फुटीरतावादी गिलानीची नात आणि शब्बीर शाहच्या मुलीची घोषणा
23-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : पाकिस्तान समर्थक हुर्रियतचा मयत नेता सय्यद अली शाह गिलानी याची नात आणि सध्या तुरूंगात असलेला व बंदी घातलेल्या डेमोक्रॅटिक फ्रीडम पक्षाचा (डीएफपी) अध्यक्ष शब्बीर शाह याच्या मुलीने भारताशी एकनिष्ठ असल्याचे सांगून स्वत:ला फुटीरतावादी विचारसरणीपासून दूर केले आहे. काश्मीरच्या स्थानिक वृत्तपत्रातून त्यांनी ही घोषणा केली आहे.
जम्मू – काश्मीरच्या प्रादेशिक वृत्तपत्रात ग्रेटर काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या नोटीशी प्रकाशित झाल्या आहेत. त्यामध्ये शब्बीर शाह याची मुलगी समा शब्बीर आणि गिलानीची नात रुवा शाह यांनी म्हटले आहे की त्यांचा फुटीरतावादी विचारसरणीकडे कोणताही कल नाही. त्यांचा फुटीरतावादास विरोध असून भारताच्या सार्वभौमत्वाशी त्यांची निष्ठा आहे.
गिलानी याची नात रुवा शाह हिच्या नोटीशीत म्हटले आहे की, आपला हुर्रियत कॉन्फरन्सच्या विचारसरणीकडे कोणताही कल किंवा सहानुभूती नाही. आपण भारताची एक निष्ठावान नागरिक असून भारताच्या विरोधात अजेंडा असलेल्या कोणत्याही संघटनेशी आपला संबंध नाही. भारताच्या राज्यघटनेशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एका वेगळ्या सार्वजनिक नोटीशीमध्ये शब्बीर शाह याच्या मुलीने, समा शब्बीर यांनी फुटीरतावादास आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. आपण भारताचे निष्ठावान नागरिक असून भारतीय संघराज्याच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेशी संलग्न नाही. आपण कोणत्याही प्रकारे डीएफपी किंवा त्याच्या विचारसरणीशी संबंधित नसल्याचेही समा शब्बीर यांनी म्हटले आहे.
गिलानी याच जावई आणि रुवा शाह हिचे वडील अल्ताफ अहमद शाह उर्फ अल्ताफ फंटूश याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये कोठडीदरम्यान मृत्यू झाला होता. अल्ताफला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी निधीशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. त्याचप्रमाणे शब्बीर शाह याला २०१७ मध्ये एनआयएने दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात अटक केली होती. तसेच २०२३ मध्ये गृह मंत्रालयाने त्याच्या फुटीरतावादी पक्ष डीएफपीवर बंदी घातली होती.