श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ७ मार्च २०२४ जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोहोचले आहेत. येथे पंतप्रधान मोदींनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी काश्मिरी जनतेला संबोधितही केले. मोदींनी या कार्यक्रमात ६४०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यासोबतच सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर जनतेला संबोधित केले.
मोदींनी आपल्या भाषणात काश्मीरची तुलना स्वर्गाशी केली. ते म्हणाले की, "पृथ्वीवर स्वर्गात येण्याचा हा अनुभव शब्दांपलीकडचा आहे. येथील लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत. आम्ही अनेक दशकांपासून या जम्मू-काश्मीरची वाट पाहत होतो. २०१४ पासून मी मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटते की मी यात यशस्वी झालो आहे."
पंतप्रधानांनी त्यांच्या जम्मू भेटीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "मी जम्मूमध्ये ३२,००० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली आहे." पंतप्रधान म्हणाले की, "आज मला काश्मीरमधील पर्यटन आणि विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे."
पंतप्रधान मोदींनी काश्मीरला भारताचे सन्मानाचे प्रतीक संबोधले. ते म्हणाले की, "जम्मू आणि काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही तर भारताच्या सन्मानाचे प्रतीक आहे, म्हणून विकसित जम्मू आणि काश्मीर हे विकसित भारताचे प्राधान्य आहे." मोदी म्हणाले की, "एक काळ असा होता जेव्हा देशात लागू असलेले कायदे जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. ते म्हणाले की आता काळ बदलला आहे, आता श्रीनगर केवळ जम्मू-काश्मीरसाठीच नाही तर देशासाठी नवीन पर्यटन उपक्रम घेत आहे."
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी पुढील २ वर्षात ४० ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरची प्रगती वेगाने होत आहे. या राज्याला २ एम्स मिळत आहेत. आगामी काळात जम्मू-काश्मीरची यशोगाथा संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनेल."