वारू महापालिकेतही उधळणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2022   
Total Views |
 
bmc
 
 
 
 राज्यसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुका राज्यात पार पडत आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची उडालेली धांदल आणि दुसरीकडे भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ यामुळे दोन्ही निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे. मुळात तीन पक्षांच्या आमदारांना एकत्रित करण्यात सरकारची मोठी दमछाक झाली, हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले. दुसरीकडे दोन वर्षांपासून राज्यातील सत्तेपासून दूर असलेल्या भाजपचे आमदार मात्र एकगठ्ठा आणि एकत्रित स्वरुपात पक्षाशी जोडलेले आहेत, हे भाजपने दोन्ही निवडणुकांमध्ये ठळकपणे दाखवून दिले. एकंदरच काय तर सत्ता असो वा नसो, भाजपचा वारू महाराष्ट्रात मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये चौफेर उधळला आहे, हे निर्विवाद. पंढरपूरमध्ये मारलेली मुसंडी, देगलूरमध्ये मताधिक्यात झालेली घसघशीत वाढ आणि कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीला एकहाती दिलेली करारी झुंज यामुळे तीन पक्षांपुढे भाजप प्रत्येक निवडणुकीत यशस्वी झालेला दिसला आहे.
 
 
त्यामुळे आता राज्यसभा आणि विधान परिषदेसोबतच काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेतही भाजप मुसंडी मारणार का, याकडे राजकीय निरीक्षक आणि ‘पॉलिटिकल पंडितां’सोबतच सर्वपक्षीय कार्यकर्तेही नजर लावून बसले आहेत.
२५ वर्षे युतीत लढल्यानंतर मुंबईत कधी नव्हे ते यंदा भाजपला सगळी बंधने झुगारून आणि कुठलाही राजकीय दबाव न बाळगता, निवडणूक लढवण्याची संधी आली आहे. इतकी वर्षे सेनेच्या दहशतीखाली दबलेला भाजपचा तो असंतुष्ट कार्यकर्ता आता पक्षाच्या विजयासाठी त्वेषाने पेटून उठला आहे आणि त्याने शिवसेनेची ’पोलखोल’ सुरू केली आहे. त्यातच महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांसारख्या चाणाक्ष नेतृत्वाच्या हाती असल्याने भाजपला मुंबईत आपली ‘स्पेस’ वाढविण्यात यश आले असून, त्याचा परिणाम २०१९ साली विधानसभेत पाहायला मिळाला आहे.
 
 
त्यामुळे एका बाजूला महाविकास आघाडीत निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती, भाजपने त्वेषाने आणि आक्रमकपणे सुरू केलेली वाटचाल आणि भाजपची मुंबईत वाढलेली ताकद यामुळे भाजपचा वारू मुंबई महापालिकेतही उधळणार का? याचे उत्तर काही महिन्यांत मिळेलच कारण घोडा मैदान फार दूर नाही.
 
घुसमट बाहेर येणार?
 
 
महाराष्ट्रात पार पडत असलेल्या राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. वरकरणी ही अस्थिरता आणि अस्वस्थता तीन पक्षांमधील वाटत असली तरी त्याच्या पोटात भविष्यातील अनेक राजकीय उलथापालथीची मुळे दडलेली आहेत, हे नाकारून चालणार नाही. राज्यसभेचा माहौल क्षणात होण्यापूर्वीच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमधील परस्पर विश्वासाची परीक्षा पाहणारी आहे. दोन्ही काँग्रेसकडून होणारी शिवसेनेची मुस्कटदाबी आणि त्यातून सेना आमदारांमध्ये खवळलेला असंतोष या निवडणुकीत परिवर्तीत होणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळेल तेव्हा राज्यात राजकीय भूकंप घडणार, हे निश्चित. राज्यसभेत महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट होणार का, हे निकालातून स्पष्ट होईलच. पण, तरी महाविकास आघाडीची खरी परीक्षा ही विधान परिषद निवडणुकीत होणार आहे.
 
 
राज्यसभेचे मतदान खुले होते. मात्र, विधान परिषदेसाठीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होते. कुठल्या आमदाराने कुठल्या उमेदवाराला मतदान केले, याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांची मोठी फाटाफूट परिषदेच्या निवडणुकीत होऊ शकते. आघाडीतील आमदारांची नाराजी हा मागील अडीच वर्षांपासून गाजणारा मुद्दा आहे. शिवसेनेतील एक मोठा गट पक्षनेतृत्वावर नाराज असून त्याचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे एका मंत्र्याकडे असल्याचेही चर्चिले जाते. काँग्रेस आमदारांचीही स्थिती फारशी वेगळी नाही. काँग्रेस आमदारदेखील पक्षनेतृत्वावर नाराज असून त्यांनी आपली घुसमट वारंवार बोलून दाखवलेली आहे. थोडक्यात काय, तर महाविकास आघाडी सरकार हे असंतुष्ट आणि नाराजांचे सरकार असून ते ‘सत्ता’ नावाच्या एका दोलायमान आधारावर तग धरून उभे आहे. २०१०-११ साली झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तत्कालीन आघाडी सरकारची १२ ते १५ मते फोडण्यात गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले होते आणि येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत जर त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि आघाडीची मते फुटली, तर ती महाविकास आघाडीतील बाहेर पडणारी घुसमट असेल यात दुमत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@