शाळांत संपूर्ण वंदे मातरम् गायन निर्णयाचे राम नाईक यांच्याकडून स्वागत
29-Oct-2025
Total Views |
मुंबई : ( Ram Naik ) संसदेत ‘वंदे मातरम्’ गायनाची परंपरा सुरु करविणाऱ्या उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमधून संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायनाचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांचे अभिनंदन केले आहे. शासनाकडे सार्धशताब्दीनिमित्त शाळांत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायनाची मागणी करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’चेही राम नाईक यांनी आभार मानले आहेत.
राम नाईक यांनी संसदेत ‘वंदे मातरम्’ सुरु होण्यामागेही काही शाळांमध्ये त्याकाळी ‘वंदे मातरम्’ गायनाबाबत दाखविली जाणारी उदासीनता कारणीभूत होती, असे सांगितले. ती दूर करून नव्या पिढीवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करण्यासाठी, त्यांना ‘वंदे मातरम्’ गायनाची प्रेरणा मिळावी यासाठी देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावरून – अर्थात संसदेतून देशाचे अग्रणी नेते ‘वंदे मातरम्’ गाताना दिसले तर सकारात्मक परिणाम होईल. तसेही ज्या घटनेने ‘जन गण मन’ व ‘वंदे मातरम्’ ला राष्ट्रगीत व राष्ट्रगानाचा दर्जा दिला त्या घटनेचा प्रमुख स्तंभ असलेल्या संसदेत 1991 पर्यंत या गीतांचे गायनच होत नव्हते, ते योग्य नाही, या भूमिकेतून राम नाईक यांनी त्यावेळी केलेल्या प्रयत्नांनंतर संसद अधिवेशनाचा समारोप ‘वंदे मातरम्’ ने करण्याची परंपरा 23 डिसेंबर 1992 पासून सुरु झाल्याची माहितीही यावेळी राम नाईक यांनी दिली.