भाजपच्या जाहीरनाम्यात इन्फ्रा-बुस्टर!

    17-Apr-2024
Total Views |
bjp manefesto
 
मुंबई : भारतीय जनता पक्षाने १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या ' संकल्प पत्र ' या जाहीरनाम्याद्वारे भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक व्यापक दृष्टीकोन मांडला आहे. यावेळी मागील दहा वर्षात भाजपने पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्ता, प्रमाण आणि गती वाढविण्याच्या दृष्टीने परिवर्तन केल्याचा दावा केला आहे. या प्रयत्नांचा लाभ देशातील प्रत्येक क्षेत्राला मिळत आहे. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल आणि गती याचसोबत उपजीविकेची अधिकाधिक साधने उपलब्ध करून देण्यावर या संकल्प पात्रात भर देण्यात आला आहे.

रेल्वे पायाभूत सुविधा

प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीच्या क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याची भाजपची योजना आहे. गेल्या दहा वर्षांत या सरकारने ३१हजार किमीचे रेल्वे ट्रॅक बांधले आहेत आणि आता दरवर्षी पाच हजार किमीहून अधिक नवीन ट्रॅक जोडत आहेत. भविष्यात प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी २०३०पर्यंत प्रवासी वाहून नेण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच ट्रेन संरक्षण प्रणालीचा विस्तार करण्याची देखील योजना आहे.
रेल्वेचे आधुनिकीकरण

भाजपने आधीच जागतिक दर्जाच्या एक हजार तीनशेहून अधिक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू केला आहे आणि या प्रकल्पाचा सर्व मोठ्या आणि मध्यम आकाराच्या स्थानकांपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. त्यांनी वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत यांसारख्या जागतिक दर्जाच्या गाड्या भारतातच तयार केल्या जात आहेत. याचा अधिकाधिक विस्तार करण्याचा भाजपचा मानस आहे.

रस्ते पायाभूत सुविधा

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत, आरोग्य सेवा, शिक्षण, सरकारी सेवा आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी भाजपने दुर्गम भागात रस्ते संपर्क वाढवण्याची योजना आखली आहे. तांत्रिक हस्तक्षेप, प्रशिक्षण आणि वर्तणुकीतील बदल याद्वारे रस्ते सुरक्षा वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मोबिलिटी सुधारण्यासाठी आणि शहरांतील अंतर्गत रस्त्यांवर गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी मोडून काढून काढण्यासाठी प्रमुख शहरांभोवती पंधरा हजार किमीचे प्रवेश-नियंत्रित महामार्ग आणि रिंग रोड बांधण्याची पक्षाची योजना आहे.
इलेक्ट्रिक वाहने
 
भाजपने ३० लाखांहून अधिक ईव्ही जोडण्याची सोय केली आहे आणि ईव्हीचा ताफा वाढवण्याची आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्याची योजना आखली आहे.

विमानतळ आणि विमान वाहतूक

नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि एरोड्रोम विकसित आणि कार्यान्वित करून हवाई संपर्क वाढवण्याची योजना आखली आहे. एकात्मिक परिवहन सुविधांसह विमानतळांना मल्टी-मॉडल हबमध्ये रूपांतरित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
जलमार्ग आणि शिपिंग

विविध उपक्रमांचे एकत्रीकरण करून दळणवळणातील अंतर्देशीय जलवाहतुकीचा वाटा दुप्पट करण्याची भाजपची योजना आहे. जल मेट्रो सेवांचा विस्तार करणे आणि शिपिंग उद्योगाच्या जलद वाढीस सक्षम करण्यासाठी कायदेशीर चौकटीत सुधारणा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

डिजिटल पायाभूत सुविधा

भाजपने 5G नेटवर्कचा विस्तार करण्याची आणि 6G तंत्रज्ञान विकसित करण्यात पुढाकार घेण्याची योजना आखली आहे. भारतनेटच्या माध्यमातून प्रत्येक गाव ब्रॉडबँडने जोडणे आणि जमिनीच्या नोंदी डिजिटल करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

ऊर्जा सुरक्षा

इलेक्ट्रिक मोबिलिटी, नूतनीकरणयोग्य ऊर्जा उत्पादन आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे याच्या मिश्रणाद्वारे २०४७ पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवण्याची आणि आण्विक ऊर्जा उत्पादनाचा विस्तार करण्याची त्यांची योजना आहे.