मुंबई : (Girish Prabhune) संघाची स्थापना समजून घेताना त्याआधी ५०० ते ७०० वर्ष काय झाले हे समजून घेतले पाहिजे. या कालखंडात बाह्य आक्रमणाने समाज उध्वस्त झाला आणि त्याच उध्वस्त समाजाला संघटित करण्याचे काम संघ स्थापनेनंतर झाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
भारतीय विचार साधना (भाविसा), पुणे प्रकाशित तसेच दिलीप क्षीरसागर, अरूण करमरकर आणि दिलीप करंबेळकर लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २१ मार्च रोजी भाविसाच्या माधव पुरुषोत्तम तथा नाना थिटे सभागृहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, पुस्तकाचे लेखक दिलीप क्षीरसागर, अरुण करमरकर व दिलीप करंबेळकर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले, संघ स्थापनेच्यावेळी संघामध्ये केवळ हिंदूंना प्रवेश आहे असा गैरसमज होता, परंतु संघाचे समाजाच्या सर्व स्तरातील काम वाढल्यानंतर हा गैरसमज दूर होण्यास मदत झाली. संघ येण्याआधी वैचारिक गोंधळ होता. अनेक गट स्वतःला स्वतंत्र पंथ किंवा धर्म समजू लागले होते, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर कोरड्या भूमीवर वृष्टी व्हावी त्याप्रमाणे समाजामध्ये संघटित विचारांचा ओलावा सर्वत्र पसरला. समाज संघटित होऊ लागला आणि राम मंदिराची उभारणी हे या एकत्रित भावनेचे मोठे उदाहरण आहे."
हेही वाचा : मथुरेतील प्रसिद्ध गोरक्षक फरसा वाले बाबा यांची हत्या!
सुनील आंबेकर याप्रसंगी म्हणाले की, संघशताब्दीच्या निमित्ताने संघाचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. हेडगेवार यांनी जेव्हा संघाची स्थापना केली तेव्हा हिंदू समाज निद्रिस्त होता, पण संघ स्थापनेच्या वेळी डॉक्टरांनी हिंदू धर्म आणि हिंदू विचार यांचा उद्घोष केला. याच काळात उच्च कोटीच्या राष्ट्रीय विचारांचे लोक देखील इतर विचारधारांचे विचार आपलेसे करत होते. अशा प्रतिकूल काळात डॉ. हेडगेवार यांनी संघाचे काम सुरू केले आणि हे हिंदू राष्ट्र आहे हा विचार संघ स्थापनेनंतर रुजवण्यास सुरुवात केली. संघाने याच विचाराचा पुढे सातत्याने स्वीकार केला आणि त्यावर काम सुरू ठेवले. संघशताब्दीच्या निमित्ताने केवळ इतिहासाचा विचार न करता भविष्याचे वेध घेणे हेही महत्त्वाचे असल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी सुनील आंबेकर यांनी डॉक्टरांच्या आयुष्यातील काही प्रसंग मांडले आणि त्या प्रसंगातून डॉ. हेडगेवार यांची विकसित होणारी विचारधारा स्पष्ट केली. ते म्हणाले, की डॉक्टरांनी 'स्व'चा विचार केला आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमधून दिसते. समाज संघटित व्हावा या दृष्टीने डॉक्टर हेडगेवारने संघाची स्थापना केली. धर्माला अडसर मानणाऱ्या विविध विचारधारांच्या प्रवाहामध्ये डॉक्टरांनी जीवनातील प्रत्येक गोष्ट धर्माधारित असली पाहिजे, असा विचार मांडला आणि त्याचबरोबर चारित्र्यवान सुसंघटित समाज ज्याचा पाया धर्म आहे. असा समाज बलशाली राष्ट्र घडवू शकतो,असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाविसाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारतीय विचार साधनेचे कार्यवाहक काशीनाथ देवधर यांनी केले.