मुंबई : (Farsa Wale Baba) मथुरा येथील ब्रज परिसरातील प्रसिद्ध गोरक्षक संत चंद्रशेखर उर्फ फरसा वाले बाबा यांच्या शनिवारी पहाटे झालेल्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली. ही घटना कोटवन चौकी हद्दीतील नवीपूर गावाजवळ घडली. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास फरसा वाले बाबांना गायींच्या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एका कंटेनरला थांबवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. आरोप असा आहे की, याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून एका युवकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू असून तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. घटनेची बातमी पसरताच परिसरात मोठ्या संख्येने गोरक्षक आणि भाविक जमले. संतप्त जमावाने दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, त्यामुळे वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
घटनेनंतर बाबांचे पार्थिव कोसी येथून अंजनोक येथील गोशाळेत नेण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तेथेही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सध्या या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. मथुरातील ‘फरसा वाले बाबा’ म्हणून ओळखले जाणारे संत चंद्रशेखर हे ब्रज परिसरातील प्रसिद्ध आणि निर्भय गोरक्षक होते. ते नेहमी हातात फरसा घेऊन गोवंशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असत. गोरक्षा आंदोलनातील ते एक प्रमुख चेहरा होते आणि प्रखर गोरक्षक संत म्हणून त्यांची ओळख होती. मथुरातील अंजनोक येथे त्यांचा मुक्काम असे. गोरक्षणासाठी त्यांनी निर्भयपणे कार्य केले असून ब्रज परिसरात त्यांची मोठी लोकप्रियता होती.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक