"ज्या देशाला स्वतःची लाज वाटत नाही, त्याला..."; मुंबईच्या विरांशने केली पाकिस्तानची बोलती बंद!

    25-Dec-2025   
Total Views |

Viraansh Bhanushali

मुंबई : (Viraansh Bhanushali)
मुंबईत जन्मलेला आणि सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या वीरांश भानुशाली याच्या भाषणाने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध 'ऑक्सफर्ड युनियन'मध्ये झालेल्या एका वादविवादात त्याने पाकिस्तानच्या मुद्द्यावरून भारताची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Viraansh Bhanushali)

ऑक्सफर्ड युनियन सोसायटीमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद स्पर्धा पार पडली होती. या वादविवादात भारताच्या बाजूने मूळचा मुंबईचा असलेला वीरांश भानुशाली आणि पाकिस्तानी बाजूने मुसा हर्राज याने भाग घेतला होता. हा वादविवाद २७ नोव्हेंबर रोजी झाला होता, परंतु आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Viraansh Bhanushali)

वादविवादाचा मुद्दा असा होता की, "भारताचे पाकिस्तानबाबतचे धोरण केवळ निवडणुका जिंकण्यासाठी तयार केलेले एक 'लोकप्रिय राजकारण' आहे का, ज्याला सुरक्षा धोरण असे नाव दिले जाते?" वीरांशने या प्रस्तावाच्या विरोधात भाषण केले आणि भारताचे धोरण हे लोकप्रियतेसाठी नसून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या खऱ्या आणि गंभीर चिंतेवर आधारित आहे, असा खणखणीत युक्तिवाद केला.(Viraansh Bhanushali)

"ज्या देशाला मुळातच स्वतःची लाज वाटत नाही, त्याला तुम्ही अधिक काय लाजवणार?"

चर्चेदरम्यान, मुंबईतील २६/११ चा हल्ला, पठाणकोट, उरी, पुलवामा आणि पहलगामच्या घटनांचा उल्लेख करून येथील दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत त्यांनी तीव्र शब्दात उत्तर दिले की, "दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशाने इतरांना नैतिकतेचे व्याख्यान देऊ नये. ज्या देशाला मुळातच स्वतःची लाज वाटत नाही, त्याला तुम्ही अधिक काय लाजवणार?" त्याच्या या वाक्यावर उपस्थितांची मनं जिंकली.

"भारताचे धोरण दिखाव्याचे नाही, तर सुरक्षेचे आहे"

चर्चेदरम्यान मुसा हर्राज यांनी भारताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "भारतात जेव्हा जेव्हा कोणतीही समस्या उद्भवते, तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तानला दोष दिला जातो. भारत सरकार पाकिस्तानच्या नावावर भीती दाखवून लोकांचा पाठिंबा मिळवू इच्छिते. ही सुरक्षा आहे की फक्त राजकारण?". यावर विरांशने चोख उत्तर दिले. तो म्हणाला, "मी मुंबईचा आहे. मी २६/११ चा हल्ला माझ्या डोळ्यासमोर होताना पाहिला आहे. त्या रात्री माझी मावशी त्याच स्टेशनवरून जात होती, जिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. ती योगायोगाने वाचली, पण १६६ लोक वाचू शकले नाहीत. तुम्ही याला राजकारण म्हणाल का?"
 
हर्राज यांनी पुन्हा प्रश्न केला, की "प्रत्येक देशात हिंसा होते. प्रत्येक वेळी कठोर धोरण अवलंबणे आवश्यक आहे का? हा जनतेला खूश करण्याचा मार्ग नाही का?" यावर "जर घराच्या आसपास चोऱ्या होत असतील, तर तुम्ही दरवाजाला कुलूप लावणार नाही का? कुलूप लावणे हा दिखावा आहे की सुरक्षा? भारताचे धोरणही असेच आहे", असे उत्तर वीरांशने दिले.(Viraansh Bhanushali)

"वादविवाद जिंकण्यासाठी युक्तिवादांची गरज नाही, फक्त एक कॅलेंडर हवे आहे"

चर्चेदरम्यान, वीरांश म्हणाला की ही चर्चा जिंकण्यासाठी त्याला भाषण किंवा युक्तिवाद नव्हे तर कॅलेंडरची आवश्यकता आहे. त्याने तारखांची यादी सांगितली आणि विचारले, "१९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट झाला तेव्हा कोणती निवडणूक होती? २००८ मध्ये २६/११ झाला तेव्हा कोणती निवडणूक होती? पठाणकोट, उरी, पुलवामा हे सर्व फक्त मतांसाठी झाले का? नाही, हे हल्ले झाले कारण दहशतवाद सातत्याने भारतावर लादला गेला."(Viraansh Bhanushali)

यावर हर्राज म्हणाला, "जर असं असेल तर २६/११ नंतर भारताने युद्ध का केले नाही? जर धोका खरोखरच इतका गंभीर होता तर?" यावर विरांशने उत्तर दिले, "कारण भारताने जबाबदारी दाखवली. त्यावेळी जनतेचा राग खूप होता. जर सरकारला फक्त लोकप्रिय व्हायचे असते, तर त्यांनी लगेच हल्ला केला असता. पण भारताने संयम ठेवला, पुरावे दिले, जगाला दाखवले की कोण दोषी आहे. हे राजकारण नव्हते, तर शहाणपण होते." मग त्याने प्रतिप्रश्न केला की, "त्या संयमामुळे शांतता मिळाली का? नाही. त्यानंतरही पठाणकोट, उरी आणि पुलवामा झाले. म्हणून आपल्याला आपल्या सुरक्षेला गांभीर्याने घ्यावेच लागेल."(Viraansh Bhanushali)

हर्राज म्हणाला की, ठतुम्ही (भारत) आजही प्रत्येक घटनेसाठी पाकिस्तानला जबाबदार धरता. हे योग्य आहे का?यावर विरांशने उत्तर दिले, "अलीकडेच पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आले. त्यांनी हे विचारले नाही की त्यांनी कोणाला मत दिले. ते फक्त भारतीय होते. ही देखील राजकारण आहे का?"नागरिकांचे संरक्षण करण्याच्या व्यापक परिणामांबद्दल बोलताना विरांशने विचारले, "स्वतःच्या नागरिकांना मारले जाण्यापासून वाचवणे लोकप्रिय आहे का?" भानुशाली यांनी भारताच्या कृतींची तुलना त्याच्या शेजारील देशाच्या कृतींशी केली. ते म्हणाले, "जर तुम्हाला सुरक्षेच्या नावाखाली खरा लोकप्रियतावाद पहायचा असेल तर रॅडक्लिफ रेषेच्या पलीकडे पाहा."(Viraansh Bhanushali)

"भारताला युद्ध नको आहे, परंतु जोपर्यंत आपला शेजारी देश (पाकिस्तान) परराष्ट्र धोरणाचे शस्त्र म्हणून दहशतवादाचा वापर करणे थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही. आपण तयार राहू. जर आपल्या लोकांचे प्राण वाचवणे म्हणजे लोकप्रियतावादी असणे असेल, तर होय, आम्ही लोकप्रियतावादी आहोत. पण ही जबाबदारी आहे, राजकारण नाही.(Viraansh Bhanushali)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\