत्य नाही का? मुंबईची महानगरपालिका ही एका परिवाराची जहागीर नाही. ही मुंबईची महानगरपालिका या शेवटच्या उभ्या असलेल्या मुंबईकरांचे जीवनमान उंचवण्याची एक संघटना आहे. मुंबईच्या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जीवाचे रान करून मुंबईकरांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे."
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....