"तुम्ही मुख्यमंत्री झाले तेव्हा कर्नाटक..."; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

    02-May-2024
Total Views | 162

Fadanvis & Thackeray 
 
मुंबई : तुम्ही मुख्यमंत्री झाले, तेव्हा कर्नाटक पहिल्या क्रमांकावर, तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर होता. महाराष्ट्राची अस्मिता सांगणाऱ्या तुमच्या मनगटात तेव्हा जोर नव्हता का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच निवडणुका जवळ आल्या, की लबाड लांडग्यांची वळवळ सुरू होते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, उद्योगधंदे गुजरातला पळवणार, असा अपप्रचार केला जातो. पण मी त्यांना सांगू इच्छितो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाच्याही बापात हिम्मत नाही. चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील, असा विश्वासही त्यांनी बुधवार, दि. १ मे रोजी व्यक्त केला.
 
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त दादर येथील कामगार मैदानावर आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबईचे उमेदवार पीयूष गोयल, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह भाजपचे मुंबईतील आमदार आणि खासदार उपस्थित होते. हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतींना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची जाहीर माफी!
 
ते म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते, ज्यादिवशी माझी शिवसेना काँग्रेससोबत जाईल, त्यादिवशी मी दुकान बंद करेन. परवा त्यांच्या सुपुत्राने मातोश्रीवरून काँग्रेसच्या उमेदवाराला (वर्षा गायकवाड) मत देणार असल्याचे घोषित करून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव आणि आदित्य हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असले, तरी विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत. बाळासाहेबांचे हिंदुत्व खऱ्या अर्थाने जपण्याचे काम त्यांनी केले," असेही फडणवीस यांनी सांगितले.
 
"महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला पळविले जात असल्याचा आरोप ते करतात. महाराष्ट्राच्या क्षमतेची जाणीव नसल्यामुळेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांकडून महाराष्ट्राचा अवमान सुरू आहे. त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, २०१५ पासून २०१९ पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणुकीत अव्वल राहिला. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तेव्हा कर्नाटक पहिल्या क्रमांकावर, तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर होता. महाराष्ट्राची अस्मिता सांगणाऱ्या तुमच्या मनगटात तेव्हा जोर नव्हता का," असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही पहिल्याच वर्षी महाराष्ट्र पुन्हा नंबर एकवर आणला. या वर्षी पुन्हा महाराष्ट्र एक नंबरवर आला. कारण आम्ही शिवरायांच्या विचारांवर चालत आहोत. त्यांनीच आम्हाला शिकवले, 'रडायचे नाही, लढायचे'. आम्ही कायम लढत राहिलो, तुमच्या सारखे रडत राहिलो नाही," असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  डोंबिवलीत युवराजांच्या दौऱ्यानंतर थोड्याच वेळात उबाठाला मोठं खिंडार!
 
इट का जबाब पत्थर से देंगे!
 
"ज्या राज्याचे मुख्यमंत्री केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले, कोरोना काळात कोमट पाणी प्यायला सांगत होते, त्यांना राज्याचा आवाका काय कळणार? २५ वर्षे यांनी मुंबई पालिका हवी तशी चालवली, मग या २५ वर्षांत तुम्ही मुंबईला काय दिले? दक्षिण मुंबईत राहणाऱ्या गिरणी कामगारांना तुम्ही हद्दपार केले. ७० हजार कोटी बँकेच्या डिपॉझिटमध्ये टाकले, पण गिरणी कामगारांना घरे देऊ शकला नाहीत."
 
"हे (उद्धव ठाकरे) एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, की गल्लीतील नेते, हेच समजत नाही. आम्ही शांत, संयमी आहोत, याचा अर्थ प्रत्युत्तर देणार नाही, असा होत नाही. 'हम इट का जबाब पत्थर से देना जानते है'. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही, बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफनचोर आहात. तुमच्या घोटाळ्यांची मालिका मी बाहेर काढणार आहे. आता सुरुवात झाली आहे, आगे आगे देखो होता है क्या," असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
 
देशातील ६५ टक्के डेटासेंटर महामुंबईत
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. मेट्रोचे जाळे, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प त्यांच्या पाठबळामुळे पूर्ण झाले. दरवर्षी हे रस्ते वर्षानुवर्षे वर्षे हे रस्ते बनवायचे, पण मुंबई खड्डेमुक्त कधीच झाली नाही. पण आम्ही सिमेंटचे रस्ते हाती घेतले, ते ५० वर्षे टिकणार आहेत. देशातील ६५ टक्के डेटा सेंटरची क्षमता एकट्या मुंबई महानगर प्रदेशाची आहे. येत्या काळात आपल्याला मोठ्या संधी खुणावणार आहेत. आपल्याला विकसित भारत करायचा आहे आणि विकसित भारताचे ग्रोथ इंजिन महाराष्ट्र, मुंबई आहे. अशावेळी सक्षम नेतृत्त्वाची गरज आहे. ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी मुंबईतील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा," असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
शशांक राव यांचा भाजपत प्रवेश!
 
दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे सुपूत्र शशांक राव यांनी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मुंबईच्या इतिहासात बेस्टचा संप तब्बल नऊ दिवस चालवून न्यायालयीन लढ्यात यश मिळवणारे ते पहिले कामगार नेते आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंच्या सेनेच्या युनियनला अंगावर घेऊन त्यांनी हा लढा उभारला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या नेत्याने पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
 
ठाकरे, राऊत बहुरूपी : आशिष शेलार
 
"प्रत्येक शक्ती केंद्रावर राज्य गीताच्या गायनाचे कार्यक्रम घेण्याची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आणि आज, महाराष्ट्र दिनी संपूर्ण मुंबईत १ हजार ७७ ठिकाणी राज्य गीताच्या गायनाचा कार्यक्रम झाला. जय महाराष्ट्र म्हणून राजकारण करणारे मुंबईतील गल्लीबोळात सुद्धा दिसले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खालच्या दर्जाची टीका सुरू. भाजपकडून कधीही खालच्या दर्जाची टीका केली जाणार नाही. मात्र, काही गोष्टी जनतेच्या समोर येणाची गरज आहे. काही बहुरूपी नेते महाराष्ट्रात दिवसाउघड्या फिरत आहेत. अर्ध्या तासाच्या अंतराने ते रंग बदलत आहेत. नंबर एकचे बहुरूपी उद्धव ठाकरे, तर दुसरे बहुरूपी पत्रकार पोपटलाल," असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121