अंतराळात भारताची उंच भरारी; 'ब्लूबर्ड ब्लॉक-२'चे यशस्वी प्रक्षेपण

    24-Dec-2025   
Total Views |

Bluebird Block-2
 
मुंबई : ( Bluebird Block-2 ) आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने बुधवारी सकाळी LVM3-M6 रॉकेटद्वारे अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-२ यशस्वीपणे प्रक्षेपित केला. ६,१०० किलोग्रॅम वजनाचा ब्लूबर्ड हा आतापर्यंत भारतातून प्रक्षेपित झालेला सर्वात जड उपग्रह आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी याला देशासाठी मोठे यश म्हटले आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपित झालेला LVM3-M5 कम्युनिकेशन सॅटेलाइट-०३ सुमारे ४,४०० किलो वजनाचा होता, जो जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापन करण्यात आला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लूबर्ड ब्लॉक-2 ज्या LVM3-M6 रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आला, त्याचे वजन साधारण ६४० टन आहे. हे भारताचे सर्वात जड प्रक्षेपण वाहन आहे. ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा नेक्स्ट-जनरेशन कम्युनिकेशन सॅटेलाइट असून सामान्य स्मार्टफोनपर्यंत थेट हाय-स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. या उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाहून, मोबाईल टॉवरशिवाय ४-जी व ५-जी व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग, स्ट्रीमिंग आणि डेटा सेवा उपलब्ध होतील. हे मिशन न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकेतील एएसटी स्पेसमोबाइल यांच्यातील व्यावसायिक कराराचा भाग आहे. न्यूस्पेस इंडिया ही इस्रोची व्यावसायिक शाखा आहे.
 
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४३.५ मीटर उंच LVM3-M6 रॉकेट बुधवारी सकाळी ८:५४ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून उड्डाण घेऊन निघाले. सुमारे १५ मिनिटांच्या उड्डाणानंतर ब्लूबर्ड ब्लॉक-२ रॉकेटपासून वेगळा झाला आणि सुमारे ५२० किमी उंचीवर लो अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. प्रक्षेपण ९० सेकंद उशिरा, सकाळी ८:५५:३० वाजता करण्यात आले. कारण श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष क्षेत्रावरून हजारो सक्रिय उपग्रह सतत जात असल्याने इतर उपग्रहांशी धडक होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रक्षेपण वेळ ९० सेकंदांनी वाढवण्यात आली होती.
 
हेही वाचा : बांग्लादेशी महिलांना २४ तासांत भारत सोडण्याचे आदेश!
 
LVM3 नेच चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले होते
 
LVM3-M6, ज्याला GSLV Mk-III असेही म्हणतात, हे इस्रोचे तीन टप्प्यांचे रॉकेट आहे. यात क्रायोजेनिक इंजिन असून ते इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स सेंटरने विकसित केले आहे. उड्डाणासाठी त्याला दोन 'एस २०००' सॉलिड बूस्टर लावलेले आहेत, जे तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये तयार करण्यात आले आहेत. हे LVM3 चे नववे उड्डाण आणि ब्लूबर्ड ब्लॉक-२ साठी तिसरे व्यावसायिक मिशन आहे. इस्रोच्या मते LVM3 ने आतापर्यंत सलग ८ यशस्वी प्रक्षेपण पूर्ण केली आहेत, ज्यात चंद्रयान-२ आणि चंद्रयान-३ यांसारखी महत्त्वाची मिशन्स समाविष्ट आहेत.

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक महत्त्वाची झेप…
 
भारताच्या तरुणाईच्या बळावर आपला अंतराळ कार्यक्रम अधिक प्रगत आणि अधिक प्रभावी होत चालला आहे. LVM3-M6 चे यशस्वी प्रक्षेपण, ज्याद्वारे अमेरिकेचा ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा भारतातून आतापर्यंत प्रक्षेपित झालेला सर्वात जड उपग्रह त्याच्या निश्चित कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला, हा भारताच्या अंतराळ प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा आहे. LVM3 ने विश्वासार्ह जड-भार उचलण्याची क्षमता सिद्ध केल्यामुळे गगनयान सारख्या भविष्यातील मोहिमांसाठी पायाभरणी मजबूत होत आहे, व्यावसायिक प्रक्षेपण सेवा विस्तारत आहेत आणि जागतिक भागीदाऱ्या अधिक सशक्त होत आहेत. ही वाढलेली क्षमता आणि आत्मनिर्भरतेला मिळालेली चालना येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत आशादायक आणि प्रेरणादायी आहे. आपल्या मेहनती अंतराळ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 
हे वाचलत का? - Chhattisgarh : धर्मांतर आणि दफन वादामुळे छत्तीसगड राज्यव्यापी बंद
 
ब्लूबर्ड ब्लॉक-२ उपग्रहाचे प्रक्षेपण मोठे यश आहे. लाँच व्हेईकलने ब्लूबर्ड ब्लॉक-२ उपग्रह ठरवलेल्या कक्षेत अचूकपणे स्थापित केला आहे. हे एएसटी स्पेसमोबाइलसाठी पहिले समर्पित व्यावसायिक प्रक्षेपण आहे. हे श्रीहरिकोटातून झालेले १०४ वे प्रक्षेपण आणि LVM-3 चे नववे यशस्वी मिशन असून यामुळे त्याची १००% विश्वासार्हता सिद्ध होते. हे ५२ दिवसांत झालेले LVM-3 चे दुसरे सलग मिशन आहे.
 
- व्ही. नारायणन, अध्यक्ष, इस्रो
 
जगभर सेल्युलर ब्रॉडबँड - अमेरिकन कंपनीचा उद्देश
 
एएसटी स्पेसमोबाइल ही अमेरिकन कंपनी अंतराळाधारित सेल्युलर ब्रॉडबँड नेटवर्क तयार करत आहे, जे थेट स्मार्टफोनला जोडता येईल. हे नेटवर्क व्यावसायिक तसेच सरकारी वापरासाठी डिझाइन केलेले आहे. कंपनीने सप्टेंबर २०२४ मध्ये ब्लूबर्ड-१ ते ब्लूबर्ड-५ असे पाच उपग्रह प्रक्षेपित केले होते, जे अमेरिका व काही इतर देशांमध्ये सतत कव्हरेज देतात. भविष्यात आणखी उपग्रह प्रक्षेपित करून नेटवर्क वाढवण्याची योजना आहे. कंपनीने जगभरातील ५० पेक्षा जास्त मोबाईल ऑपरेटर्स सोबत भागीदारी केली आहे. त्यांचा उद्देश जगातील प्रत्येक भागात सेल्युलर ब्रॉडबँड पोहोचवणे हा आहे, विशेषतः जिथे पारंपरिक नेटवर्क पोहोचू शकत नाही. यामुळे शिक्षण, सोशल नेटवर्किंग, आरोग्यसेवा अशा अनेक क्षेत्रांत नवीन संधी उपलब्ध होतील. कंपनीनुसार, ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना आपल्या मोबाईल सेवा पुरवठादारामध्ये बदल करण्याची गरज भासणार नाही.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक