महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे… आणि या हाय-प्रोफाइल तपासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या म्हणजे आयपीएस तेजस्वी सातपुते. पण एवढी मोठी आणि संवेदनशील केस त्यांना देण्यामागचं नेमकं कारण काय? आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलायं? याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. (Tejaswi Satpute)
हेही वाचा: Ashok Kharat case: ‘खरात फाईल्स’ उघड! ९ लाखांचं ‘मध’, नकली नाग…, नेते-उद्योजकांना...
तर, तेजस्वी सातपुते या महाराष्ट्र कॅडरच्या २०१२ बॅचच्या आयपीएस अधिकारी. कडक शिस्त, प्रामाणिकपणा आणि निकाल देणारी कामगिरी ही त्यांची ओळख. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई शिक्षिका आणि वडील शेतकरी या पार्श्वभूमीतून त्यांनी मोठं यश मिळवलं. लहानपणी त्यांना पायलट बनायचं होतं. मात्र परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. एलएलबी करत असताना त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं, पण २०११ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या आणि आयपीएस बनल्या. पोलीस सेवेत त्यांनी अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली. पुण्यात डीसीपी असताना ‘हेल्मेट अभियान’ यशस्वी करून हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत नेली. सोलापूर ग्रामीणमध्ये एसपी म्हणून त्यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबवत अवैध दारू आणि गांजाच्या शेतीवर मोठी कारवाई केली. या मोहिमेद्वारे तब्बल ६५० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना फिक्की पुरस्काराने गौरविण्यात देखील आलं. (Tejaswi Satpute)
याशिवाय सातारा आणि अहमदनगर येथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या धाडसी आणि निष्पक्ष कामामुळे त्यांची ओळख एक ‘रिझल्ट-ओरिएंटेड’ म्हणजेच काय तर, परिणामकारक अधिकारी म्हणून निर्माण झाली. आणि म्हणूनच अशोक खरातसारख्या संवेदनशील प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राज्य सरकारने त्यांच्यावर सोपवली आहे. आता अशोक खरात प्रकरणात एसआयटी प्रमुख म्हणून त्या सखोल तपास करत आहेत. संपूर्ण राज्यचं लक्ष त्यांच्या तपासाकडे लागलं असून. या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. (Tejaswi Satpute)