हिंदू शरणार्थींचा अपमान

    18-Mar-2024   
Total Views |
arvind kejriwal oppose CAA

'सीएए’ कायदा लागू झाल्यानंतर, देशभरात आनंदाची लाट पसरली. परंतु, अनेकांचा यामुळे जळफळाटसुद्धा झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तर हिंदू, जैन, शीख शरणार्थींना थेट पाकिस्तानी असल्याचे सांगत, नव्या वादाला तोंड फोडले. हे शरणार्थी ’सीएए’ कायदा लागू झाल्यानंतर, आनंद साजरा करत असतानाच, तिकडे केजरीवालांनी त्यांना थेट पाकिस्तानी व गुन्हेगारांचा टॅग देऊन टाकला. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित स्वतः शरणार्थी असल्याचे सांगत असतात. मग केजरीवाल त्यांनाही पाकिस्तानी टॅग देणार का? केजरीवालांच्या या बेताल वक्तव्यानंतर दिल्लीतील शरणार्थींनी केजरीवालांच्या शिशमहलवर मोर्चा काढला. पाक, अफगाणिस्तान, बांगलादेशमधून गरीब लोकं भारतात येतील आणि येथील लोकांच्या नोकर्‍या, घरे हिसकावून घेतील. आपण त्यांच्यासाठी आपले दरवाजे का उघडतोय, असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी कोणतेही शरणार्थी येणार नाही, सगळे शरणार्थी पहिल्यापासूनच भारतात आले आहे. २०१४ पर्यंत जे शरणार्थी भारतात आले आहे, त्यांनाच भारताचे नागरिकत्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकत्व देण्याचा आधार गरिबी नाही, तर धार्मिक प्रताडना आहे, हे केजरीवालांनी समजून घ्यावे. केजरीवालांच्या म्हणण्यानुसार, २०१४ नंतर २०१९, २०२४ असा कालावधी वाढवला जाईल. मात्र, ते तारीख स्वतःच्या अटकेचे अंदाज जाहीर करण्यासारखे वाढवत आहे. अडीच ते तीन कोटी लोकं भारतात येतील, असे सांगून केजरीवाल गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, आकडेवारीनुसार त्यांचा हा दावा फोल ठरतो. भारतात दीर्घकालीन व्हिसा घेऊन राहणारे अल्पसंख्याक आहेत-केवळ ३१ हजार, ३१३. यातही हिंदू २५ हजार ४४७, शीख ५ हजार ८०७, ख्रिश्चन ५५, बौद्ध दोन आणि पारशी दोन जण. हा व्हिसा देताना, मुख्य आधार धार्मिक प्रताडना होता. या सगळ्यांनी अर्ज केला, तर याच ३१, ३१३ लोकांना भारताचे सर्वप्रथम नागरिकत्व मिळू शकेल. त्यामुळे केजरीवालांनी कोट्यवधींचे आकडे कुठून आणले, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आता नववे समन्स आले आहे, त्यातही जल बोर्ड घोटाळ्याची टांगती तलवार आहेच, त्यामुळे चौकशीपासून पळ काढणार्‍या, केजरीवालांनी शरणार्थींवर न बोललेलेच बरे!

 
रोहिंग्यांवर मेहेरबान
 
केजरीवालांनी अल्पसंख्याक शरणार्थींची मने दुखावून, त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पसंख्याक शरणार्थींना केजरीवालांसारखा शिशमहल, राजमहल तर भारतात मिळणार नाही. परंतु, ’प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत घर, पाणी व वीज नक्की मिळेल. माणूस म्हणून जगता येईल. केजरीवालांच्या मते, हे शरणार्थी भारतात आले, तर गुन्हेगारी वाढेल. घराजवळ येऊन झोपड्या बांधतील. कॅनडानेही ज्याला हवी त्याला नागरिकता दिली आणि आता कॅनडाचे आताचे हाल बघा. मागील दहा वर्षांत ११ लाख व्यापारी आणि उद्योगपती भारत सोडून गेले. जर आणायचे असेल, तर श्रीमंतांना, पैसेवाल्यांना भारतात आणा, जे भारतात येऊन कारखाने, उद्योग सुरू करतील आणि लोकांना रोजगार मिळेल, असे अजब दावे केजरीवालांनी केले. स्वतःला आम आदमी म्हणणारे, केजरीवाल गरिबांना नको तर श्रीमंतांना आणा म्हणतात. धार्मिक छळ सहन केलेल्यांना, केजरीवाल गुन्हेगार म्हणून हिणवत आहे. या शरणार्थींनी केजरीवालांना आव्हान दिले आहे की, एकाही पोलीस ठाण्यात आमच्याविरुद्ध एक तरी तक्रार दाखवून द्या. ज्यांना नागरिकता दिली जाईल, ते अनेक वर्षांपासून भारतातच राहत आहे. भारत सरकारचे सर्व नियम, कायद्यांचे पालन करत हे शरणार्थी भारतात राहताहेत. केजरीवालांना इतकीच चिंता आहे, तर ते रोहिंग्यांना का विरोध करत नाहीत. बांगलादेशी घुसखोरांविरोधात चकार शब्दही काढत नाही. कारण, त्यांना ’व्होटबँके’चे राजकारण करायचे आहे. बांगलादेशी घुसखोर नोकरीचा अधिकार हिसकावून घेत नाही का, फक्त जैन, हिंदू, शीख शरणार्थींचाच केजरीवालांना तिटकारा आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना रेशन वाटप केल्याची कबुली केजरीवाल सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली होती. दिल्लीत तीन कॅम्पमध्ये हे रेशन वाटण्यात आले. दिल्लीतील कालिंदी कुंज येथे रोहिंग्या वस्ती असून, इथे ५६ कुटुंबे वास्तव्यास आहेत. यांच्याकडे पाणी, वीज असून मुले शाळेतही जातात. यावर केजरीवाल बोलत नाही. दिल्लीकरांचे हक्काचे पाणी रोहिंग्यांना दिले जाते, यावर केजरीवाल गप्प कसे? रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी घुसखोर दिल्लीसाठी धोका आहे, हे केजरीवाल कधीही बोलणार नाही; कारण त्यांना तर हिंदू, जैन, शीख शरणार्थींचा धोका अधिक वाटतो.



पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.