मुंबई : वसई मध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "वसईमध्ये भरस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणामध्ये कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करत पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, "वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषाआरोपपत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
"खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होऊन हत्येपर्यंत मजल जाणं आणि त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणे हे फारच चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.