मुंबई : उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्यानंतर अवघ्या काहीच तासात डोंबिवलीत उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. उबाठा गटाचे शहरप्रमुख महिला जिल्हा संघटक, युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह बडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे आदित्य ठाकरे डोंबिवलीत आलेले असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेनी कोल्हापूरातून डोंबिवलीतील उबाठा गटाचा 'करेक्ट कार्यक्रम' केल्याचे बोलले जात आहे.
उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामध्ये उबाठा गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, युवती सेना जिल्हाधिकारी लीना शिर्के, उपशहर संघटक किरण मोंडकर, कल्याण पूर्व विधानसभा संघटक राधिका गुप्ते, उपशहर संघटक राजेंद्र नांदोस्कर, विभाग प्रमुख श्याम चौगुले, सुधीर पवार, शिवराम हळदणकर, उपविभाग प्रमुख नरेंद्र खाडे, सतीश कुलकर्णी, प्रशांत शिंदे, प्रसाद चव्हाण, शाखाप्रमुख विष्णू पवार, मयूर जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या प्रवेशांमुळे 'कल्याणच्या डॉक्टरांनी वरळीच्या आमदाराचे ऑपरेशन' केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.