नाशिक शहर हे शिक्षण, उद्योग, धर्म आणि संस्कृतीसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. मात्र, अलीकडच्या काळात वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिकची प्रतिमा डागाळू लागली आहे. एकेकाळी शांत आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नाशकात आता गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढल्याचे चित्र दिसते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. शहर पोलिसांनी राबविलेल्या ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला ऑपरेशन’मुळे काहीकाळ इथली गुन्हेगारी शांत झाली. पण, गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये घडलेल्या अनेक गंभीर घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाने मोठी खळबळ उडाली. अंधश्रद्धा, लैंगिक व आर्थिक फसवणूक आणि लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. या घटनेमुळे समाजात अजूनही भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचे, इतरही भोंदूबाबा गजाआड झाल्यानंतर समोर आले.
त्याचबरोबर ‘टीसीएस’ प्रकरणामुळे उच्चशिक्षित आणि ‘आयटी’ क्षेत्रातही ‘कॉर्पोरेट जिहाद’सारखी निंदनीय बाब समोर आली. याचबरोबर देशभर गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याने शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेलाही काळिमा फासला गेला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या घटनांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील गुन्हेगारांचा वाढता आत्मविश्वास अजूनही दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनांतून दिसून येतो. कालपरवा दिवसाढवळ्या सराफ दुकानात झालेल्या लुटीमुळे व्यापारीवर्ग हादरला. नागरिकांच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या अशा घटना पोलीस व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. त्यातच अधूनमधून ‘एमडी ड्रग्ज’च्या तस्करीच्याही घटना समोर येत असल्याने हे रॅकेट पूर्णपणे नष्ट झालेले नाही. अलीकडेच ‘कोयता गँग’ने केलेल्या हल्ल्याने तर नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण केले. शांत आणि सुरक्षित नाशिकची ओळख टिकवण्यासाठी एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे.
सिंहस्थ निधीवर डल्ला
आगामी काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार असून, या मेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकासकामे, सुविधा आणि विविध कंत्राटांची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या महत्त्वाच्या आणि संवेदनशील कामांमध्येही गैरप्रकार घडत असल्याचे समोर आल्याने प्रशासनासह नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सिंहस्थासाठी बनावट स्वाक्षरी करून कामे मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपींनी शासकीय कागदपत्रांवर बनावट स्वाक्षऱ्या करून कंत्राट प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. काही महत्त्वाच्या विकासकामांची निविदा मिळवण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्रशासनाच्या तपासादरम्यान या प्रकाराचा उलगडा झाला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि सरकारी प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले. या धार्मिक सोहळ्याच्या तयारीत अशा प्रकारचे गैरप्रकार उघडकीस येणे ही अत्यंत गंभीर बाब. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याने, काहीजण गैरमार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून स्पष्ट होते. अशा घटनांमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, प्रामाणिक कंत्राटदारांनाही अन्याय सहन करावा लागत आहे. परिणामी, निविदा प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणि पारदर्शकता आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. शासकीय कामांमध्ये तांत्रिक तपासणी, दस्तऐवज पडताळणी आणि डिजिटल सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालणे म्हणूनच आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळा आयोजनावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीची सावली पडू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.