काँग्रेसची जुनीच खोड!

    26-Apr-2023   
Total Views |
 
Congress
 
 
उजव्या विचारसरणीच्या कुठल्याही व्यक्तीचे या देशाच्या जडणघडणीत योगदान नाही, जर कुणी देशासाठी खस्ता खाल्ल्या असतील आणि बलिदान दिले असेल, तर ते केवळ आणि केवळ त्या एका विशिष्ट पक्ष आणि कुटुंबातील व्यक्तींनीच दिले, या भ्रमात काँग्रेसची मंडळी अनेक दशकांपासून आजही जगताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून
काँग्रेस 
नेत्यांकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कडवट देशभक्ताची अवहेलना केली जाते. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी असोत किंवा वर्षानुवर्षे गांधी कुटुंबाची हुजरेगिरी करत पदे मिळवलेली नेतेमंडळी, प्रत्येकाकडून सावरकरांवर चिखलफेक केली जाते. या नेत्यांच्या पंक्तीत आता प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचाही नंबर लागला आहे. परवा काही माध्यमांशी बोलताना त्यांनी “हा देश सावरकरांचा नसून गांधी आणि नेहरूंचा आहे,” असे विधान केले. हा देश घडवण्यात गांधी-नेहरूंचे योगदान आहे, हे मान्य असले तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी सहन केलेल्या हालअपेष्टा आणि त्यांच्यावर झालेले अनन्वित अत्याचार, हा देश कधीही विसरू शकणार नाही. प्रणिती शिंदेंनी हे विधान करण्याचे नेमके कारण काय, याचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, महिनाभरापूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांवर टिप्पणी करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरी आणि विचारशून्यतेचे प्रदर्शन पुन्हा एकदा देशासमोर केले होते.
मुळातच राहुल गांधी असोत शिवानी वडेट्टीवार असोत, सुजाता आनंदन असोत किंवा प्रणिती शिंदे ही सगळीच मंडळी सावरकरद्वेषाने मानसिक आजारी आहेत, पछाडलेली आहेत, हे स्पष्ट आहे. प्रणिती शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या सोलापूरमधील त्यांच्या मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी आणि गणित पहिले तर त्यांनी अशाप्रकारचे हिंदुत्वविरोधी विधान करणे म्हणा फारसे अनपेक्षित नाही.
देशात हिरवा दहशतवाद अस्तित्वात नसून हिंदूंची आक्रमक शैली म्हणजे भगवा दहशतवाद आहे, अशी टिप्पणी करणार्‍या सुशीलकुमार शिंदेंच्या कन्येकडून दुसरी अपेक्षा ठेवणे म्हणे सर्वस्वी व्यर्थच. सावरकरद्वेषाची काँग्रेसची ही खोड आता जुनी झाली आणि त्यात सुधारणा होणे नाही!
 
 
अन् केसीआरची नवी खोड!
 
 
राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी या वादळाचा उदय झाल्यापासून काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे कथित नेते निष्प्रभ ठरताना दिसतात. आपले अपयश लपविण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना खोटा का होईना, पण आत्मविश्वास देण्यासाठी काही नेत्यांकडून आपण मोदींना पर्याय ठरु शकतो, अशा वल्गना केल्या गेल्या. मात्र, त्या वल्गना हवेतच विरल्या. आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू असोत, ममता बनर्जी असोत शरद पवार किंवा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, या सगळ्याच मंडळींनी आपली राज्ये सांभाळण्याऐवजी राष्ट्रीय पातळीवर मोदींना पर्याय म्हणून उभे ठाकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मात्र, ते पूर्णपणे अपयशी ठरले, हे निर्विवाद सत्य. या पंक्तीत आता तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जाऊन बसले आहेत. त्यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आता मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. संभाजीनगरला नुकतीच एक मोठी सभा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा. पण, अशा सभांचे मतांमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता किती असते, हे केसीआर यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असावे. तेलंगणला लागून असलेल्या नांदेड आणि मराठवाड्यात पक्षाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून, काही माजी आमदार नेत्यांना गळाला लावण्यात ते यशस्वी ठरले आहेत. तेलंगणात केसीआर यांनी सरकारी पैशातून अनेक सुविधा फुकट वाटण्याचा शिरस्ता पाळला असून, तोच प्रकार महाराष्ट्रातही करण्याचे आश्वासन ते इथल्या सभांमधून देत आहेत. मोदींना आव्हान देण्याची भाषा करणारे केसीआर मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करून पक्षाचा विस्तार करण्याचे मनसुबे आखत असले तरी एका नव्या पक्षाची बीजे नव्या प्रदेशात रोवून त्याचे पीक काढण्यासाठी किती कालावधी लागतो, याची कल्पना केसीआरना नसावी. चंद्राबाबूंनी विरोधी ऐक्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यानंतर त्यांची झालेली स्थिती लक्षात घेता, केसीआरनी राष्ट्रीय पर्याय होण्याऐवजी आता राज्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. राष्ट्रीय नेता होण्याची महत्त्वाकांक्षा ते मराठवाड्यात सभा घेत फिरण्याची आलेली नामुष्की म्हणजे ‘आसमान से गिरे और खजूर में अटके’असेच केसीआरच्या या नवीन खोडीचे वर्णन करावे लागेल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.