पुणे : (Devendra Fadnavis) सगळ्या प्रकारच्या चर्चेची राज्य सरकारची तयारी असून चर्चा करून मार्ग काढावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बच्चू कडू यांना केले आहे. तसेच कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपूर येथे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "सरकारने पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका ठेवली आहे. आंदोलनाच्या आधीही आम्ही बैठक बोलवली होती. यातून चर्चा करून ज्या गोष्टी शक्य आहे त्या करू असे सांगितले होते. बच्चू कडू यांनी पहिल्यांदा त्याला मान्यताही दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री आम्ही बैठकीला येऊ शकणार नाही, असा संदेश मला पाठवला. आजही चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. नुसत्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले वेगवेगळे प्रश्न सोडवू शकू, अशी परिस्थिती नाही. त्यासाठी चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल. त्यामुळे आम्ही त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे."
"रस्ते अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास झाला आहे. रुग्णांची ओरड पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांनी लोकांना त्रास होईल अशा गोष्टी न करता चर्चा करावी, असे आवाहन केले. अनेकदा अशा आंदोलनांमध्ये हौशे, नवसे, गवसे लोकही शिरतात. अनेक लोक आंदोलनात शिरून त्याला हिंसक वळण कसे लाभेल, याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत रेल रोको सारखे प्रकार करणे योग्य नाही आणि ते करू दिले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सकारात्मक आहोत. याच सरकारने ३२ हजार रुपये कोटींचे पॅकेज दिले असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देत आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी असून चर्चा करून मार्ग काढावा," असे आवाहन त्यांनी केले.
आधी मदत शेतकऱ्यांना की, बँकांना?
"कर्जमाफीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली असून त्यासाठी समितीही तयार केली आहे. आज जे शेतकरी अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पावसामुळे खराब झालाय त्यांना आधी मदत करायची की, बँकांना मदत करायची? हा महत्वाचा प्रश्न आहे. कर्जमाफी केल्यावर ते पैसे बँकांना जातात. त्यामुळे थेट शेतकऱ्यांना लाभ मिळतो असे नाही. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. आम्ही कधीच कर्जमाफी न करण्याची भूमिका घेतली नाही. योग्यवेळी त्यासंदर्भातील निर्णय करू," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर-हैदराबाद महामार्गावर आंदोलन सुरु आहे. या ठिय्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून अनेक रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. या गैरसोईची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांना सहा वाजेच्या आत आंदोलनस्थळ सोडण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बच्चू कडू यांना न्यायालयाचा आदेश दाखवला. त्यानंतर कडू यांनी आम्ही इथून हटायला तयार आहोत, पण पोलिसांनी आमच्या आंदोलनाची सोय करावी. आमची तुरुंगात सोय करावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही हे आंदोलन सुरुच होते.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....