पूर्वांचलचे गणित पक्के?

    13-Jul-2023   
Total Views |
BJP Strategy for Purvanchal
 
भाजपने २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०२४ पेक्षाही मोठे यश मिळविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी लहानातल्या लहान पक्षालाही सोबत घेण्याचे भाजपचे धोरण आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये यश मिळविण्यासाठी राजभर यांना सोबत घेणे भाजपला महत्त्वाचे वाटते.

भारतात पंतप्रधानपदाचा मार्ग हा लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून जातो. भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात भरघोस यश मिळवून सत्तेचा सोपान सोपा केला होता. आता पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत. भाजप राज्याच्या राजकारणात आपले स्थान मजबूत करण्याच्या रणनीतीवर काम करताना दिसत आहे. दुसरीकडे जयंत चौधरी हे समाजवादी पक्षाला धक्का देण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे, तर बसपाच्या मायावती या अद्याप शांत आहेत. त्यामुळे विरोधकांची संपूर्ण रणनीती कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी निवडणुकीत पक्षाची मते वाढविण्यासाठी प्रभावी ठरणार्‍या नेत्यांना हेरण्यास भाजपने प्रारंभ केला आहे.

महाराष्ट्रात ज्या प्रकारे भाजपने आधी शिवसेनेशी आणि नंतर राष्ट्रवादीच्या अस्वस्थ गटाशी हातमिळवणी करून राज्याच्या सत्तेच्या आणि मतांच्या राजकारणात मोठी आघाडी मिळवली आहे, त्याचवेळी कदाचित आगामी काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमधील एक मोठा नाराज गटदेखील भाजपसोबत येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. असेच काहीसे प्रयत्न देशातील सर्वात मोठ्या राज्यात सुरू आहेत. पक्षाला यादवेतर ओबीसी मतपेढीत कोणत्याही प्रकारची फूट पडू द्यायची नाही. त्यासाठी नवे चेहरे तयार केले जात आहेत, जुने चेहरे नव्याने जोडले जात आहेत. या स्थितीत ओमप्रकाश राजभर यांच्या भूमिकेस महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपने दि. १८ जुलै रोजी दिल्ली येथे भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ची (एनडीए) बैठक बोलाविली आहे. या बैठकीमध्ये अनेक जुने सहकारीदेखील नव्याने ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर हेदेखील सहभागी होऊ शकतात. अर्थात, अशा कोणत्याही बैठकीचे आपल्याला अद्याप निमंत्रण आले नसल्याचे राजभर यांनी म्हटले आहे. भाजप नेतृत्वाशी कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचेही राजभर यांनी म्हटले आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी ओमप्रकाश राजभर यांची मंगळवारी भेट घेतली होती. त्यामुळे राजभर हे ’एनडीए’च्या बैठकीत उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. भाजपने २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०२४ पेक्षाही मोठे यश मिळविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी लहानातल्या लहान पक्षालाही सोबत घेण्याचे भाजपचे धोरण आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये यश मिळविण्यासाठी राजभर यांना सोबत घेणे भाजपला महत्त्वाचे वाटते.
 
उत्तर प्रदेशच्या राजकारणात राजभर समाजाच्या मतपेढीस कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडे सुमारे सहा ते आठ टक्के मतपेढी आहे. त्यामुळे राजभर यांच्या पक्षाने इतर कोणत्याही पक्षाशी युती केली की, ही मतपेढी त्या पक्षाकडे वळते. सध्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा एकही खासदार नाही, तरी भाजपसाठी हा पक्ष महत्त्वाचा आहे. २०१९ सालची लोकसभा आणि २०२२ सालच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राजभर यांनी आपला प्रभाव सिद्ध केला आहे. २०१७ मध्ये भाजपसोबत दाखल झालेल्या राजभर यांनी पूर्वांचलमध्ये भाजपला मोठा दिलासा दिला होता, त्यामुळे या निवडणुकीत ’एनडीए’ला तीन चतुर्थांश जागांवर कब्जा करता आला.

मात्र, २०१९ मध्ये जेव्हा राजभर यांचा पक्ष ’एनडीए’पासून वेगळा झाला, तेव्हा त्याचा परिणाम पूर्वांचलमध्ये दिसून आला. त्याचप्रमाणे २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला पूर्वांचलमध्ये काहीसा फटका बसला होता. अशा स्थितीत पूर्वांचलपासून बिहारपर्यंत या मतपेढीस हाताशी धरून मोठा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, त्याचवेळी ‘एनडीए’च्या या बैठकीत जुने सहकारी अकाली दल आणि तेलगू देसम पक्षदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चिराग पासवान यांच्यासह अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीसोबतच दि. १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधी पक्षांचीही बैठक होणार आहे. त्यामुळे दोन्ही बैठकींनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांचे संख्याबळदेखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लवकरच ’विजय संकल्प अभियान’ सुरू करणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी भोपाळ येथील प्रदेश भाजप कार्यालयात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. रोडमॅपवरही चर्चा केली. ’विजय संकल्प’ मोहिमेसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हातमिळवणी करावी, जेणेकरून विजयाचा संकल्प पूर्ण होईल, असे अमित शाह यांनी सर्व नेत्यांना सांगितले आहे. रात्री ११.३० वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. त्यानंतर झालेली ही पहिलीच बैठक होती. मध्य प्रदेशातील निवडणूक तयारी, प्रचार, व्यवस्थापन आणि इतर बाबींमध्ये फक्त यादव आणि वैष्णवच समन्वय साधतील, असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला. ’तिहेरी तलाक’ आणि ’समान नागरी संहिते’शी संबंधित मुद्द्यांवर प्रतिक्रिया घेण्याबरोबरच निवडणुकीच्या तयारीवर शाह यांनी अडीच तास चर्चा केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुका गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली लढल्या जाणार आहेत. शाह आगामी काही दिवसांत दोन्ही राज्यांना भेटी देणार आहेत. शाह मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. पक्षासाठी घातक ठरेल, अशी विधाने करू नयेत, अशा सूचना त्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या. मतांची टक्केवारी ५१ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचा अहवालही शाह यांनी प्रदेश भाजपकडून मागवला आहे.
 
या बैठकीत शाह यांनी राज्यस्तरापासून ते बूथ स्तरापर्यंतच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेतला. काँग्रेस आणि इतर पक्षांनी घेतलेल्या १०३ विधानसभा जागांवर आतापर्यंत केलेल्या तयारीचा तपशीलही त्यांनी विचारला. या जागांवर काँग्रेसची कमकुवतता आणि बूथ स्तरावर सुरू असलेली तयारी याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना शाह यांनी दिल्या आहेत. अमित शाह दि. ३० जुलैला पुन्हा भोपाळला येणार आहेत. जाहीरनामा समिती, निवडणूक समिती, निवडणूक व्यवस्थापन व अन्य समित्या स्थापन करण्याची तयारी करा, असे शाह यांनी संघटनेच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यावर मी ३० तारखेला चर्चा करेन. याशिवाय दैनंदिन अहवाल पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दर १५ ते २० दिवसांनी मध्य प्रदेशला भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शाह म्हणाले आहेत.एकूणच भाजपचा निवडणूक मोड आता सक्रिय झाला आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध राज्यांमध्ये दौरा आयोजित केले जाणार आहे. त्याचवेळी भाजपसोबत सहभागी होणार्‍या अन्य पक्षांचीही संख्या वाढणार असून, विरोधी आघाडीमध्ये मतभेद वाढण्याची जास्त शक्यता आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.