केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची मोठी टीपण्णी!, "मला दुःख..."

    22-Mar-2024
Total Views |

Anna Hajare

(Photo - Anna Hajare)


नवी दिल्ली (Arvind Kejariwal arrested )
: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक झाली. पदावर अटक झालेले ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.  दिल्ली मद्य घोटाळ्यातील ईडीच्या नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर अखरे त्यांना ही अटक झाली. पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने ते अटक झालेले पहिलेच मुख्यमंत्री ठरले. या प्रकरणी त्यांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे त्यांच्या 'इंडीया अगेन्स्ट करप्शन'मध्ये प्रमुख चेहरा होते. केजरीवालांच्या नव्या मद्य धोरणाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याबद्दल मी त्यांना पत्र लिहीले होते, अशी माहिती त्यांनी दिली. "देशात सुधारणा करण्यास इतरही कामं होती. मद्यधोरण राज्यात आणणे हा चुकीचा निर्णय होता. कोण चुकीचं कोण बरोबर हे कायदा बघून घेईल. आम्हाला याचं जराही दुःख नाही.", अशी तिखट प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिले आहे. 
ईडीने केजरीवालांना दहाव्यांदा समन्स बजावले होते. ते देण्यासाठी ईडीची टीम ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. यावेळी त्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला होता. अटकेपासून संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर केजरीवालांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. RML रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने त्यांची वैद्यकीय चाचणी केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी २१ मार्चची संपूर्ण रात्र ही तुरुंगात घालवली.



दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केले जाईल. केजरीवालांना जास्तीत जास्त कोठडी मिळावी यासाठी ईडी प्रयत्न करणार आहे. केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर कायम रहाणार आहेत, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या तसेच मंत्री आतिशी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे तुरुंगातूनच सरकार चालविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


केजरीवालांच्या अटकेप्रकरणात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांचे पीठ स्थापन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही कालावधीतच सर्वोच्च न्यायालयातील याचिका केजरीवाल यांनी मागे घेतली. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवीने यांनी दिलेल्या माहितीनुसार, PMLA कोर्टात ED केजरीवालांची कोठडी मागू शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न जाता याच न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडणार आहोत.

यापूर्वी याच प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के.कविता यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. न्यायालयाने स्पष्ट करत सांगितले की, सर्वांना एकच धोरण अंमलात आणावे लागेल. व्यक्ती राजकारणी असली तरीही सरळ सर्वोच्च न्यायालयात येण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. दरम्यान, केजरीवालांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलने केली आहेत. दिल्ली सरकारचे दोन मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलीसांनी अटक केली आहे. राहुल गांधी केजरीवाल यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची प्रार्थमिक माहिती आहे. (Arvind Kejariwal arrested )