कम्युनिझम आणि ईश्वराची ताकद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2021   
Total Views |

communism_1  H
‘मिरॅकल ऑन विस्तुला’ म्हणजे ‘कॅथलिक’ धर्मश्रद्धेने अधर्मीय ‘कम्युनिझम’चा केलेला पराभव होय. ‘कम्युनिझम’ विरोधी ‘कॅथोलिझम’ हा या लढाईचा एक भाग आहे. धर्मश्रद्धा अतिशय प्रबळ असतात. प्रेषित मोहम्मदांच्या अनेक लढायांमध्ये अल्लाने त्यांना मदत केली, असे इस्लामी इतिहासकार सांगतात. बदरची लढाई त्याचे एक उदाहरण आहे. असा दैवी चमत्कार पाश्चात्य देशातही घडल्याचे सांगण्यात येते. फ्रान्सची ‘जोन ऑफ आर्क’ अशाच चमत्काराचे उदाहरण आहे.
रशियन कम्युनिस्ट क्रांतीला २०१७ साली १०० वर्षे झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे झाली. रशियातील कम्युनिस्ट पक्षाची शंभरी ते ७० वर्षांचे झाल्यानंतरच भरली. रशिया आज कम्युनिस्ट नाही. जागतिक क्रांती, सामाजिक न्याय, शोषणमुक्त समाज, भांडवलशाहीचा नाश, धर्म काही कामाचा नाही आणि राष्ट्रवाद अतिशय वाईट गोष्ट आहे, या कम्युनिस्टांच्या सर्व संकल्पना जेव्हा बर्लिनची भिंत कोसळली तेव्हा कोसळल्या. रशिया कम्युनिस्ट असताना, जगातील कम्युनिस्ट रशिया सांगले तसे वागत असत. रशियाने देशद्रोह करायला सांगितला तर हे कम्युनिस्ट आनंदाने करीत असत. रशियाने त्या त्या देशातील संस्कृती, धर्मपंरपरा यांना शिव्या घाला, असे जर सांगितले तर कम्युनिस्ट पक्ष ते अतिशय उत्साहाने करीत, भारतातील कम्युनिस्टांची ही ओळख आहे. ते धर्मद्रोही आहेत, संस्कृतीद्रोही आहेत. उज्ज्वल परंपरा आणि मूल्य यांचेदेखील द्रोही आहेत.
 
असा द्रोह पोलंडमधील कम्युनिस्ट पक्षाने १९२० साली केला नाही. १९२० साली क्रांतीची मशाल घेऊन लेनिनच्या सेना पोलंडमध्ये घुसल्या. पोलंडची राजधानी वॉर्सापर्यंत त्या आल्या. २० ऑगस्टला रशियन लाल सेनेचा पोलंड सेनेने धुव्वा उडवला. हा दिवस आजही पोलंडमध्ये राष्ट्रीय गौरवाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या लढाईचा इतिहास जसा रंजक आहे तसा, या लढाईमुळे पश्चिम युरोपात कम्युनिझमचा प्रचार कायमचा रोखला गेला. इतके या लढाईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
पहिले महायुद्ध १९१८ साली संपले. पोलंड तेव्हा स्वतंत्र झाला होता. पोलंडच्या सीमा जर्मनीला लागून आहेत आणि रशियालाही लागून आहेत. इतिहास काळापासून पोलंड आणि रशिया यांच्यात हाडवैर आहे. या हाडवैराचे कारण ख्रिश्चन धर्म आहे. पोलंड ‘कॅथलिक’ आहे आणि रशिया ‘ऑर्थोडॉक्स’ आहे. दोघेही ख्रिश्चन आहेत, पण दोघांचे पंथ वेगळे. रशियाला ‘कॅथलिक’ ख्रिश्चन चालत नाही आणि पोलंडला ‘ऑर्थोडॉक्स’ ख्रिश्चन चालत नाही. इतिहासकाळात पोलंड आणि रशिया यांच्यात अनेक युद्धे झाली. रशियाचा खूप मोठा भूभाग पोलंडने आपल्या ताब्यात घेतला. पोलंडचे दुर्दैव असे की, अनेकवेळा तो महासत्तांच्या सत्ताकारणांची शिकार बनत गेला. दीर्घकाळ पोलंड नावाचा देश अंर्तधान पावला. त्याचा नव्याने जन्म इ. स. १९१८ साली झाला.
 
पहिल्या महायुद्धात जर्मनीने पोलंड जिंकला आणि पोलंडचा समृद्ध प्रदेश जर्मनीला जोडून टाकला. १९१८ साली जर्मनीचा पूर्ण पराभव झाला. जर्मन सेनेला पोलंड खाली करावे लागले. ज्या प्रदेशातून जर्मन सेनेने माघार घेतली. त्या प्रदेशात रशियन सैन्य घुसले. त्यांनी तो प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. पोलंडला ते मान्य नव्हते, म्हणून पोलंडने युक्रेनवर हल्ला करुन युक्रेनची राजधानी कीव्ह जिंकून घेतली आणि पाोलिश प्रदेशातून रशियन सेनेला माघार घ्यायला लावली. तेव्हा रशियात बोलशेव्हिक क्रांतीविरुद्ध उठाव झाला होता. रशियन सेना हा उठाव मोडून काढण्यात गुंतलेली होती. १९२० पर्यंत रशियन सेना रशियातील उठाव मोडून काढण्यात यशस्वी होत गेली. तेव्हा लेनिनच्या डोक्यात कल्पना अशी आली की, बंदुकीतील बायोनेटच्या आधारे कम्युनिस्ट क्रांती पश्चिम युरोपात घेऊन गेले पाहिजे. त्याची योजना अशी होती की, रशियन लाल सेना पोलंडमध्ये शिरतील, त्यांचे स्वागत तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने करावे. लालसेना मुक्तीसेना आहे, असे म्हणावे आणि त्याच वेळी कामगारांनी उठाव करुन कारखाने बंद करावेत.
 
पोलंडमधली कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष नव्हता. त्यांनी उलटा निरोप पाठवला,“पोलंडवर लालसेना घालविणे धोकादायक आहे. सर्व पोलंड त्याच्याविरुद्ध उभी राहील, म्हणून हा गाढवपणा करु नका.” लेनिनच्या डोक्यात जागतिक क्रांतीची हवा शिरलेली असल्यामुळे त्याने सेनाधिकार्‍यांना पोलंडमध्ये घुसण्याची आज्ञा दिली. युद्धामुळे जर्मनीची वाताहत झाली होती. अगोदर पोलंड आणि नंतर जर्मनी आणि मग पुढे पश्चिम युरोपातील फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क इत्यादी देश अशी लेनिनची व्यूहरचना होती. रशियन सेनापती आपल्या सेनेला म्हणतो की, “जागतिक क्रांतीचे भवितव्य पश्चिम (पश्चिम युरोप) ठरविणार आहे. श्वेत पोलंडच्या मृतदेहावरुन जागतिक क्रांतीचा रथ न्यायचा आहे. आपल्या बंदुकांच्या आधारे कष्टकरी जनतेला सुख आणि शांती आपल्याला द्यायची आहे.”
 
रशियन सेना अगोदर युक्रेनमध्ये घुसल्या आणि तिथे त्यांना यश मिळाले. पोलंड सैन्याला माघार घ्यावी लागली. त्यांनतर रशियन सेना पोलंडमध्ये घुसली. वाटेत जे ‘पोलस्’ (पोलंडचे नागरिक) सापडतील, त्या सर्वांना ठार करण्यात आले. तेव्हा पोलंडमध्ये अशी भावना निर्माण झाली की, ईश्वरला न मानणारे हे कम्युनिस्ट सैतानाचे अवतार आहेत. त्यांचे आक्रमण सर्व ख्रिश्चन जगतावर आहे. रशियाचे आक्रमण जुलै १९२० पासून सुरु झाले. ऑगस्ट ६ पर्यंत रशियन सैन्य पोलंडमध्ये खूप आतमध्ये घुसले. पोलंडने मित्रराष्ट्रांकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितली. इंग्लंडने ती देण्याचे कबूल केले, पण पाठविली नाही. फ्रान्सने खूप उशिरा पाठविली. दि. १५ ऑगस्टपर्यंत रशियन सेना पोलंडची राजधानी वॉर्सापासून केवळ तेरा किलोमीटर अंतरावर पोहोचली. पोलंडच्या सैन्याचे नेतृत्त्व जोसेफ पिलसोडस्की यांनी केले. त्यांनी सैन्याची जी व्यूहरचना केली, त्यामुळे संख्येने, शस्त्रास्त्राने रशियन सेना भारी असतानादेखील या वॉर्साच्या लढाईत रशियन सेनेची कत्तल झाली.
ही लढाई वेस्टुला नदीच्या काठी झाली. एका अंगाला दलदल होती आणि खाली पूर्ण सपाट मैदान होते. रशियन सैन्य संख्येने प्रचंड होते. त्यांचे घोडदलदेखील संख्येने खूप मोठे होते. त्यामानाने पोलंडची सेना संख्येने दुर्बळ होती. रशियन सेनेचे नियंत्रण करण्यासाठी रेडिओवरुन संदेश पाठविले जात, ते सांकेतिक भाषेत असत. ही सांकेतिक भाषा पोलिश (पोलंडच्या) युवकाने फोडली. त्यामुळे रशियन सेनेच्या सर्व हालचाली पोलिश सेनेला अगोदरच माहीत होत्या. एवढा मोठा हल्ला करताना सैनिक तुकड्यांचे विभाग करावे लागतात. कोणी कुठून चढाई करायची, याची योजना करावी लागते. पोलिश सेनाधिकार्‍यांनी ती अगोदरच समजल्यामुळे त्यांना रोखण्याची योजना ते करु शकले. रशियन सेनेला ते अपेक्षित नव्हते. एका दलाची मधली फळी तुटून पळापळ सुरु झाली. मागून पोलंडच्या घोडेस्वारांनी पळणार्‍या सैनिकांना ठोकून काढले.
या धामधुमीत सैन्याला संदेश देणारे दोन रेडिओ केंद्रे पोलिश सैन्याच्या ताब्यात आली. एक त्यांनी नष्ट करुन टाकले आणि दुसर्‍या केंद्रावरुन ‘बायबल’चे वाचन चालू ठेवले. देव न मानणार्‍या कम्युनिस्ट सैन्याला ‘बायबल’चे वाचन कशासाठी हे समजेना, पुढे काय करायचे याच्या आज्ञा येईनात, त्यामुळे ते गोंधळले आणि त्यांच्यातही नंतर पळापळ सुरु झाली. या सर्व लढाईत पोलिश सैन्य संख्येने कमी असतानादेखील आणि लढाईचा ताण खूप असतानादेखील अंगात हत्तीचे बळ आल्याप्रमाणे लढले. पोलिश लोक कॅथलिक आहेत. ते असे म्हणू लागले की, “कुमारी मेरी आकाशात येऊन सैन्याला लढण्याची शक्ती देत होती.” म्हणून या लढाईला ‘मिरॅकल ऑन विस्तुला’ असे म्हणतात. नंतर त्याची सुंदर पेटिंग करण्यात आलेली आहे.
 
 
‘मिरॅकल ऑन विस्तुला’ म्हणजे ‘कॅथलिक’ धर्मश्रद्धेने अधर्मीय ‘कम्युनिझम’चा केलेला पराभव होय. ‘कम्युनिझम’ विरोधी ‘कॅथोलिझम’ हा या लढाईचा एक भाग आहे. धर्मश्रद्धा अतिशय प्रबळ असतात. प्रेषित मोहम्मदांच्या अनेक लढायांमध्ये अल्लाने त्यांना मदत केली, असे इस्लामी इतिहासकार सांगतात. बदरची लढाई त्याचे एक उदाहरण आहे. असा दैवी चमत्कार पाश्चात्य देशातही घडल्याचे सांगण्यात येते. फ्रान्सची ‘जोन ऑफ आर्क’ अशाच चमत्काराचे उदाहरण आहे.
 
‘मिरॅकल ऑन विस्तुला’ ही लढाई कम्युनिझमच्या युरोपातील प्रचाराला पायबंद घालणारी लढाई ठरली. नंतर पोलंड आणि रशिया यांच्यात तह झाला आणि पोलंडच्या ताब्यात असलेली सर्व भूमी पोलंडकडेच ठेवण्याचे मान्य करण्यात आले. रशिया हा अपमान विसरला नाही. १९३९ साली त्याला संधी मिळाली. तेव्हा हिटलर आणि स्टॅलिन यांच्यात अनाक्रमणाचा करार झाला. या करारात पोलंडचे विभाजन करण्याचा विषयही होता. जर्मनीने पूर्वेकडून पोलंडवर आक्रमण केले आणि रशियाने पश्चिमेकडून केले. स्वतंत्र पोलंड पुन्हा एकदा जर्मनच्या ताब्यात आणि अर्धा रशियाच्या ताब्यात गेला, हा झाला पुढचा इतिहास. १९२० च्या ‘बॅटल ऑफ वॉर्सा’चे महत्त्व, ‘मिरॅकल ऑन विस्तुला’ने अधोरेखित झाले आहे. हा स्वतंत्र पोलंडच्या श्रद्धेचा विषय झालेला आहे.


 


 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@