"तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो! अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरलं होतं!"
उद्धव ठाकरेंना पुन्हा झाली बंद दाराआड चर्चेची आठवण
08-Mar-2024
Total Views |
धाराशिव : तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरलं होतं, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी एका सभेत केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंना पुन्हा बंद दाराआड चर्चेची आठवण झाल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "तुळजाभवानी माझी आई आहे. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाहांनी मला आपण दोघंही अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद वाटून घेऊ असा शब्द दिला होता. आम्ही श्रीरामांचे भक्त आहोत. पण तसंच आम्ही तुळजाभवानीचेही निस्सीम भक्त आहोत. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, हे जे घडलं होतं ते खरं होतं आणि अमित शाह खोटं बोलत आहेत. त्यावेळी त्यांनी शब्द मोडला."
"भाजपने माझ्या पाठीत वार केला. त्यानंतर पहिले पळाले सुरतला, नंतर गुवाहाटी आणि मग गोवा. ज्या क्षणी मी राजीनामा दिला, तो व्हिडीओ विसरु नका. मी कधीही खुर्चीसाठी आसुसलेलो नव्हतो. मी अडीच वर्ष माझ्यासाठी नाही तर शिवसेनेसाठी मागितली होती. पण जेव्हा मला कळलं की, ही लोकं ५० खोक्याला विकली गेली आहेत त्याच क्षणी मी वर्षा सोडला आणि राजीनामा दिला," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. ते पाणीच माझी खरी ताकद आहे. तुम्हाला ५० खोके मिळाले असतील पण हे वैभव त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे," असेही ते म्हणाले.