महाराष्ट्र आता थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल

    14-Dec-2025   
Total Views |
Devendra Fadnavis
 
नागपूर : ( Devendra Fadnavis ) "महाराष्ट्र आता थांबणार नाही हे आपण ठरवले आहे. आमचा प्रयत्न सकारात्मकतेने पुढे जायचा आहे. २०३५ चा अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यामुळे पुढचा काळ आपल्याकरिता महत्वाचा आहे. अमृतमहोत्सवाकडे जाताना रचनात्मक कार्यातून आपण महाराष्ट्राला वेगाने पुढे नेऊ शकतो. विरोधी आणि सत्तारुढ पक्ष असले तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत. त्यामुळे एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
 
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "नवीन सरकार आल्यानंतर १ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून या कालावधीत आलेल्या विविध आव्हानांचा सरकारने समर्थपणे सामना केला. महायुतीतील आम्ही तिन्ही नेते एकत्र निर्णय करतो आणि झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली असून आता महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणूका होतील. अनेक वर्षे निवडणूका न झाल्याने स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मनात दु:ख होते. पण आता या निवडणूका सुरु झाल्याने पुढच्या काळात महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे, असे म्हणत त्यांनी एक हिंदी कविता सादर करत आपला दृढनिश्चय व्यक्त केला. ते म्हणाले, "अब आगे बढ़ चुका हूँ मै, पिता है जितना जहर, पी चुका हूँ मै. अब पग नही रुकने वाले, चल चुका हूँ मै. जितना पढना था तुमको, पढ चुका हूँ मै. अब और आगे बढ चुका हूँ मै."
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या आरोग्य सेवेला मिळणार 'बूस्टर'
 
चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार
 
"महाराष्ट्राच्या सामर्थ्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्र शक्तीशाली राज्य आहे, त्यामुळे कुठलाही संभ्रम ठेवण्याची गरज नाही. कोणीही मनात शंका घेऊ नये, की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. निवडणुका जवळ आल्या, की अशा चर्चा सुरू होतात. पण, मी आश्वस्त करतो, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील. छत्रपती शिवरायांच्या तत्वाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच महाराष्ट्र चालत राहील. सीबीएसईच्या पुस्तकात याआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासावर एक परिच्छेद होता, तर मुघलांचा इतिहास १७ पानांचा होता. आता नवीन पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहास २१ पानांचा घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभार," असे ते म्हणाले.
 
५ वर्षे कुठलीच योजना बंद होणार नाही
 
"अनेकांनी शंका उपस्थित केली होती, की आम्ही अनेक योजना सुरू केल्या होत्या. लाडकी बहिण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीजेची असेल. निवडणुका झाल्या की त्या बंद होतील, असा दावा काहींनी केला होता. पण, यातील कोणतीही योजना आम्ही बंद केलेली नाही. पुढची पाच वर्षे या योजना सुरू राहतील. २०२९-३०च्या दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्र असेल, यादृष्टीने काम सुरू आहे", अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
तोंड दाखवायला जागा उरणार नाही
 
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना विदर्भाच्या विकासाबाबत बोला, असे विधान खाली बाकावर बसून उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "मुख्यमंत्री बोलत असताना, मध्ये बोलायचे नसते हा सिद्धांत आहे. तुम्ही नवीन असल्याने सभागृहाचे नियम माहिती नाहीत. पण, मी जर तुम्ही (महाविकास आघाडी सरकारने) काय केले आणि आम्ही काय केले याची तुलना करीत राहिलो, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नाही, हे लक्षात ठेवा," असे ते म्हणाले.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....