Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणी राज्य महिला आयोगाचे पोलिस महासंचालकांना पत्र

    20-Mar-2026   
Total Views |

Ashok Kharat Case


मुंबई : (Ashok Kharat Case)
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना पत्र लिहिले आहे. अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा आणि आरोपीवर कारवाई होण्याकरिता आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या पत्रात म्हटले आहे.(Ashok Kharat Case)


रुपाली चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे की, "नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेवर गेल्या तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याची आणि तिला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहे. हे प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, आरोपीने श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने या तपासासाठी एसआयटी नियुक्त केली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व लवकरात लवकर होईल याची मला खात्री आहे." (Ashok Kharat Case)



लवकरात लवकर दोषारोपपत्र सादर करावे


"आरोपीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले संबंध पाहता, तपासावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थापित विशेष तपास पथकाने निपक्षपातीपणे तपास करावा. सापडलेल्या ५८ व्हिडिओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घ्यावे आणि त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे. आरोपीने जर डिजिटल पुरावे (व्हिडिओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील, तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (आयटी अॅक्ट) वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळेल. महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचा प्रगती अहवाल वेळोवेळी आयोगाला सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे," असेही या पत्रात म्हटले आहे. (Ashok Kharat Case)



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....