नागपूर : (Devendra Fadnavis) कुठलीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कुठल्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कर्जमाफीची घोषणा केली असून त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतो राष्ट्रीयकृत बँकेची कर्जमाफी होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेची होणार नाही. पण कुठलीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कुठल्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत. पण माफी बँकेला न देता शेतकऱ्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा व्हावा यासाठी आम्ही काम करत आहोत. ३० जूनपूर्वी कर्जमाफी करणार असून पुढच्या कारवाईसाठी यावर समिती काम करत आहे. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल."
"कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे. विदर्भासाठीही यात अनेक गोष्टी आहेत. परंतू, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार असून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. यामुळे विदर्भाचे चित्र पुर्णपणे बदलेल," असेही ते म्हणाले.
नागरिकांच्या मनात भीती निर्माण करू नये
गॅसच्या तुटडवड्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “माध्यमांनी नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण तयार करू नये. केंद्र सरकार सगळी परिस्थिती हाताळत असून विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून नागरिकांच्या मनात भीती आणि संभ्रम तयार करणे देशाच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. केंद्र सरकारनेसुद्धा हेच स्पष्टपणे सांगितले आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.
“जगातील अत्याधुनिक प्लग अँड प्ले सुविधेचे भुमिपुजन झालेले आहे. प्रगत उत्पादनाच्या क्षेत्रात या सुविधेची मोठी भुमिका असेल. एक्सएसआयओ ने नागपूरमध्ये नेक्स्ट जेन लॉजिस्टिक पार्क आणि औद्योगिक पार्क तयार केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताच्या भुमिकेत भर पडेल,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....