काँग्रेसच्या सर्वेने पवार ठाकरेंच्या पोटात गोळा

    17-Jun-2023   
Total Views |
maharashtra politics


मुंबई : महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजप शिवसेनेला पराभुत करू अशा वल्गना करणाऱ्या मविआत पुन्हा एकदा चलबिचल सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत काँग्रेसने स्वबळावर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे मनसुबे आखले असून वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने केलेल्या एका अंतर्गत सर्वेतील निष्कर्षांवरून पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असून जर असा निर्णय झालाच तर तो पवार आणि ठाकरेंसाठी मोठा दणका समजला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. निवडणूका एकत्र लढण्याच्या संदर्भात 'सिल्व्हर ओक'वर जाऊन घेतलेल्या आणाभाका विसरून काँग्रेस पवार ठाकरेंना धक्का देणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील आठवड्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईतील पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील पक्षसंघटनेवर मंथन करण्यात आले असून संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते एच के पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यासह महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित होती.

विधान परिषदेतील काँग्रेसच्या एका आमदाराने 'ऑफ द रेकॉर्ड' दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने केलेला अंतर्गत सर्वे आणि त्या सर्वेतील निष्कर्षांवर या बैठकीत मंथन झाले असून लोकसभा स्वबळावर लढण्याची तयारी काही नेत्यांनी केंद्रीय नेत्यांसमोर बोलून दाखवली आहे. पक्षाची संघटनात्मक अवस्था आणि लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची स्थिती भक्कम असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेतून बाहेर आल्याची माहिती 'त्या' आमदाराने दिली आहे. पण वस्तुस्थिती पाहता काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळावर लढू शकेल अशी स्थिती आहे का यासह अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.

- काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या स्थितीत आहे का ?

गेल्या ९ वर्षांमधील काँग्रेसचा परफॉर्मन्स लक्षात घेता काँग्रेसची संघटनात्मक शक्ती किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. या सर्व्हेनुसार काँग्रेस लोकसभेच्या २८ जागांवर निवडणूक लढविण्यासाठी सक्षम असून त्या नुसार पक्षाने निर्णय घेण्याचा निष्कर्ष या सर्व्हेतून बाहेर आला आहे. सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष आज स्वबळावर लढण्याच्या स्थितीत आहे का याची चाचपणी काँग्रेस नेतृत्वाने करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकात जरी काँग्रेसने विजय मिळवून सत्ता काबीज केली असली तरी त्या कर्नाटकाची आणि महाराष्ट्राची राजकीय गणिते भिन्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या स्थितीत आहे का याचे उत्तर काँग्रेसने शोधणे आवश्यक आहे.

- पक्ष नेतृत्वावरून वादाची मालिका

महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळावर लढण्यापेक्षा राज्यात पक्षाचे नेतृत्व कुणी करायचे यावरून मोठा अंतर्गत संघर्ष असल्याचे वारंवार अधोरेखित झालेले आहे. नाना पटोले विरुद्ध काँग्रेस मधील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सुरु असलेले वाद आज नवे नाहीत. पटोले विरुद्ध अशोक चव्हाण, पटोले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण, पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार, पटोले विरुद्ध थोरात आणि पटोले विरुद्ध इतर अशी ही काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांची मालिका पाहता पक्ष स्वबळावर लढण्यास सक्षम आहे का आणि पक्ष कुणाच्या नेतृत्वात लढणार यावर निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वात आधी पक्षाचे नेतृत्व कोण करणार यावर ठोस तोडगा काढणे हे काँग्रेससमोरील आव्हान असणार आहे.

- काँग्रेस स्वबळावर मग नुकसान कुणाचे ?

जर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केलाच तर त्याचा फटका कुणाला बसणार हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा ठरतो. जर फक्त शहरी भाग आणि विशेषतः मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. कधीकाळी काँग्रेस विरुद्ध तेव्हाची शिवसेना यांच्यात होणारा सामना आता भाजप विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरे असा गट आहे. पण जर ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने येऊन निवडणूक लढला तर त्याचा निश्चितच मोठा फटका मविआला आणि त्याहून मोठा फायदा भाजप शिवसेनेला होणार आहे. दुसरीकडे जर ग्रामीण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत अनेक ठिकाणी झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे जर काँग्रेसच्या स्वबळाच्या संभाव्य निर्णयामुळे मविआत फूट पडलीच तर त्याचा सर्वाधिक तोटा ठाकरे गटाला आणि त्या खालोखाल राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असेल तर हा निर्णय पवार ठाकरेंच्या पोटात गोळा आणेल हे निश्चित.



  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.