विविधता प्रत्यक्षात एकतेचे सौंदर्य आणि उत्सव आहे, विभाजनाचे कारण नाही; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

07 Mar 2026 16:31:52
RSS Chief Mohan Bhagwat
 
मुंबई : (RSS Chief Mohan Bhagwat) सत्य इतके व्यापक आहे की सत्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. विविधता प्रत्यक्षात एकतेचे सौंदर्य आणि उत्सव आहे, विभाजनाचे कारण नाही", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. स्वर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैसलमेर येथे दादा गुरुदेव आचार्य जिनदत्त सुरी यांच्या ८७१व्या चादर महोत्सवानिमित्त सामाजिक समरसतेचे अनोखे दर्शन घडले. या पावन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जैन आणि सनातन परंपरेतील संतांसह समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा मोठा संगम झाला. या कार्यक्रमात सरसंघचालकांची विशेष उपस्थिती होती.
 
हा कार्यक्रम पूर्णपणे समरसता आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेवर आधारित होता. गच्छाधिपती जिनमणिप्रभसागर महाराज यांच्या नेतृत्वाखाली धर्म, तीर्थ आणि संस्कृतीच्या रक्षणाचा संकल्प यावेळी पुन्हा व्यक्त करण्यात आला.
 
याप्रसंगी आपल्या उद्बोधनात सरसंघचालकांनी भारतीय संस्कृतीची चिरंतनता, विविधतेतील एकता आणि सामाजिक समरसतेवर प्रकाश टाकला. त्यांनी दादा गुरुदेव आचार्य जिनदत्त सूरी यांच्या ८७१ वर्षे जुन्या चादरीला भारताच्या सनातन संस्कृतीच्या जिवंतपणाचे प्रतीक असल्याचे सांगितले. ही चादर त्या सत्याचे प्रतीक आहे ज्याला ना अग्नी जाळू शकतो, ना शस्त्र कापू शकते आणि ना पाणी भिजवू शकते. आपल्या पूर्वजांनी ओळखलेल्या त्या शाश्वत सत्याचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी जैन तत्त्वज्ञानातील अनेकांतवाद या सिद्धांताचेही कौतुक केले.
 
हेही वाचा : पीककर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कुठल्याही बँकेने दिलेले कर्ज माफ होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
आपल्या भाषणात त्यांनी रेल्वे प्रवासातील एका भावनिक प्रसंगाचा उल्लेख करत सांगितले की समाजात भांडणे आणि संघर्ष यांचे कारण म्हणजे लोक एकमेकांना ओळखत नाहीत आणि आपला एकात्मभाव विसरतात. जेव्हा मनुष्याला हे समजते की आपण सर्वजण एका चेतनेचे अंश आहोत, तेव्हा स्वार्थ आणि भेदभाव आपोआप नाहीसे होतात. केवळ आंतरराष्ट्रीय संस्था जसे की लीग ऑफ नेशन्स आणि युनायटेड नेशन्स युद्ध थांबवू शकत नाहीत. यासाठी मानवाच्या अंतःकरणात करुणा आणि एकात्मतेची भावना असणे आवश्यक आहे.
 
सरसंघचालकांनी समाजाला केवळ उपदेशांपुरते मर्यादित न राहता आचरणात बदल घडवण्याचे आवाहन केले. आपल्या मित्रपरिवारात विविध जाती, पंथ, भाषा आणि प्रदेशांतील लोकांना सामावून घ्या. जेव्हा आपण सुख-दुःख, अन्न आणि सामाजिक जीवन एकत्र वाटून घेऊ, तेव्हाच खरी सामाजिक शक्ती प्रकट होईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
सरसंघचालकांनी सर्वांना आवाहन केले की जर आपण परस्परांतील भेदभाव आणि स्वार्थ सोडून देशासाठी समर्पित झालो, तर भारत केवळ परम वैभवशाली राष्ट्रच होणार नाही तर विश्वगुरू म्हणून संपूर्ण मानवजातीला शांतता आणि समृद्धीचा मार्गही दाखवेल. याप्रसंगी संघ आणि समाजातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान चादर महोत्सवाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट, स्मारक नाणी आणि दादा गुरुदेवांवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महोत्सव समितीचे अध्यक्ष राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, संयोजक तेजराज गुलेछा तसेच पद्मभूषण डी. आर. मेहता यांच्यासह अनेक समाजसेवकांनी या आयोजनाच्या यशस्वीतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 
आपल्या प्रभावी भाषणात गच्छाधिपती जिनमणिप्रभसागर महाराज म्हणाले की, समरसताच राष्ट्राची खरी ताकद आहे. भारताचा ध्वज संपूर्ण जगात सन्मानाने फडकण्यासाठी सर्व संप्रदायांतील संतांनी एकता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्यांनी महावीर आणि श्रीराम यांच्या जीवनाचे उदाहरण देत सांगितले की भारतीय संस्कृतीत जातिवाद आणि अस्पृश्यतेला स्थान नाही. तसेच युवकांना योग्य दिशा देत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0