“वीर सावरकरांमधील हिंदुत्व, देशप्रेम आणि...” ‘मुंबई तरुण भारत’च्या थेट प्रश्नावर रणदीप हुड्डाचे स्पष्ट उत्तर

Total Views |
“मराठीत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहिला तो अधिक सुंदर वाटला”, हिंदीसह मराठीत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल रणदीपने दिले आपले प्रामाणिक मत.
 randeep 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत गेले काही काळ चरित्रपट एकामागून एक येताना दिसत आहेत. पण कुणीच अखंड भारताचे स्वप्न पाहत हिंदुना संघटित करणाऱ्या वीर सावरकरांच्या (Swatantryaveer savarkar) जीवनावर चरित्रपट करण्याचा विडा उचलला नव्हता. परंतु, अभिनेता रणदीप हुड्डा याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून दिग्दर्शन आणि अभिनयाची जोड देखील त्याचे या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveersavarkar) या चरित्रपटाला दिली आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत मोठ्या पडद्यावर येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला रणदीपने थेट उत्तर दिले.
 
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यादरम्यान ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी रणदीपला वीर सावरकरांमधील कोणते गुण आत्मसात केले असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “सावरकरांचे लिखाण आणि त्यांच्यातील लेखकाची रुची मी माझ्यात उतरवली असून या चित्रपटाचे चित्रिकरण करता करता मी काही लघुपटांच्या कथा लिहिण्यास सुरुवात केली आहे. दुसरी त्यांच्याकडून शिकण्यासारखी आणि कायम सोबत ठेवण्यासारखी बाब म्हणजे देशप्रेम. आणि त्यांची हिंदुत्वाची विचारधारा. कारण त्यांचे असे म्हणणे होते की आपण विभिन्न जात, समाज, प्रांताचे जरी असलो तरी आपण हिंदु आहोत. त्यामुळे या तीन महत्वाचे गुण मी कायम माझ्यासोबत ठेवणार आहेत, असे उत्तर रणदीपने महाएमटीबीशी बोलताना दिले.
 
मराठीत हा चित्रपट अधिक सुंदर वाटला
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. यावर आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला, “मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ज्यावेळी मराठी भाषेत पाहिला त्यावेळी मला अधिक सुंदर वाटला. सध्या जरी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होत असला तरी जगभरातील प्रत्येक भाषेत हा चित्रपट व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण देश विदेशात वीर सावरकरांचा इतिहास त्यांची कथा पोहोचली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे”, असे देखील रणदीप याने म्हटले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.