अदाणी प्रकरणी विरोधकांत दुही

राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक

    09-Apr-2023
Total Views |

Sharad PAwar
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचे म्हटलं होतं. शिवाय गौतम अदानी यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले होते की, अदानी यांचं उर्जा क्षेत्रातील योगदान मोठं आहे. पवार यांच्या या विधानावरुन विरोधी पक्षांत मतभेद निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या अधिक जवळ येत असल्याचे म्हटले जात आहे.
 
पवार यांचा दावा योग्यच : चंद्रशेखर बावनकुळे
 
हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, की शरद पवार खरे बोलले असून, त्यांची भूमिका प्रगल्भ आहे. आदानींबाबत काँग्रेसने फक्त आरोप करण्याचे काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
नाशिक दौर्‍यावर आलेल्या बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की भारताची प्रगती अनेकांना खुपायला लागली आहे. हिंडेनबर्ग अहवाल हा त्याचाच भाग आहे. हिंडेनबर्ग सारख्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवणार का, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

देशाच्या विकासासाठी उद्योग वाढले पाहिजेत, सध्या भारत आत्मनिर्भर होत आहे. भारताची प्रगती जगाला खुपत आहे. त्यामुळे हिंडेनबर्गसारख्या विदेशी संस्था आरोप करून देशाच्या प्रगतीला खीळ घालत आहेत. शरद पवार यांनी ‘अदानी’बाबत जे वक्तव्य केले आहे, ते खरेच असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
 
शरद पवार यांच्यावर काँग्रेसची टीका
 
काँग्रेसच्या अलका लांबा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, घाबरलेले, लोभी लोक आज आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. देशातील जनतेची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांपासून तसेच चोरांना संरक्षण देणार्‍या चौकीदाराशीही ते एकटेच लढत आहेत.
 
राहुल गांधी राजकीय संस्कृती बिघडवत आहेत
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग प्रकरणावर घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
 
फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं की, राजकारण होत राहील, पण काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या ३५ वर्षांच्या दीर्घकाळ सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्याविषयी केलेले हे ट्विट भयावह आहे. राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत, असही फडणवीस यांनी म्हटलं.
 
अजित पवारांनी केली गौतम अदाणींची पाठराखण.
 
एकीकडे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी सातत्याने उद्योगपती गौतम अदाणींवर टीका करत आहेत. अदाणींवरून ते केंद्र सरकारला सवाल करत आहेत. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेसचा यूपीएतला महत्त्वाचा साथीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे.
 
दरम्यान, शरद पवार जे बोलले तीच आमची आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अजित पवार यांनी जाहीर केले आहे. अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्यावर बोलू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.