‘हॅटट्रिक’साठी भाजप सज्ज

    07-Dec-2023   
Total Views |
BJP ready for hat trick in Lok Sabha elections

 
निवडणूक जिंकल्यानंतर परदेशात सुट्टी घालवायला जाण्याची पद्धत भाजपमध्ये नाही. त्याउलट एक निवडणूक झाली की, आगामी निवडणुकीसाठी पक्षसंघटनेस सज्ज करण्यासाठी भाजप नेते लगोलग कामाला लागतात. कोणतीही निवडणूक पूर्ण क्षमतेने लढण्याची भाजपची सवयच. त्यामुळे पंतप्रधान मोदी म्हणाले त्याप्रमाणे, २०२४ साली विजयाची हॅटट्रिक साधण्याची भाजपची पूर्ण तयारी झाली आहे.

राजकीय नेत्यांची देहबोली हा अतिशय महत्त्वाचा आणि रंजक असा विषय. कारण, एखाद्या नेत्याच्या देहबोलीतून त्याच्यासह त्याच्या पक्षाची नेमकी अवस्था सहज लक्षात येते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले. त्याचप्रमाणे हा विजय म्हणजे, पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत मिळवायच्या हॅटट्रिकची नांदी असल्याचेही त्यांनी सांगितले. या भाषणादरम्यान पंतप्रधांनांची देहबोली आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेली होती. त्याउलट तीन राज्यांमधील पराभवानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी हे चार दिवस कुठेही दिसले नाहीत. ते सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनालाही दिसले नाही, पक्षाच्या एखाद्या पत्रकार परिषदेतही दिसले नाहीत. ते दिसले थेट गुरुवारी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शपथविधीमध्ये. त्यामुळे राहुल गांधी यांना कदाचित तीन राज्यांमधील पराभव जिव्हारी लागला असावा, असे मानण्यास वाव आहे. मात्र, असे पराभव त्यांना नवीन नाहीत.

केवळ राहुल गांधीच नव्हे, तर काँग्रेसच्या अन्य नेत्यांचीही देहबोली सध्या अतिशय नकारात्मक झाली आहे. कारण, भाजपला मध्य प्रदेशात एवढा मोठा विजय मिळेल, राजस्थानमध्ये सत्ता आपल्या हातातून अगदी सहजपणे जाईल आणि छत्तीसगढमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी त्यांना आशा नव्हती. कारण, कर्नाटकच्या विजयानंतर आता काँग्रेसचा जनाधार वाढला असल्याची त्यांची खात्री झाली होती. त्यामुळेच लोकसभेत बुधवारी जम्मू-काश्मीरविषयक दोन विधेयकांवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घणाघाती उत्तरास प्रत्युत्तर देणे कोणत्याही काँग्रेस नेत्यास जमले नाही. काँग्रेस पक्ष आता पुन्हा अडचणीत आला आहे. नेतृत्वासह जनाधाराचा मुद्दा काँग्रेसला २०१४ सालापासून सोडवता आलेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीस अवघी तीन ते चार महिनेच उरले असताना, हा प्रश्न सोडवता येईल, अशी आशा करणेही व्यर्थच.चार राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसचा एक-तीन असा पराभव झाल्यानंतर, काँग्रेस पक्ष आता पूर्णपणे ‘बॅकफूट’वर गेला आहे. परिणामी, ‘इंडिया’ आघाडीच औपचारिक बैठक रद्द करण्याची वेळ येऊन, बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आघाडीची अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते. याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बैठकीत पक्षाचे नेते विचारमंथन करत असल्याच्या चित्रात निराशा स्पष्टपणे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आघाडीलाही धक्का बसल्याचे चित्रातील आघाडीच्या नेत्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसते.
 
त्याचवेळी या पराभवामुळे नेतृत्व आणि जागावाटपाची सौदेबाजी करण्यासाठी ’इंडिया’मधील काँग्रेसची स्थिती कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसते. देशाचा प्रमुख विरोधी पक्ष स्वबळावर जिंकण्यास सक्षम नाही, असे आघाडीचा प्रमुख घटक जनता दलाने (युनायटेड) म्हटले आहे. जदयुचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, ”मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेसचा पराभव आणि भाजपच्या विजयाचे संकेत देतात. त्याचवेळी निवडणुकीत विरोधी पक्षांची ’इंडिया’ आघाडी दिसलीच नसल्याचा टोला त्यांनी लगाविला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पराभवानंतर समाजवादी पक्षाने तर कमलनाथ यांनी अखिलेश यादव यांच्याबद्दल केलेले वक्तव्य, या पराभवाला कारणीभूत असल्याचा दावा केला होता. कमलनाथ यांनी जागावाटपाच्या वादासंदर्भात अखिलेश यादव यांच्याबाबत ’अखिलेश वखिलेश’ अशी टिप्पणी केली होती. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनीदेखील हा केवळ काँग्रेसचा पराभव असल्याचे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी प्रादेशिक पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पराभवानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी कदाचित ’भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करतील. अर्थात, लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना, अशाप्रकारे यात्रा काढणे कितपत परवडणारे आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस धक्का लावू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात खालच्या पातळीवरचा प्रचार करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नव्हती. मात्र, त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. मात्र, राहुल गांधी हे सल्लागारांवर अवलंबून असतात, असा आरोप भाजपतर्फे नेहमी केला जातो. त्यामुळे त्यात तथ्य असल्यास हेच सल्लागार त्यांचा स्वतःचा मोदीद्वेष व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचा वापर करतात का, असा प्रश्न पडतो.

त्याचवेळी आता उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळविण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. उत्तर प्रदेश हे पक्षासाठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. येथील जनतेने त्यांना दोन वेळा निवडणुकीत मोठा विजय मिळवून दिला. आता त्या विजयात सुधारणा करण्यासाठी पक्ष पुन्हा प्रयत्नशील आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झालेल्या १४ जागा यावेळी नियोजनाच्या शीर्षस्थानी आहेत. पक्षाचे केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व येथे कमळ फुलवण्यासाठी सज्ज झाले आहेत.भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ६४ जागा भाजपने जिंकल्या होत्या. बसपने दहा जागा जिंकल्या होत्या, सपला पाच, तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. यानंतर पोटनिवडणुकीत आझमगड आणि रामपूर या आणखी दोन जागा भाजपच्या खात्यात आल्या. भाजपने मैनपुरी पोटनिवडणुकीतही खूप प्रयत्न केले. मात्र, सपच्या डिंपल यादव यांना विजयापासून रोखता आले नाही. त्यामुळे आता एकूण १४ जागा भाजपच्या रणनीतीमध्ये प्राधान्यक्रमावर आहेत. या जागांमध्ये सोनिया गांधींच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघासह मैनपुरी, लालगंज, संभल, मुरादाबाद, गाझीपूर, घोसी, श्रावस्ती, अमरोहा, बिजनौर, जौनपूर, नगीना, सहारनपूर आणि आंबेडकरनगर यांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत उत्तर प्रदेश भाजपचे विशेष लक्ष त्या २२ हजार बूथवर आहे, जिथे भाजपला विजय मिळाला नाही. किंबहुना, बूथ स्तरीय नियोजनामुळेच भाजप विरोधकांच्या खूप पुढे आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी त्या प्रत्येक बूथच्या सामाजिक आणि राजकीय गणिताची ’ब्लू प्रिंट’ तयार करतात. यामध्ये त्या बूथवर भाजप न जिंकण्याची कारणे आणि अन्य पक्ष किंवा नेता जिंकण्याची कारणे, त्या बूथवर भाजप संघटनेची स्थिती काय आहे, विरोधी पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी कोण आहेत आदींची माहिती घेण्यात आली आहे. भाजपच्या या बूथस्तरीय नियोजनाचा परिणाम २०१९च्या लोकसभा आणि २०२२च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा जिंकता आल्या असल्या, तरी त्यांच्या मतदानाची टक्केवारी सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये भाजपची मते ४२.३० टक्के होती, जी २०१९ मध्ये वाढून ४९.६ टक्के झाली. म्हणजे उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत पडलेल्या एकूण मतांपैकी निम्मी मते एकट्या भाजपला गेली. हीच बूथ स्तरावरील ताकद आगामी विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरली आणि उत्तर प्रदेशात भाजपला सहजपणे पुन्हा सत्ता मिळाली.

या महिन्यापासून भाजपने राज्यभर विविध समाजाच्या परिषदा घेण्यास सुरुवात केली आहे. या परिषदांची सुरुवात जिल्हास्तरावर होणार असून, नंतर राज्यस्तरावर परिषदा होणार आहेत. त्यानंतर सर्व मागासवर्गीयांचा महाकुंभ आयोजित केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने यादव, कुर्मी, मौर्य, कुशवाह, सैनी, शाक्य इत्यादी ओबीसी समुदायांच्या परिषदा आयोजित केल्या जातील. त्यातून लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी योद्धे तयार केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक विधानसभेत वेगवेगळ्या समुदायाचे किमान ५०० ओबीसी योद्धे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळताना दिसावेत, हा यामागचा उद्देश आहे.निवडणूक जिंकल्यानंतर परदेशात सुट्टी घालवायला जाण्याची पद्धत भाजपमध्ये नाही. त्याउलट एक निवडणूक झाली की, आगामी निवडणुकीसाठी पक्षसंघटनेस सज्ज करण्यासाठी भाजप नेते लगेचच कामाला लागतात. त्यामुळे भाजपने आपली पक्षयंत्रणा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कधीच सज्ज केली आहे. विशेष म्हणजे, कोणतीही निवडणूक पूर्ण क्षमतेने लढण्याची भाजपची सवय आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी म्हणाले, त्याप्रमाणे २०२४ साली विजयाची हॅटट्रिक साधण्याची भाजपची पूर्ण तयारी झाली आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.