मुंबई : (C. P. Radhakrishnan) जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी केले.
लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये संपन्न झालेल्या ६४ व्या जैन दीक्षा समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, "जैन समाज देशभरात विविध माध्यमांतून समाजहिताचे कार्य करीत असून सेवा हीच जैन धर्माची ओळख आहे. ६४ जणांनी दीक्षा स्वीकारणे ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून, त्यातून संयम, साधेपणा आणि आध्यात्मिकतेचा संदेश समाजाला मिळतो. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवादाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. संवाद, सहिष्णुता आणि सर्व जीवसृष्टीबद्दल करुणा या मूल्यांमधूनच शांतता आणि शाश्वततेचा मार्ग सापडू शकतो."
हेही वाचा : बाह्य आक्रमणानी उध्वस्त झालेल्या समाजाला संघटित करण्याचे काम संघ स्थापनेनंतर झाले : गिरीश प्रभुणे
जैन आचार्यांनी भारतीय संस्कृतीला समृद्ध केले - राज्यपाल जिष्णू देव वर्मा
"सध्याच्या जागतिक परिस्थितीत जैन धर्मातील मूल्ये मानवजातीला शांतता, समन्वय आणि संयमाचा मार्ग दाखवणारी आहेत. आधुनिक जीवनशैली अनेकदा ग्राहकतावाद आणि इच्छांच्या अखंड पाठपुराव्याला प्रोत्साहन देत असली, तरी भारतीय संस्कृतीने नेहमीच साधेपणा, संयम आणि आत्मत्याग यांना महत्त्व दिले. आजच्या भौतिकतावादी युगात विविध क्षेत्रांतील व्यक्ती दीक्षेचा मार्ग स्वीकारत आहेत, ही बाब विशेष प्रेरणादायी आहे. भगवान महावीरांच्या अध्यात्मिक पावलांवर चालत विविध जैन आचार्यांनी भारतीय संस्कृतीला चिरंतन मूल्यांनी समृद्ध केले."
जैन समाजाने देशासमोर आदर्श निर्माण केला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा. जैन समाजाने ज्ञान संवर्धनाबरोबरच प्राचीन वारशाच्या जतनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी होत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सुमारे ७ कोटी प्राचीन हस्तलिखितांचे जतन आणि संवर्धन तसेच प्राचीन जैन मंदिरांच्या संरक्षणाचे कार्य संस्थेकडून करण्यात आले. अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित नसून विचारांमध्येही हिंसा नसावी, हा संदेश जैन तत्त्वज्ञान देते. जैन समाजाने आपल्या कार्यातून देशासमोर एक आदर्श निर्माण केला असून, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठे योगदान देतानाच दान-पुण्याच्या क्षेत्रातही जैन समाज अग्रस्थानी आहे."