मुंबई (Rupali Chakankar Resigns) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. नाशिक येथे तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन अशोक खरात याला महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यादरम्यान, रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना, त्याचे पाद्यपुजन करताना आणि ओवाळतानाचे काही फोटो आहेत. तसेच अशोक खरात याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्ट या संस्थानवर रूपाली चाकणकर संचालक असल्याचेही समोर आले. यामुळे सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.
पोलिस महासंचालकांची घेतली भेट
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी आणि आरोपीवर कारवाई व्हावी, यासाठी आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही द्यावा लागणार राजीनामा!
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षांतर्गत कारवाईलाही रुपाली चाकणकर यांना सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कारभारही चाकणकर यांच्याकडेच आहे. एकीकडे कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे येत असताना, विरोधकांची आणि स्वपक्षातील नेत्यांची विविध वक्तव्ये आणि आरोप येत असताना चाकणकर पदावर राहिल्यास पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू, शकतो. अशातच चाकणकरांना आता पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....