भारताच्या न्यायिक प्रक्रियेवर टिप्पणी करू नका, जर्मनीस सुनावले

    23-Mar-2024
Total Views |
indian judicial system gerrmany
 

नवी दिल्ली :    दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणावर भाष्य करणे जर्मनीला महागात पडले आहे. या भारताच्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी जर्मन दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांस बोलावून समज दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या टिप्पणीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून हे प्रकरण भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.


हे वाचलंत का? - आमची निष्ठा भारतासोबतच! वर्तमानपत्रात जाहीर नोटीस


परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, नवी दिल्लीतील जर्मन मिशनच्या उपप्रमुखांना आज पाचारण करण्यात आले आणि त्यांनी आमच्या अंतर्गत बाबींवर त्यांच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याच्या टिप्पण्यांना भारताचा तीव्र विरोध कळवला. भारत हा कायद्याच्या राज्यासह मजबूत लोकशाही आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या या भारतीय न्यायालयीन प्रक्रियेतील हस्तक्षेप आणि आमच्या न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या असल्याचे भारताचे मत असल्याचे जर्मनीस कळवण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेवर टिप्पणी करताना जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी म्हटले होते की, भारत हा लोकशाही देश आहे. आम्हाला अपेक्षा आहे की न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानके आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे या प्रकरणातही लागू होतील.