'टीडीएस'चे दायित्व

    29-May-2026   
Total Views |
TDS Rules Investment Awareness
 
नव्या ‘प्राप्तिकर कायदा, २०२५’ची अंमलबजावणी दि. १ एप्रिल २०२६ रोजीपासून सुरू झाली. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्तिकर विभागाने सर्व करदात्यांसाठी महत्त्वाच्या बदलांचीही घोषणा केली. करप्रणाली अधिक आधुनिक आणि सोपी करण्यासाठी जुने विविध फॉर्म रद्द केले असून, अधिक सोपे, सुटसुटीत फॉर्म दाखल केले आहेत. त्याविषयी आजच्या लेखातून माहिती जाणून घेऊया...
 
उद्गम करकपात (टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स-टीडीएस) टाळण्यासाठी ‘फॉर्म १५ जी’ व वरिष्ठ नागरिकांना ‘१५ एच’ हे फॉर्म गेल्या वर्षापर्यंत भरावे लागत. हे फॉर्म आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून बंद होऊन, त्याऐवजी आता नवा ‘फॉर्म १२१’ सुरू झाला आहे.
‘फॉर्म १२१’ म्हणजे स्वयंघोषणापत्र आहे. याद्वारे व्यक्ती त्यांचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्याने त्यांच्या उत्पन्नावर ‘टीडीएस’ कापला जाऊ नये, अशी विनंती करतात. हा नियम ‘प्राप्तिकर कायदा, २०२५’च्या ‘कलम ३९३(६)’अंतर्गत लागू केला असून, बँक ठेवींवरील व्याज, पोस्टातील ठेवींवरील व्याज आणि इतर निर्दिष्ट उत्पन्नातून करकपात करू नये, यासाठी हा फॉर्म लागू केला आहे. भारतीय रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ)आणि शून्य करदायित्व असलेल्या काही पात्र संस्था हा ‘१२१’ फॉर्म भरून करपात्र उत्पन्न नसेल, तर करकपात टाळू शकतात. कंपनी आणि अनिवासी भारतीय हा फॉर्म भरू शकत नाहीत. ‘फॉर्म १२१’ भरण्यासाठी पॅनकार्ड, उत्पन्न आणि गुंतवणुकीची माहिती, बँक खात्याचा तपशील, वयाचा पुरावा, करवर्ष, अंदाजित एकूण उत्पन्न यांसारखी काही विशिष्ट कागदपत्रेही जमा करावी लागतात. ‘फॉर्म १२१’ सादर केल्यानंतर बँक किंवा संबधित संस्था माहितीची पडताळणी करते. त्यानंतर ही माहिती प्राप्तिकर विभागाला पाठवली जाते. ज्यामुळे नोंदीचा अचूक मागोवा घेतला जाईल आणि ‘टीडीएस’ टाळता येईल.
 
‘फॉर्म १२१’ची वैशिष्ट्ये
आर्थिक करवर्षासाठी एकूण उत्पन्नावर अंदाजे करदायित्व शून्य असले पाहिजे.
 
नवी करप्रणाली : रुपये १२ लाख उत्पन्नावर देय कर शून्य आहे. (कलम १५६ नुसार, अंतर्गत रुपये ६० हजार, वजावटी सकट) तर पगारदार व्यक्तींसाठी रुपये १२.७५ लाखांपर्यंत (रुपये ७६ हजार प्रमाणित वजावटीनंतर)
 
जुनी करप्रणाली : मूलभूत सवलत मर्यादा रु. २.५० लाख (६० वर्षांखालील व्यक्तींसाठी) रुपये तीन लाख (ज्येष्ठ व्यक्तींसाठी) व पाच लाख (अति ज्येष्ठ व्यक्तींसाठी) शिवाय, ‘कलम ८० सी’, ‘८० डी’ आदी कलमांनुसार गुंतवणूक करून कर शून्य करू शकतात. पगारदार व्यक्तींना ‘फॉर्म १२१’ भरावा लागत नाही. पगार हा उद्गम करकपात ‘फॉर्म १३०’ (जुना ‘फॉर्म १६’) द्वारे व्यवस्थापित केला जातो. वयानुसार वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज नाही. या फॉर्मद्वारे करदाते त्यांचे एकूण अंदाजित वार्षिक उत्पन्न करसवलतीच्या मर्यादेपेक्षा कमी असल्याचे घोषित करू शकतात. परिणामी, ‘टीडीएस’ टाळू शकतात.
 
लाभांश, ‘पीएफ’ काढणे, निवृत्तिवेतन, भाडे, म्युच्युअल फंड उत्पन्न आणि विमा कमिशन यांसारख्या देयकांसाठी हा फॉर्म वापरला जाऊ शकतो. एकदा सादर केल्यावर हा फॉर्म संपूणर्र् २०२६-२७ या वर्षासाठी वैध असतो.
 
युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयएन) ट्रॅकिंग सिस्टम : प्रत्येक ‘फॉर्म १२१’ सादरीकरणाला २६ अक्षरी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. ही मोठी सुधारणा आहे. ‘१५ जी’/‘१५ एच’ भरण्यासाठी कोणतीही प्रमाणित ट्रॅकिंग सुविधा नव्हती.
 
‘फॉर्म १२१’ पुढील बाबतीत लागू नाही : अनिवासी भारतीय, कंपनी किंवा फर्म, ज्येष्ठ नागरिक नसलेले, ज्यांचे उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त. ‘प्राप्तिकर कायदा नियम क्रमांक ३९३(६)’अंतर्गत नसलेले इतर उत्पन्न, प्राप्तिकर दायित्व शून्य नसेल तर.
फॉर्म १२१ भरण्यापूर्वी : (अ) पात्रता पडताळणी करा. करदेयता शून्य आहे, हे तपासा. (ब) फॉर्म डाऊनलोड करा किंवा बँकेच्या ऑनलाईन सबमिशन सुविधेचा वापर करा. (क) सर्व तपशील भरा. (ड) प्रत्येक देयक स्वंतत्रपणे सादर करा. (इ) २६ अक्षरी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयएन)ची नोंद ठेवा. (ई) एआयएस/फॉर्म १६८ मध्ये पडताळणी करा. तुमचे उत्पन्न शून्य ‘टीडीएस’सह दिसत आहे की नाही, हे तपासा. ‘फॉर्म १२१’ असूनसुद्धा ‘टीडीएस’ कापला गेल्यास करविभागाशी संपर्क साधा.
 
‘फ्युचर ऑप्शन’ म्हणजे काय?
 
सध्या तरुण गुंतवणूकदारांमध्ये ‘ऑप्शन ट्रेडिंग’ची मोठी क्रेझ पाहायला मिळते. वायदे बाजार (फ्युचर्स अ‍ॅण्ड ऑप्शन्स) म्हणजे एका ठरावीक तारखेला आणि ठरावीक भावाला शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा करार. हा प्रकार मूलतः मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली जोखीम कमी करण्यासाठी ‘हेजिंग’ म्हणून तयार केला. आता याचा वापर सट्टेबाजीसाठी होत आहे. यात कमी भांडवलात मोठी जोखीम घेता येते. त्यामुळे फायदा झाला, तर मोठा हेातो; पण तोटा झाला, तर संपूर्ण भांडवल काही मिनिटांत शून्य होऊ शकते. ‘सेबी’चा अधिकृत अहवाल सांगतो की, वायदे बाजारात व्यवहार करणार्‍या ९० टक्क्यांहून अधिक छोट्या गुंतवणूकदारांना तोटा होतो. धक्कादायक बाब म्हणजे, जे दहा टक्केजण नफा मिळवतात, त्यातील बहुतेकांना ‘निफ्टी’ निर्देशांकाने दिलेल्या परताव्यापेक्षाही कमी नफा मिळतो. म्हणजेच, प्रचंड जोखीम घेऊनही नफा साध्या गुंतवणुकीपेक्षा कमी मिळतो. याकडे गुंतवणूकदार झटपट श्रीमंत होण्याच्या ओढीपायी आकर्षक होतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘फ्युचर्स अ‍ॅण्ड ऑप्शन्स ट्रेडिंग’च्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ही सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारने ‘सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स’ वाढविला. कारण, यात विनाकारण होणारे व्यवहार कमी व्हावेत.
 
शेअर बाजार ही जुगार खेळण्याची जागा नसून, संपत्तीनिर्मितीचे साधन आहे, ही बाब गुंतवणूकदारांनी निश्चित लक्षात ठेवावी आणि शाश्वत नफ्यासाठी गुंतवणूक करावी. वायदे बाजारात नफा मिळविणे, हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी कठीण आहे. सट्टेबाजीच्या नादात कष्टाचा पैसा गमावण्यापेक्षा, संयमाने गुंतवणूक करून संपत्ती वाढविणे, हाच योग्य मार्ग आहे.




शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.