राम महिन्यामध्ये राम महिमा : अशी पण ‘केरला स्टोरी’

Total Views |
They call Karkidakam the month of Ramayana

‘कर्ककीडकम्’ हा संपूर्ण महिना त्यांनी ’राम महिना’ घोषित केला. घरातले सर्व लोक सकाळी उठून भराभर प्रात:विधी आटोपून एकत्र बसत. मग घरातली सर्वात मोठी महिला रामायण वाचायला सुरुवात करत असे. एकेक श्लोक वाचन, त्याचा अर्थ सांगत कथानक पुढे सरकत असे.

आपल्या भारत देशाच्या नैर्ऋत्य दिशेला असलेला केरळ हा एक छोटा प्रांत. छोटा म्हणजे किती छोटा, तर महाराष्ट्राची लोकसंख्या आज अंदाजे १५ कोटी असताना, केरळची लोकसंख्या अंदाजे साडेतीन कोटी आहे. तब्बल ६०० किमीची विस्तीर्ण किनारपट्टी हे केरळचं वैभव. हवामान आपल्या कोकणासारखंच. खरं म्हणजे मूळ ‘सप्तकोकण’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशांत केरळही येतंच. त्यामुळे आपल्या कोकणासारखाच बदाबदा कोसळणारा पाऊस. आपल्याकडे आषाढ हा खास पावसाचा महिना. श्रावणात तो थोडा कमी होणार. भाद्रपदात आणखी कमी होणार. केरळ प्रांतात ‘कोल्लम’ नावाची कालगणना प्रचलित आहे. साधारणपणे उत्तर भारतात ‘विक्रम संवत्‘ आणि दक्षिण भारतात एक ‘शालिवाहन शक संवत्’ या कालगणना सर्वाधिक प्रचलित आहेत.

पण, तरी प्रत्येक प्रांताची काहीतरी विशिष्ट कालगणना आहेच. तशी ती केरळची कालगणना ’कोल्लम संवत्’ या नावाने ओळखली जाते. इसवी सन ८२५ या वर्षी राजा कुलशेखेरन् चेर याने कोल्लम् या बंदरगावी एक फार विशाल अशी राजसभा भरवून अनेक नवनवीन प्रथा-परंपरा सुरू केल्या. म्हणून त्या वर्षापासून ही कालगणना सुरू करण्यात आली. आपण जसा ‘शकवर्ष’ असा शब्द वापरतो, तसा ते ‘कोल्लवर्षम्’ असा शब्द वापरतात. कर्नाटकचा राजवंश चोल, तामिळनाडूचा राजवंश पांड्य, तसा केरळचा राजवंश चेर हा होता. आपल्या शकवर्षातल्या महिन्यांची नावं जशी नक्षत्रांवरून पडली आहेत, म्हणजे चित्रा नक्षत्रावरून चैत्र, विशाखा नक्षत्रावरून वैशाख, तोच प्रकार ’कोल्लम’ वर्षाचाही आहे. हा सध्याचा आषाढ-श्रावण किंवा जुलै-ऑगस्ट महिना म्हणजे ’कोल्लम’ वर्षाचा ’कर्ककीडकम्’ नावाचा महिना आहे. हे नाव कर्क या राशीवरून आलं आहे.

या महिन्यात केरळमध्ये इतका पाऊस असतो की, घरातून बाहेर पडणं मुश्किल व्हावं. आज पर्जन्यमान खूप कमी झालेलं आहे, आधुनिक साधनं, सुखसोई खूप वाढलेल्या आहेत, तरीही अनेकदा या महिन्यात पावसामुळे दैनंदिन व्यवहार करणं अशक्य होऊन बसतं. आधुनिक काळापूर्वी तर अनेकदा असं होत असे की, अखंड कोसळणार्‍या पावसामुळे घरात जे काही साठवलेलं अन्नधान्य असेल, तेवढंच शिजवून जेवावं लागत असे. बाहेर पडून कोणलाही ताज्या वस्तू आणणं शक्य नसे. यामुळे हातावर पोट असणार्‍या लोकांना तर महिनाभर अक्षरशः तांदळाच्या पेजेवर भागवावं लागत असे.

मग यावर त्यावेळीच्या समाजधुरिणांनी तोडगा काढला. ‘कर्ककीडकम्’ हा संपूर्ण महिना त्यांनी ’राम महिना’ घोषित केला. घरातले सर्व लोक सकाळी उठून भराभर प्रात:विधी आटोपून एकत्र बसत. मग घरातली सर्वात मोठी महिला रामायण वाचायला सुरुवात करत असे. एकेक श्लोक वाचन, त्याचा अर्थ सांगत कथानक पुढे सरकत असे. बायका आणि क्वचित पुरुषसुद्धा एकवेळ जेवण करीन म्हणजे पेज पीत असत. मुलं येता-जाता पेज पिऊन भूक भागवीत. कथानक जसं-जसं पुढे सरकत जाई, तसं तसं संपूर्ण घराला रामकथेच्या रसात असं काही चिंब भिजून जाई की, बाहेरचा राक्षसासारखा कोसळणारा पाऊस आणि पोटातली भूक यांचं कुणाला भानच राहत नसे. शतकानुशतकं रामकथा केरळ प्रांताच्या खेड्यापाड्यात अशी झिरपत गेली.

कित्येक शतकं हे वाचन ‘वाल्मिकी रामायण’ या मूळ संस्कृत महाकाव्याचं चालत होते. १७व्या शतकात एक नवल घडलं, ’अध्यात्म रामायण’ हा ग्रंथ स्वामी रामानंद यांनी लिहिला. आता हे रामानंद कोण, याबद्दल विद्वानांमध्ये (नेहमीप्रमाणे) मतभेद आहेत. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत यांचे गुरू रामानंद, कबीरांचे गुरू रामानंद आणि काशीक्षेत्री राहून अध्यात्म रामायणाची रचना करणारे रामानंद हे एकच की, तीन वेगवेगळे? कसंही असो, पण ‘अध्यात्म रामायण’ हा ग्रंथ मात्र संपूर्ण देशातल्या पंडितांना मान्य आणि प्रिय झाला. १७व्या शतकात केरळमधले रामानुजन एळुदाकन यांनी या मूळ संस्कृत अध्यात्म रामायणाचं मल्याळम् भाषेत भाषांतर केलं, रामकथा आता बहुजन समाजाच्या अधिक जवळ पोहोचली. वाचन करणार्‍या आजीला संस्कृत श्लोक वाचून पुन्हा याचा अर्थ सांगण्याची गरज उरली नाही.

एकीकडे रामकथा अशी समाजाच्या सर्व स्तरांमध्ये झिरपत असताना, दुसरीकडे केरळची समाजस्थिती बिघडत चालली. अरब व्यापारी कियेक शतकांपासून केरळशी संबंध ठेवून होते. इसवी सनाच्या सातव्या शतकात सगळेच अरब मुसलमान झाले. आता ते मुसलमान अरब व्यापारी म्हणून आले. केरळचे हिंदू राजे बलवान होते, यामुळे या अरब मुसलमानांनी आशिया-आफ्रिका खंडात इतरत्र जशी बेगुमान बाटवाबाटवी केली, तशी इकडे केली नाही. पण, शांतपणे ते आपली लोकसंख्या वाढवत राहिले. इ. स. १४९८ साली वास्को-द-गामा हा कट्टर कॅथालिक दर्यावर्दी केरळात उतरला. त्याने मात्र अल्पावधीतच आपले खरे दात दाखवले. मग अरब मुसलमानांनीही नखं बाहेर काढली. या काळापर्यंत म्हणजे १६व्या शतकाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या सुलतानांनी संपूर्ण उत्तर भारत, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व्यापलेला होता आणि आता ते तामिळनाडूवर धडका मारत होते.

मग एकीकडून मुसलमान आणि एकीकडून पोर्तुगीज यांनी केरळमध्ये प्रचंड बाटवाबाटवी केली. आज केरळच्या सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्येपैकी ५४ टक्के लोक हिंदू आहेत, २६ टक्के लोक मुसलमान आहेत, तर १८ टक्के लोक ख्रिश्चन आहेत. इंग्रजांच्या किंवा काँग्रेसच्या मखमली भाषेत बोलायचं, तर लोकसंस्थेतली इतकी ‘बहुविधता (डायव्हर्सिटी)’ अन्य कुठल्याही राज्यात नाही. सध्या व्यावहारिक भाषेत बोलायचं, तर हिंदूंचं लोकसंख्येतलं इतकं कमी प्रमाण अन्यत्र नाही.|

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारच्या भाषावार प्रांतरचनेच्या धोरणानुसार १९५७ साली केरळ हे मल्याळी भाषिक लोकांचं राज्य निर्माण झालं. मद्रास या तत्कालीन प्रांतातले मल्याळी भाषिक विभाग आणि त्रावणकोर, कोचीन किंवा कोच्ची आदी संस्थानी प्रदेश यांचं हे राज्य बनवण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशात इतरत्र गांधी-नेहरू यांचा प्रचंड प्रभाव असताना आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सर्व प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारं सत्तारूढ होत असताना केरळने कम्युनिस्ट पक्षाला संपूर्ण बहुमताने सत्तेवर बसवलं. संपूर्ण आशिया खंडात असं पहिल्यांदाच घडलं की, कम्युनिस्ट पक्ष स्वबळावर सत्तेत आला. संपूर्ण जगातलं हे दुसरे उदाहरण मग पहिलं कुठलं? तर इटली या युरोपीय देशातल्या सान मरीनो नावाच्या एका छोट्याशा प्रांताने यापूर्वी कम्युनिस्ट पक्षाला एकहाती सत्ता बहाल केली होती. पण, केरळ समोर सान मरीनो म्हणजे जिल्हा परिषद होती.

म्हणजेच, आमची भूमी ही देवाची भूमी आहे, (गॉड्स ओन लॅण्ड) असे अभिमानाने सांगणार्‍या मल्याळी भाषिक हिंदूंनी देव-देश-धर्म यांना अफूची गोळी मानणार्‍या साम्यवादी नास्तिकांना प्रथमपासूनच सत्ता बहाल केली. याचे परिणाम १९७०च्या दशकापासून दिसू लागले. लोक मोठ्या प्रमाणावर शिक्षण-उच्च शिक्षण घेऊ लागले. आज केरळचे ९६ टक्के नागरिक सुशिक्षित आहेत. हे नागरिक, त्यात महिलासुद्धा, मोठ्या प्रमाणावर नोकर्‍यांसाठी आखाती देशांमध्ये जाऊ लागले. १९७०च्या दशकात आखाती देशांमध्ये सर्व प्रकारच्या नोकर्‍या विपुल प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या. परिणामी, या चाकरमानी लोकांकडून दरमहा भरपूर पैसा केरळमध्ये येऊ लागला.

आपल्या हिंदू समाजाची कशी गंमत आहे पाहा! पैला आणि प्रतिष्ठा मिळाली की, हिंदू माणूस लगेच आपला धर्म, संस्कृती, संस्कार यांना फाट्यावर मारून चंगळवादी बनतो. मुसलमान आणि ख्रिश्चन यांचं असं होत नाही. एखाद्या ख्रिश्चनाने शनिवारी रात्री कितीही दारू ढोसली, तरी रविवारी सकाळी लवकर उठून पोराबाळांसह तो चर्चमध्ये प्रेयरला जाणारच! असो. तर या वाढत्या चंगळवादी संस्कृतीमुळे केरळी घरांमधली, ही रामकथा वाचनाची परंपरा कमी-कमी होत जवळपास बंद पडायला आली. तेवढ्यात म्हणजे १९८१ साली तामिळनाडू मध्ये मीनाक्षीपुरम्चं प्रकरण घडलं. फार मोठ्या प्रमाणावर दलित-हिंदूंनी मुसलमान धर्म स्वीकारला. मीनाक्षीपुरम्चं धर्मांतर देशभर प्रचंड गाजलं आणि त्यातूनच हिंदू संघटकांनी निश्चय केला की, आता दक्षिण भारत हिंदू जनजागृतीने हलवून सोडायचा. तारीख ठरली एप्रिल १९८२. ठिकाण ठरलं केरळमधलं शहर कोच्ची (कोचीन हा भ्रष्ट पोर्तुगीज उपच्चार).

दि. ४ एप्रिल १९८२ या दिवशी कोच्ची शहराने एक अपूर्व दृष्य पाहिलं, ज्या केरळबद्दल, तिथल्या भयानक जातिविद्वेषामुळे व्यथित होऊन, ‘हा देश आहे की, पागलखाना,’ असे शब्द खुद्द स्वामी विवेकानंदांच्या तोंडून बाहेर पडले होते, त्याच केरळमध्ये लक्षावधी हिंदू जात-पंथ-प्रांत-भाषा सगळे भेद विसरून एका विशाल हिंदू संमेलनामध्ये एकवटले. व्यासपीठावरून त्यांना संबोधित करीत आहेत, स्वामी चिन्मायानंद, पेशावर मठाधीश स्वामी विश्वेश तीर्थ आणि रा. स्व. संघाचे सरकार्यवाह (तत्कालीन) प्रो. राजेंद्रसिंहजी, आणि डॉ. कर्णसिंह. या विशाल हिंदू संमेलनाचं गीत होतं- ‘हिंदुक्कल नाम ओन्माने’ म्हणजे ‘आम्ही सारे हिंदू एक.’ प्रांत प्रचारक के. भास्करन् (म्हणजे मूळचे मुंबईचे भास्करराव कळंबी), पी. माधवजी, पी. परमेश्वरजी, रंगाहरीजी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश ए. आर श्रीनिवासन इत्यादी प्रांतिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार परिश्रमांमधून हे विशाल हिंदू संमेलन अतोनात यशस्वी झालं. संमेलनाच्या कार्यकारी समितीने इतर अनेक ठरावांसोबत महत्त्वाचा ठराव हा केला की, येत्या कर्ककीडकम् महिन्यापासून घरोघर रामायण वाचनाची बंद पडलेली प्रथा पुनरुज्जीवित करायची. समाजाच्या मनामनातला निद्रिस्त राम पुन्हा जागृत करायचा, सर्वांनी सहर्ष या ठरावाचं स्वागत केले.

तेव्हापासून म्हणजे जुलै-ऑगस्ट १९८२ पासून दरवर्षी या रामकथा वाचन महिन्याचा महिमा केरळ प्रांतभर वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात जसा गणपती आणि नवरात्र किंवा उत्तर भारतात जसा ‘भागवत सप्ताह’ आणि ‘रामचरितमानस सप्ताह’ यांची लोक वर्षभर वाट पाहत असतात, तसंच स्वरूप या उत्सावाला येऊ लागलं आहे. घरोघरी महिला संस्कृत, मल्याळम् आणि आता तर रामायण वाचून दाखवतात. कित्येक ठिकाणी तर सामुदायिक वाचन चालतं. त्यात कथित उच्चवर्णीयांसोबत बहुजन समाजही उत्साहाने सामील होतो. बहुजन समाजातल्या महिलादेखील वाचन करतात. रामायणाला मागणी आहे, म्हटल्यावर सगळ्या प्रकाशक कंपन्या विविध आकारांची, प्रकारांची, विविध भाषांमधली, लहान-मोठ्या टाईपमधली रामायणं छापत असतात आणि ती धडाक्याने खपत असतात. काही तुरळक ठिकाणी ख्रिश्चन लोकसुद्धा जाहीरपणे रामायण वाचतात. कम्युनिस्ट पक्ष, सरकार आणि साहित्यिक यांनी याला खूप विरोध करून पाहिले, पण ते व्यर्थ ठरले आहे. जय श्रीराम!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.