अमेरिकेत संयुक्त कुटुंब पद्धती

    28-Mar-2023
Total Views |
Joint family system in America

'संयुक्त कुटुंब पद्धत’ ही भारताने जगाला दिलेली देणगी. मात्र, अलीकडच्या काळात भारतातूनच ही पद्धत हद्दपार होते की काय, असे चित्रही निर्माण झाल्याचे दिसते. वाढत असलेली वृद्धाश्रमांची संख्या आणि लहान होणारा कुटुंबाचा आकार नक्कीच चिंताजनक आहे. एकीकडे भारतात मी आणि माझे कुटुंब, त्यात नवरा, बायको आणि मुलं यांचा समावेश. म्हातारे आई-वडिलांना यात असलेले स्थान हळूहळू कमी होत असल्याने मुलं असूनही निराधार आई-वडिलांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात दाखल होणार्‍यांची संख्याही वाढत आहे. ही बाब भारताच्या संयुक्त कुटुंब पद्धतीला ठेच पोहोचणारीच. एकीकडे भारतात हे चित्र निर्माण होत असताना, सातासमुद्रापार अमेरिकेत मात्र संयुक्त कुटुंब पद्धतीचे महत्त्व उशिरा का होईना वाढू लागले आहे. तेथील समाजात मोठे बदल होत असून संयुक्त कुटुंबे झपाट्याने वाढत आहेत. २३ टक्के प्रौढ आता त्यांचे पालक आणि आजी आजोबांसोबत राहतात. ‘एआरपी’ या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, २०१५-२० दरम्यान ‘सँडविच कुटुंबांची’ संख्या २८ टक्क्यांवरून ३० टकक्यांपर्यंत वाढली आहे. येथे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक जे त्यांचे पालक आणि प्रौढ मुलांची काळजी घेतात, त्यांना ‘सँडविच पिढी’ म्हणतात. जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे अशा कुटुंबांवर ताण येतो, असे मानले जाते. पण, कालांतराने ही कुटुंबे पालक व मुलांत समतोल राखायला शिकली आहेत. ते याला जबाबदारीचे ओझे मानत नाहीत. कधी कधी वृद्ध आई-वडील आणि मुलांची काळजी घेणे या दोन भिन्न वास्तवांमध्ये जगण्यासारखे असते. दोन पिढ्यांना सुखी ठेवणे हे अवघड काम असले तरी अमेरिकेतील युवा पिढी याचे व्यवस्थापन करायला शिकली असून कुटुंबासोबतच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ही एक अनमोल भेट आहे, याची त्यांना जाणीव होत असल्याचे एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. विभक्त कुटुंबापेक्षा संयुक्त कुटुंबातील मुले अधिक शिक्षित असतात. संयुक्त कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक स्तर विभक्त कुटुंबापेक्षा चांगला असतो. मोठ्या कुटुंबांमध्ये राहणारे किमान ३० टक्के तरुण पदवीधर आहेत, तर विभक्त कुटुंबांमध्ये ही संख्या २० टक्के आहे. ही आकडेवारी बरीच बोलकी असून भारतीय नाकारत असलेली संयुक्त कुटुंब पद्धती अमेरिका स्वीकारताना दिसते, हेही नसे थोडके!


पुन्हा ‘कमला’...


महिलांना व्यक्ती नव्हे, तर वस्तू समजण्याची प्रथा काही समाजांत पूर्वापार चाललेली. काही ठिकाणी महिलांची विक्री होणे किंवा विशिष्ट उत्सवासाठी त्यांना भाडेतत्वावर घेतले जाते. या प्रथेबाबत अधूनमधून ओरडही होत असते. यावर १९८४ मध्ये ‘कमला’ या नावाचा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. १९७२ मध्ये राजेश खन्नाचा ‘जोरु का गुलाम’ या चित्रपटातील अभिनेत्री पती, बंगला, नोकर-चाकर सारे काही भाड्याने घेत असते. चित्रपटातील हे कथानक गेल्या काही वर्षांत वास्तवात येत आहे. हल्लीच्या स्मार्ट युगात तर ते सहज उपलब्ध होऊ लागले आहे. हे वास्तव भारतातच नव्हे, तर चीन आणि जपान या देशातही भाडेतत्वावर मित्र किंवा मैत्रीण सहज मिळत असते. आजवर आपण घर, दुकान, सदनिका, कार, बस भाड्याने मिळतात असे ऐकले आहे आणि त्याचा अनुभवही अनेकांनी घेतला आहे. पण, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड भाड्याने मिळतो, असे जर कुणी सांगितले, तर त्यावर सहजासहजी विश्वास बसणे कठीण आहे. पण, चीन आणि जपानमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. हुआन शहरातील एका शॉपिंग सेंटरने १५ मुली भाड्याने दिल्या आहेत. या मुलींना सोबत घेतल्यानंतर, त्यांच्यासोबत शॉपिंग, लंच किंवा डिनरला जाऊ शकता. यासाठी फक्त एक अट मान्य करावी लागेल की, तुम्ही त्या मुलीला हात लावू शकत नाही.चीनमध्ये मैत्रिणींचा ट्रेंड वाढत असताना जपानमध्ये भाड्याने बॉयफ्रेंडचा ट्रेंड वाढत आहे. जपानी मुली ’सुडो’ म्हणजेच बनावट बॉयफ्रेंड बनवण्यासाठी पाच हजार जपानी येन म्हणजेच ३ हजार, १५६ रुपये भाड्याने घेतलेल्या बॉयफ्रेंडला एक तासांसाठी देत आहेत. सरोगेट बॉयफ्रेंडची प्रथा जपानमध्ये वेगाने वाढत आहे. जपानच्या ‘सोनीईर्‍याप्राईम’ नावाच्या कंपनीने या प्रकारची सेवा सुरू केली. भारतात २०२२ मध्ये, मोहित चुरीवाला आणि आदित्य लखियानी यांनी बंगळुरुच्या लोकांसाठी ’द बेटर डेट’ नावाचे अ‍ॅप सुरू केले. त्यांची सेवा देखील भाड्याने प्रियकर देणे हा आहे. एकंदरीतच आजवर चित्रपट किंवा कथा कादंबर्‍यांतून भाडेतत्वावर मिळणार्‍या व्यक्ती म्हणजेच मित्र किंवा मैत्रीण आता भाडेतत्वावर मिळू लागले आहेत. दक्षिण कोरियातही हे प्रकार प्रचंड वाढत असल्याने मानवी भविष्य आणि भवितव्य कठीण आहे.



-मदन बडगुजर