काही ज्येष्ठ माणसांचे अस्तित्व आदर्शवत वाटते. मात्र ही ज्येष्ठ जर वयाच्या शंभरीतही कार्यरत असतील, तर ती प्रेरणादायी ठरतात. वयाच्या शतायुषी पूर्ण करत असताना ‘वाईल्ड लंडन’ या माहितीपटाचे चित्रीकरण करत वन्यजीव प्रबोधनाचा दिवा तेवत ठेवणारे नाव म्हणजे सर डेव्हिड अॅटनबरो. त्यांच्याविषयीचा हा लेख...
जगासमोर वन्यजीव माहितीपटांचे अवकाश खुले करून देणारा एकमेव माणूस म्हणजे सर डेव्हिड अॅटनबरो. आज शतायुष साजरे करणारा हा माणूस खर्या अर्थाने माहितीपटनिर्मिती क्षेत्रातील क्रांतिकारक ठरला. त्यांचा संथ, स्पष्ट आणि हलका आवाज हा वन्यजीवांचा आवाज झाला आणि त्याची भुरळ जगभरातील सामान्य लोकांना पडली. ज्यावेळी वन्यजीव माहितीपट हे तज्ज्ञाच्या जाळ्यात अडकले होते; त्यावेळी त्यांना या जाळ्यातून बाहेर काढून त्यात जिवंतपणा ओतण्याचे काम अॅटनबरो यांनी केले. असे माहितीपट त्यांनी केवळ जगभरातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले नाही, तर ते लोकप्रिय केले. अॅटनबरो यांची पायधुळी अनेकांनी आपल्या मस्तकी लावली. मात्र, त्यांच्या प्रतिभेची झुळूक अजूनही कोणाला स्पर्शून गेलेली नाही.
डेव्हिड अॅटनबरो यांच्या घरातच प्रतिभेचा वारसा होता. कारण, त्यांचे मोठे बंधू रिचर्ड अॅटनबरो यांनी ‘गांधी’ चित्रपट निर्माण करून इतिहास घडवला, तर डेव्हिड यांनी वन्यजीव माहितीपट क्षेत्रात आपले महंत स्थान निर्माण केले. अॅटनबरो यांनी वन्यजीव माहितीपटांचा आयाम काळानुसार बदलला. प्रसंगी जुनाट गोष्टींमध्ये न अडकता बदलते तंत्रज्ञान, आधुनिकीकरण, वन्यजीवांचे बदलते स्वभाववैशिष्ट्य यांना स्वीकारून त्यांनी माहितीपटांची निर्मिती केली. पूर्वी वन्यजीवांचे चित्रीकरण प्रामुख्याने प्राणीसंग्रहालयात किंवा बंदिस्त वातावरणात नियंत्रित पद्धतीत केले जात असे. अशा काळात अॅटनबरो यांनी माहितीपटात जिवंतपणा यावा, म्हणून चित्रीकरणाची सुरुवात नैसर्गिक वातावरणामध्ये करण्यास सुरुवात केली. यामुळे माहितीपटात सच्चेपणा आला. मात्र, काळ बदल्यानंतर अपरिहार्य परिस्थितीत ज्यावेळी बंदिस्त वातावरणात तांत्रिक गोष्टींचा वापर करून नियंत्रित पद्धतीत छायाचित्रण करणे शय झाले, तेव्हादेखील त्यांनी हा बदल स्वीकारला. त्यांचे माहितीपट हे ८० ते ९० टक्के नैसर्गिक ठिकाणी चित्रित केलेले असतात. मात्र, उर्वरित दहा ते २० टक्के भाग, जो अत्यंत सूक्ष्म किंवा लिष्ट असतो, तो स्टुडिओ अथवा प्रयोगशाळेत चित्रित केला जातो. उदा. दस्तुरखुद्द अॅटनबरो आणि बीबीसीचे कार्यकारी निर्माता जेम्स हनीबॉर्न यांनी ‘ब्लू प्लॅनेट २’ या मालिकेमध्ये स्टुडिओ शॉट्सचा वापर केल्याचे मान्य आहे. काही प्राण्यांचे वर्तन केवळ याच पद्धतीने टिपता येते, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. याविषयी हनीबॉर्न सांगतात की, जर तुम्ही एखाद्या सूक्ष्म गोष्टीचे चित्रीकरण करत असाल, तर तुम्हाला त्यावर यांत्रिक प्रकाशझोतांचा वापर करून अतिरिक्त प्रकाश टाकावा लागतो आणि हा भौतिकशास्त्राचे साधा नियम आहे. ‘ब्लू प्लॅनेट २’च्या निर्मितीवेळी आम्ही शास्त्रज्ञांसोबत मिळून काही नैसर्गिक परिस्थितींची पुनर्निर्मिती केली होती. उदाहरणार्थ, फँगटूथ फिशचे चित्रीकरण जहाजावरील एका विशेष कक्षात करण्यात आले, जेणेकरून तो मासा इतरत्र कुठेही पळून जाणार नाही आणि आम्हाला त्याचे हवे तसे छायाचित्रण करता येईल, याविषयी अॅटनबरो म्हणतात की, "असे करून आम्ही नैसर्गिक घटनांमध्ये फेरफार करत आहोत, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. कारण, आम्ही जे काही करतो, त्यामुळे नैसर्गिक जग अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते आणि त्याचा अधिक आदर केला जातो.”
अॅटनबरो यांच्या माहितीपटांतील स्थायीभाव म्हणजे निवेदनाच्या शैलीद्वारे निर्माण केलेली रंजकता. त्यांच्या माहितीपटाला केवळ विज्ञानाचे वलय नसून त्याला एक रंजक कथेचे कोंदण असते. प्राण्यांच्या भावना, त्यांचा जगण्याचा संघर्ष, त्यांचे जीवन आणि त्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग उलगडण्यासाठी अॅटनबरो यांनी एक विशिष्ट निवेदनशैली विकसित केली. आजच्या तेजीच्या जगात ही शैली काहींना संथ वाटेल. मात्र, वन्यजीवांच्या उत्कंठ भावना मांडण्यासाठी ही शैली चपखल बसली. त्यांच्या माहितीपटांचा आजवरचा ओघ हा दुर्लक्षित आणि संकटग्रस्त वन्यजीव प्रजाती असाच राहिला आहे. साधारण ४० वर्षांपूर्वी अॅटनबरो ज्यावेळी मध्य आफ्रिकेत गेले, त्यावेळी त्यांना तेथे केवळ २५०च्या संख्येत उरलेल्या माऊंटन गोरिलाची विदारक स्थिती लक्षात आली. त्यांनी ती छायाचित्रित करून जगासमोर मांडली. त्यानंतर या गोरिलाच्या संवर्धनासाठी अनेकजण पुढे आले, अनेकांनी आर्थिक देणग्या दिल्या. आता त्यांची संख्या एक हजारापेक्षा अधिक झाली आहे. यावरून एक माहितीपट किती मोठा बदल घडू शकतो, हे लक्षात येते.
‘लाईफ ऑन अर्थ’ (१९७९) ही अॅटनबरो यांची पहिली सर्वांत मोठी आणि क्रांतिकारी मालिका होती. यात पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा इतिहास दाखवला गेला. यातील डेव्हिड आणि ‘रुवांडा’मधील गोरिलांचा एकत्र असलेला प्रसंग जगभरात प्रचंड गाजला. त्यामुळेच आजही आपल्याला माकडे आवडत असल्याचे अॅटनबरो सांगतात. त्यानंतर ‘द लिव्हिंग प्लॅनेट’, ‘द ट्रायल्स ऑफ लाईफ’, ‘द प्रायव्हेट लाईफ ऑफ प्लांट्स’ अशा त्यांच्या अनेक मालिका पुढे प्रसिद्ध झाल्या. मात्र, २००१ साली आलेल्या ‘द ब्लू प्लॅनेट’ या माहितीपटाने महासागरांच्या गूढ आणि अथांग दुनियेचे दर्शन घडवले. समुद्रातील अशा अनेक प्रजाती आणि त्यांच्या सवयी पहिल्यांदाच कॅमेर्यात कैद करण्यात आल्या, ज्या विज्ञानालाही माहीत नव्हत्या. ‘प्लॅनेट अर्थ’ (२००६) हा बीबीसीद्वारे निर्माण केलेला आणि हाय-डेफिनिशन (एचडी)मध्ये चित्रित झालेला पहिला निसर्ग माहितीपट होता. जगातील सर्वांत महागडा आणि भव्य माहितीपट म्हणून याची नोंद झाली. यात पृथ्वीवरील वाळवंट, जंगले, पर्वत आणि ध्रुवीय प्रदेशांचे अत्यंत विहंगम दृश्य दाखवले गेले. ‘प्लॅनेट अर्थ २’ (२०१६) मध्ये प्राण्यांच्या अतिशय जवळून घेतलेल्या ‘लोझ-अप’ शॉट्सनी प्रेक्षकांना थक्क केले. यातील ‘गालापागोस’ बेटावरील साप आणि लहान सरड्यांचा (खर्सीरपर) पाठलागाचा प्रसंग जगभरात प्रसिद्ध झाला होता. ‘अवर प्लॅनेट’मध्ये (२०१९) मध्ये केवळ निसर्गाचे सौंदर्य न दाखवता, मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांचे अधिवास कसे नष्ट होत आहेत, हे दाखवून हवामानबदलावर त्यांनी थेट भाष्य केले गेले. ‘अ लाईफ ऑन अवर प्लॅनेट’ (२०२०)मध्ये त्यांनी आपल्या ९० वर्षांच्या आयुष्यात निसर्गाचा झालेला र्हास स्वतःच्या डोळ्यांनी कसा पाहिला, हे अत्यंत भावनिक रितीने मांडले.
शतायुषी जीवन लाभणे, हे जेवढे आनंददायी असते, तेवढेच ते काही वेळा लेशदायी ठरते. कारण मोठं वय लाभणे म्हणजे, स्नेहजणांच्या थडग्याला ठेचून ठेचून रक्तबंबाळ होणे, असे म्हणतात. आपल्या शतायुषात अॅटनबरो यांनी आपल्या प्रिय पत्नी जेन एलिझाबेथ यांना गमावले आहे. आपल्या आयुष्यातील हेच सर्वांत मोठे दुःख असल्याचे ते सांगतात. वन्यजीव माहितीपट क्षेत्रातील अनेकांसाठी आज अॅटनबरो हे पितामह आहेत. त्यांचा प्रत्येक माहितीपट हा विद्यापीठ आहे. या विद्यापीठातून एकलव्यासारखे शिकणारे अनेकजण आहेत. आता ते केवळ वाट पाहात अॅटनबरो यांच्या प्रतिभेची एक झुळूक मिळण्याची...
त्यांनीच रोवली बीजं
लहानपणी जंगल म्हणजे फक्त झाडं, प्राणी आणि पक्षी इतकंच वाटायचं. पण सर डेव्हिड अॅटनबरो यांनी जगाकडे बघायची माझी नजरच बदलून टाकली. त्यांच्या कथनातून मला कळलं की, निसर्ग हा फक्त पाहण्याचा विषय नाही, तो समजून घेण्याचा, जपण्याचा आणि त्याच्याशी नातं जोडण्याचा प्रवास आहे. वन्यजीवप्रेमी म्हणून माझ्या मनातली पहिली खरी उत्सुकता, पहिला थरार, पहिल्यांदा एखाद्या छोट्याशा जीवामध्ये विश्व पाहण्याची दृष्टी यामागे कुठेतरी सर अॅटनबरो आहेत. कदाचित म्हणूनच आज तरपर इहरीहळ म्हणून माझा प्रवास फक्त वन्यजीव पाहण्याचा नाही, तर निसर्गाच्या प्रत्येक आवाजाला समजून घेण्याचा आहे. त्यांनी आम्हाला शिकवलं की कथा सांगणं हे फक्त मनोरंजन नाही, ते संवर्धनाचं सर्वांत प्रभावी शस्त्र आहे. आज आपण निसर्गासाठी आवाज उठवतो, मुलांना जंगलाशी जोडण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक जीवामागची कथा लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याच्या प्रेरणेची बीजं त्यांनीच पेरली आहेत.
- विक्रम व्यवहारे, वन्यजीव चित्रपटकार
निवेदनातील प्रामाणिकपणा
सर डेव्हिड अॅटनबरो यांच्या निवेदनात नेहमीच एक प्रामाणिकपणा जाणवतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण फक्त माहिती घेत नाही, तर त्या जगाशी जोडले जातो. त्यांच्या कार्यक्रमांमुळे वन्यजीव आणि पर्यावरण हे विषय माझ्यासाठी केवळ पाहण्याची गोष्ट न राहता, समजून घेण्याची आणि जपण्याची गोष्ट बनली. काळानुसार तंत्रज्ञान बदललं, चित्रणाच्या पद्धती बदलल्या; पण त्यांच्या कामातील कुतूहल आणि निसर्गाविषयीचा आदर कायम राहिला. त्यांच्या चित्रपटांकडून मला नेहमी हे शिकायला मिळालं की, वन्यजीव चित्रण म्हणजे फक्त सुंदर दृश्ये दाखवणे नाही, तर लोकांना निसर्ग अधिक जवळून समजावून सांगणे आहे. माझ्यासाठी ते निसर्गाविषयीची जिज्ञासा, प्रेम आणि जबाबदारी यांचं प्रतीक आहेत.
- अथर्व राऊत, वन्यजीव चित्रपटकार
९७६८६८४०३१