मुंबई (ओंकार देशमुख): राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यातून बदललेली गणिते यामुळे विधिमंडळातील समीकरणे बदलणार आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार महायुती सरकारचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्यामुळे सभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले. दुसरीकडे विधान परिषदेतही ठाकरे गटाच्या काही सदस्यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तिथेही विरोधी पक्षनेता बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना मविआने विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय न घेतल्याने हा पेच अद्याप कायम आहे. दोन्ही सभागृगात आपलाच विरोधी पक्षनेता असावा, यासाठी काँग्रेसने दावा ठोकल्याने नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाडांचे नाव विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर केले गेले असले, तरी त्याला अद्याप कुठलीही ठोस नैतिक/संवैधानिक मान्यता मिळालेली नाही. किंबहुना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) त्यासाठी फारसा उत्सुक नसल्याचेच दिसून आले. उलटपक्षी विधानसभेत संख्यानिहाय सर्वात मोठा असलेला काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेता आपलाच यावर ठाम आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी अग्रक्रमाने घेतले जात असून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. काहीही झालं, तरी विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच बनवायचा या इर्शेने काँग्रेस नेते विधाने करत आहेत. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
काँग्रेसची मागणी रास्त
विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधकांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ इतर पक्षांपेक्षा अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आणि शिवसेना उबाठा गटापेक्षा काँग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने काँग्रेसची मागणी रास्त आहे. त्यांच्या मागणीवर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हेच अंतिम निर्णय घेतील.
- प्रसाद लाड, आमदार, भाजप (वि.प.)
उबाठा गटातून शिवसेनेत गेलेले सदस्य ः
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादा गटात गेलेले सदस्य ः
अमोल मिटकरी, विक्रम काळे, सतीश चव्हाण, रामराजे निंबाळकर