रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न

22 Mar 2026 17:03:20
C. P. Radhakrishnan
 
मुंबई : (C. P. Radhakrishnan) उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी केले.
 
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबार हॉल येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर यांच्यासह इतर अधिकारी आणि विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.
 
उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, "आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभातील पदवीधर हे इतिहासाचा भाग बनले आहेत. या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश मिळवले नसून, ते भारताला 'ग्लोबल स्किल हब' बनवण्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड रोवणार आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर नैसर्गिक संसाधने नसतानाही जपानने केलेली प्रगती ही त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिस्तीमुळे आहे. काम करताना जपानी लोक कधीही विचलित होत नाहीत. हीच कामाप्रती निष्ठा भारतीय तरुणांनी अंगीकारली पाहिजे," असे ते म्हणाले.
 
हेही वाचा : जैन समाजाने आपल्या मूल्याधारित कार्यातून आदर्श निर्माण केला; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
 
पदवी मिळवणे म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही - राज्यपाल जिष्णु देव-वर्मा
 
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य, पुनर्कौशल्य आणि कौशल्य वृद्धी तीन महत्त्वाच्या पैलूंवर भर दिला आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये या तिन्ही क्षेत्रांत साथ देण्याची क्षमता आहे. आधुनिक विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. शिक्षणामुळे शाश्वत प्रगतीकडे जाण्यासाठी चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे. पदवी मिळवणे म्हणजे शिक्षणाचा शेवट नसून आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरूवात आहे. ज्या जगात तुम्ही प्रवेश करत आहात ते अत्यंत गतिमान आणि सतत बदलणारे आहे. विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे."
 
काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल, तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'स्किल इंडिया'ची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे. पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल 'मानव संसाधन' उपलब्ध आहे.कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील."
 
हे वाचलत का? - बाह्य आक्रमणानी उध्वस्त झालेल्या समाजाला संघटित करण्याचे काम संघ स्थापनेनंतर झाले : गिरीश प्रभुणे
 
नव्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः ला बदलावे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
 
"रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचा हा दीक्षांत सोहळा ऐतिहासिक आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भावी आयुष्याच्या स्वप्नांचा आज सन्मान होत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. त्याअनुषंगाने केंद्रासोबतच राज्य सरकार ही कार्यरत आहे. औंध येथील आयटीआय अतिशय अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः ला बदलले पाहिजे. देशाच्या सर्वांगीण विकासाला आकार देणारे घटक म्हणून तरुणांकडे पाहिले जाते, त्यांनी नैतिकेच्या मूल्यांवर सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे."
 
कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर - मंत्री मंगल प्रभात लोढा
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे, त्यामागे केवळ कृषी नव्हे तर प्रत्येक घरातील कौशल्य ही मोठी ताकद होती. प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन मजबूत असून, आता कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर दिला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पहिला दीक्षांत समारंभ पार पडणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे त्यांच्या करिअरला अधिक बळ मिळेल."
 
 
Powered By Sangraha 9.0