मुंबई : ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना १०० रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट 'निवडणूक जुमला' वाटेल, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सुप्रिया सुळेंवर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घरगुती गॅस सिलिंडरमध्ये १०० रुपयांची सूट देत महिलांना मोठी भेट दिली आहे. यावर सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला बावनकुळेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.
डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. "जुमला "शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची.
अहो, सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 8, 2024
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. 'जुमला' शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची. सुप्रियाताई तुम्ही कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचे शिकवतात."
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत. तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता.मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदीजींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यावेळी भारतातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते. इतकेच नाही, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलेंडरवर २०० रुपयांची कपात केली होती आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलेंडरवर ४०० रुपयांची सवलत दिली होती. आठवा जरा," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे. अर्थात, तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो. सुप्रियाताई, एक रिपोर्ट जरूर वाचा. जेव्हा तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर नऊवरून १२ सिलिंडर वाढवले होते ते जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी जुमला कळेल. ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना १०० रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट "निवडणूक जुमला" वाटेल," असेही ते म्हणाले.