आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंबद्दल केलेली वक्तव्य राखी सावंतला पडली महागात.
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायमच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता मात्र ती अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचे वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात आर्यन खान (Sameer Wankhede) प्रकरणावरुन मानहानीचा खटला दाखल केला आहे. गोरेगाव येथील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला त्यांनी दाखल केला असून वानखेडे यांनी ११ लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. मानहानीच्या खटल्यात त्यांनी राखी सावंत आणि तिच्या वकिलांनी प्रतिमा डागाळण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याबाबत राखी सावंतचे वकील अॅड. अली काशिफ खान म्हणाले की, 'कायद्याच्या अनुशंगाने लोकांच्या भल्यासाठी सत्य बोलल्यास बदनामी होत नाही. आयपीसीच्या कलम ४९९ मधील दुसरा अपवाद म्हणजे 'पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट्स', याचा अर्थ असा होतो की एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडले गेले तर त्याची बदनामी होत नाही.” दरम्यान, अॅड. खान हे मॉडेल मुनमुन धमेचाचे वकिल होते जिला२०२१ मध्ये ड्रग्ज छापेमारी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि महत्वाचे म्हणजे या छापेमारीचे नेतृत्व समीर वानखेडे यांनी केले होते.
पुढे बोलताना अॅड. अली काशिफ खान म्हणाले की, “समीर वानखेडे यांनी त्यांच्याविरोधातील खटला योग्य असल्याचे सिद्ध केले तर मी त्यांना ११.०१ लाख रुपये देईन. तसेच, सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे अधिक प्रतिक्रिया देणार नाही, असे देखील ते म्हणाले.
प्रकरण काय ?
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात २०२० रोजी अटक केली होती. त्यावेळी राखी सावंत हिने आर्यन खानला पाठिंबा दिला होता. तिने अनेक व्हिडिओ शेअर करत आर्यन निर्दोष असल्याचे म्हटले होते. तसेच, तिने समीर वानखेडेंबद्दल देखील बरीच विधाने केली होती. आता समीर वानखेडे यांनी राखीला कोर्टाच खेचल्यामुळे ती यावर कोणत्यापद्धतीने प्रतिक्रिया देणार आणि या प्रकरणाचे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.