पायलट ‘आझाद’ होणार?

    10-Apr-2023   
Total Views |
Sachin Pilot revives war with Rajasthan CM Ashok Gehlot


राजस्थानात काँग्रेसमधील अंतर्गत धुमश्चक्री कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला. पायलट यांनी गेहलोत यांच्यावर भाजप नेत्यांशी संगनमत केल्याचा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भ्रष्टाचारातून वाचविल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, राजस्थान सरकारने भ्रष्टाचारावर कारवाई न केल्यास त्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणाचा इशारा दिला. अनेक घोटाळे गेहलोत सरकारने दडपून टाकल्याचा तसेच दीड वर्षांपूर्वी सरकारला आणि पक्षाला लिहिलेल्या पत्राला कोणतेही उत्तर न मिळाल्याचा आरोपही पायलट यांनी केला आहे. ४५ हजार कोटींच्या खाण घोटाळ्यावर गेहलोत सरकार शांत असल्याचेही त्यांचे म्हणणे. सरकार स्थापन झाल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या खर्‍या, पण कारवाईच्या नावाने मात्र बोंब. खाणमाफिया, भूमाफिया, दारू माफिया यांचा राजस्थानात सुळसुळाट. त्यातच राज्यात सहा-सात महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजतील. त्यापूर्वी मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची आस लावून बसलेले पायलट खुर्चीवर स्वार होणार की नाही, हा चिंतनाचा विषय. पुढील निवडणुकीत तरी त्यांना तितका मान-सन्मान मिळेल की नाही, याची शाश्वती नाहीच. परंतु, इतकं सगळं होत असताना पायलट नेमके काँग्रेसमध्ये का थांबले, हाही प्रश्न आहे. मुळात पायलट यांनी अनेकदा आपली वचक दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवी असलेल्या गेहलोतांनी दरवेळी पायलट यांना आस्मान दाखवले. परिणामी, बंडखोरी करायला गेलेल्या पायलट यांना हातचे उपमुख्यमंत्रिपदही गमवावे लागले. काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि राहुल गांधींच्या अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. भाजप हा नेत्यांना घडवणारा पक्ष आहे आणि काँग्रेस उगवत्या नेत्यांना डुबवणारा पक्ष असल्याचे आझाद म्हणाले. त्यामुळे पायलट यांच्यासारख्या युवा नेत्याचा वारंवार अपमान आणि त्याला अडगळीत टाकण्याचा प्रयत्न होत गेला, तर काँग्रेस पक्ष अडगळीत होता, आहे आणि यापुढेही राहणार,यात काही शंका नाही.

ममताबानोंची हिंदूद्वेष्टी बांग

 
सत्तेत असणार्‍या ममता बॅनर्जींनी सध्या बंगालमध्ये दोन्ही भूमिका पार पाडण्याचा जणू चंगच बांधला आहे. नुकत्याच त्या ३० तासांसाठी धरणे आंदोलनाला बसल्या आणि इकडे लोकशाहीसुद्धा लाजली. केंद्र सरकार बंगाल सरकारशी भेदभावाने वागत असल्याचा आरोप करत ममतांनी धरणे दिले आणि ‘और एक दफा दिल्ली चलो’चा नारा दिला. आता या नार्‍यातच ममतांचा इरादा स्पष्ट होतो. ८० वर्षांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला होता आणि आता त्याच धर्तीवर ममतांनीही ‘चलो दिल्ली’चा नारा दिला. ही अशी तुलना ममतांनी करणे म्हणजे बोस यांचा अपमानच म्हणावा लागेल. दरम्यान, हिंदूंच्या दर सण-उत्सवाला बंगाल धुमसत होते. परंतु, सणांच्या दिवशी ही आग मात्र देशभर पोहोचते. कुठे भाजप नेत्यांवर दगडफेक, हल्ले तर कुठे कार्यकर्त्यांच्या थेट हत्या. यंदाच्या श्रीरामनवमीला तर बंगालमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांवर दगडफेक, जाळपोळ झाली. या घटनांची आग पुढे बिहारपर्यंत पोहोचली.श्रीरामनवमीनंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रांवर ममतांनी आक्षेप घेत दंगली घडविण्याचा संशय व्यक्त केला. ममतांनी “रामनवमीच्या दंगेखोरांना संपवण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करा,” असे मुस्लीम समाजाला प्रक्षोभक आवाहन केले. एक मुख्यमंत्रीच अशी दंगे भडकावणारी वक्तव्ये करणार असेल, तर राज्यातील जनतेने न्याय तरी कुणाकडे मागायचा? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकानेही बंगालमधील हिंसेला ममता बॅनर्जी यांनाच जबाबदार धरले. पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले नसल्याचा ठपकाही या पथकाने ठेवला. या पथकाचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश एल. नरसिम्हा रेड्डी यांनी पश्चिम बंगालमधील हावडा आणि हुगळी येथे झालेली हिंसा हे ममतांचे अपयश असल्याचे सांगितले. श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर झालेले हल्ले आणि हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याची टिप्पणी कोलकाता उच्च न्यायालयाने देखील केली. ममतांनी बंगाल राज्याला स्वतःची प्रॉपर्टी समजले असून, त्याप्रमाणे सगळा कारभार सुरू आहे. दिल्लीकडे कूच करण्याच्या गोष्टी करून ममता काय साध्य करू पाहताय हा वेगळा प्रश्न. परंतु, पूर्वी डावे आणि आता ममताबानोंच्या हिंदूद्वेष्ट्या बांगांनी हिंदूंचं मात्र मरण होतंय, हेही तितकच खरं!

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.