नवीन कायद्यांमुळे दोष सिद्धीचे प्रमाण ९६.२४ टक्क्यांवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

    14-Dec-2025   
Total Views |
Devendra Fadnavis
 
नागपूर : ( Devendra Fadnavis ) तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर गुन्ह्यांतील दोष सिद्धीचे प्रमाण ९६.२४ टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "क्राइम इन इंडियाच्या रेकॉर्डनुसार, महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ मध्ये गुन्ह्यांची संख्या जवळपास ७ हजार ७११ ने कमी झाली असून, ही अडीच टक्क्यांची घट आहे. मात्र, खून, दरोडा, चोरी आणि घरफोडी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांत ३७५ ने वाढ नोंदवली गेली आहे. २०१३ मध्ये दोष सिद्धीचे प्रमाण केवळ ९ टक्के होते. म्हणजे १०० गुन्हेगारांपैकी ९१ जण सुटायचे. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढले. आता केंद्राच्या तीन नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर दोष सिद्धीचे प्रमाण ९६.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे. या कायद्यांचा गुन्हे सिद्धतेला खूप मोठा फायदा झाला आहे."
 
"डायल ११२ वर येणाऱ्या कॉलचा प्रतिसाद वेळ पूर्वी १५ मिनिटे होता, तो आता ७.३७ मिनिटांपर्यंत खाली आला आहे. २०१३ नंतर 'फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट' धोरण सुरू केल्याने महिलांच्या गुन्ह्यांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली. पूर्वी गुन्हे घडत असतानाही समाजाचा दबाव असायचा, पण आता महिला स्वतः पुढे येऊन तक्रारी नोंदवत आहेत," असेही त्यांनी सांगितले.
 
महिलांसंबंधित गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांत आरोपपत्र
 
"महिलांसंबंधित गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांत ९९.१ टक्के गुन्हे दाखल होत आहेत. 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत २०१५ ते २०२४ पर्यंत १३ मोहिमा राबवून ४१ हजार १९३ मुले-मुलींना शोधून कुटुंबीयांना सुपूर्त केले. तर 'ऑपरेशन शोध' अंतर्गत ४ हजार ९६० महिला आणि १ हजार ३६४ बालकांचा शोध घेण्यात आला."
 
हेही वाचा : राज्याची आर्थिक स्थिती उत्तम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
 
मुंबई सुरक्षित शहर
 
"केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, महिला किंवा मुलगी घरातून निघून २४ तासांत परतली नाही तर फौजदारी गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्रात अपहरण झालेल्यांना परत आणण्याचा दर ९० टक्के आहे. मुंबईत हा दर ९९ टक्के आहे. मुंबईत रोज अपहरणाच्या बातम्या येतात, पण पोलिस त्यांना परत आणते हे मात्र कुणी सांगत नाही. यामुळे मुंबई सुरक्षित शहर आहे," असेही ते म्हणाले.
 
सायबर गुन्ह्यांसाठी महासायबर नेटवर्क
 
"गेल्या १० वर्षांत ८८ हजार ६३३ आणि गेल्या तीन वर्षांत ५१ हजार २०७ पोलिसांची भरती झाली. आता पुन्हा २५ हजार पोलिसांची भरती सुरू आहे. सायबर गुन्ह्यांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "महासायबर नेटवर्क तयार केले असून, त्याचे मुख्यालय देशातील सर्वात आधुनिक आहे. तीन-चार राज्ये आणि दोन देश आमच्याकडे असे मुख्यालय उभारण्यासाठी मदत मागत आहेत. सायबर फसवणूक, फेक कॉल सेंटर, डिजिटल अरेस्ट आणि सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात कारवाई करून लोकांना वाचवले आहे. १०० हून अधिक लोकांना आत्महत्येपासून रोखले आहे."
 
हे वाचलत का? - महाराष्ट्र आता थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
 
अमली पदार्थांसंदर्भात झिरो टॉलरन्स
 
"अमली पदार्थ हा आज आपल्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अमली पदार्थांसंदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. आता मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून, हजारो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. अमली पदार्थ जप्त केल्यानंतर ते पुन्हा वापरात येऊ नयेत यासाठी ते नष्ट केले जाते. मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर मोक्का लावला जातो. यात सहभागी असलेल्या पोलिसांनाही बडतर्फ करण्यात आले आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
९९ टक्के सापळ्यांमध्ये यशस्वी
 
भ्रष्टाचारासंदर्भात गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात सापळे रचले जात आहेत. आम्ही ९९ टक्के सापळ्यांमध्ये यशस्वी झालो आहोत. जितके जास्त भ्रष्टाचारी सापडतील, तितका अशा गुन्ह्यांवर आळा बसेल आणि भ्रष्टाचार कमी होईल. राजकीय विरोधकांवर सुडभावनेने कोणतेही गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हेगारी प्रवृत्ती आळा घालण्याची शासनाची इच्छा आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडायचे नाही, हा आमचा प्रयत्न आहे. यात पोलिसांकडून चूक झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....