Chandrashekhar Bawankule : लोकशाहीमध्ये प्रक्षोभक भाषा योग्य नाही

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; चर्चेसाठी आमचे दार खुले

    29-Oct-2025   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) लोकशाहीमध्ये सर्वांनाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण लोकशाहीमध्ये प्रक्षोभक भाषा योग्य नाही. प्रक्षोभक भाषा करून जमावाला चिथावणी देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले. नागपूर येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात रवीकांत तुपकर यांनी केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "मागच्या वेळी अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे आंदोलन झाले तेव्हा मी स्वत: त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली. त्यातील बऱ्यापैकी मुद्दे सुटले, काही मुद्दे राहिले. यातील काही मुद्दे धोरणात्मक तर काही आर्थिक आहेत. शेतकरी कर्जमाफीबद्दल समिती नेमण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यादृष्टीने ती समिती काम करत आहे. यावेळीही मी २६ तारखेलाच बच्चू कडू यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याची विनंती केली. २७ आणि २८ तारखेलाही माझी चर्चा सुरुच होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केल्यावर त्यांचा कुणीही प्रतिनिधी आला नाही. चर्चेकरिता आमचे दार अजूनही खुले आहेत. त्यांनी त्यांचा दिवस कळवावा, त्यानुसार मुख्यमंत्री बैठक घेतील."
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : सरकार चर्चेस तयार, चर्चेतून मार्ग काढा
 
आंदोलनस्थळी बैठक कशी होणार?
 
"आज सकाळीही मी बच्चू कडू यांना ८-१० वेळा फोन केला. काल रात्रीही त्यांच्याशी बोललो. त्यांच्या मागण्यांवर किमान चर्चा करावीच लागेल. परंतू, ऐकून न घेता सरकारला दोष देणे, बैठकीला न येणे या भूमिकेतून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करण्यासाठी त्यांनी बैठकीला आले पाहिजे. उच्चस्तरीय बैठक मुंबईतच होऊ शकते. त्यांच्या प्रश्नावर मंत्रालयातून मार्ग निघेल. आंदोलनस्थळी बैठक कशी होणार? सरकारकडून चर्चेचे दार खुले आहेत. त्यांनी ते बंद करू नये. ते बैठकीला आल्यावर सरकार त्यांना अटक करतील एवढे मोगलशाहीचे हे सरकार नाही. मुंबईतील मंत्रालयात किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करूनच निर्णय घेतला येईल," असेही ते म्हणाले.
 
"मुख्यमंत्र्यांनी दीड तास वाट बघितली पण राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, बच्चू कडू यांच्यापैकी एकही प्रतिनिधी आले नाहीत. सरकारवर आकस काढणे किंवा शेतकऱ्यांच्या मनात दुजाभाव निर्माण करून राजकारण होऊ नये. बच्चू कडू यांनी पुढाकार घ्यावा, सरकार चर्चेसाठी तयार आहे," असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा :  शाळांत संपूर्ण वंदे मातरम् गायन निर्णयाचे राम नाईक यांच्याकडून स्वागत
 
ठाकरे सरकारसारखे आम्ही हुकुमशाह नाहीत
 
"आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सरकारसारखे हुकुमशाह नाहीत. उद्धव ठाकरे यांनी मला ओबीसी आरक्षणाकरिता तुरुंगात टाकले होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासारखे हुकुमशाह नसून आमचे सरकार लोकशाही मार्गाने सर्वांना न्याय देणारे सरकार आहे," असेही मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.
 
राऊतांचा बोलघेवडेपणा
 
"संजय राऊत यांनी उद्या माझी संपत्ती घ्यावी आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. माझ्या प्रतिज्ञापत्रात माझी संपत्ती दिली आहे. त्यापेक्षा जास्त निघाल्यास ती संजय राऊत यांनी घेऊन टाकावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, असे माझे त्यांना आवाहन आहे. हा केवळ बोलघेवडेपणा आहे. आम्ही भ्रष्टाचाराला कधीच थारा दिला नाही. आमच्या रक्तात भ्रष्टाचार नाही. त्यामुळे त्यांचा फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे," असे प्रत्युत्तरही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....